
नवी दिल्ली – बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख याने स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवताना केरळमधील कोची येथे झालेल्या सातव्या रिजनल स्पोर्टस सेंटर अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयुर्विमा महामंडळात प्रशासकीय अधिकारी असलेल्या ४७ वर्षाच्या अनुपने नऊ फेर्यांमधून आठ गुण संपादन केले. नऊ फेर्यांमधून स्वीस लीग क्लासिकल पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत १६० खेळाडूंचा सहभाग होता. महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या अनुपला स्पर्धेत तामिळनाडूचा महेश्वरन पाठोपाठ दुसरे मानांकन देण्यात आले होते. अफुपने पहिल्या फेरीत केरळच्या अश्विन जोजोवर विजय नोंदविला. त्यानंतर तामिळनाडूच्या आदित्यसोबत गुणविभागणी केली. यानंतर केरळचा एम. सतीश, तामिळनाडूचा ए. विश्वेश्वर, एम. ईश्वर, जीबी हर्षवर्धन आणि अनिल कुमार यांच्यावर सलगविजयाची नोंद केली. आठव्या फेरीत महेश्वरविरुद्ध पुन्हा गुणविभागणी करावी लागली. यामुळे कर्नाटकच्या संतोष कश्यपसोबत अखेरच्या फेरीपर्यंत अनुप संयुक्त आघाडीवर होता. पण अखेरच्या फेरीत कश्यपला धक्का देत अनुपने सरशी साधलीच.
