…अखेर नागपूरात इथेनॉल बस धावणार

ethanol
नागपूर – मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयाकडून इथेनॉल बस चालविण्याला अनुमती मिळाली आहे. या संदर्भात नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. तांत्रिक अडसर दूर झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने शहरात इथेनॉल बस चालविण्याची तयार केली आहे. शहरात लवकरच ही बस धावणार आहे. मनपा कार्यालयाला यासंदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाची माहिती मिळालेली नाही. स्कॅनिया कंपनीकडून प्राप्त इथेनॉलवरील बस शहरात चालविण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयाकडे अनुमती मागितली होती. परंतु या कार्यालयाने अनुमती देण्यास नकार दिला होता. सीताबर्डी ते बुटीबोरी व्हाया विमानतळ मार्गे इथेनॉल बस चालविण्यासाठी अनुमती मागण्यात आली होती. परंतु स्टार बस ऑपरेटरने याला विरोध दर्शविला होता. आता नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार खापरी ते मॉरिस कॉलेज दरम्यान ही बस धावणार आहे.