डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश दीक्षाभूमीला सुपूर्द करावा

babsaheb
चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहाय्याने पवित्र दीक्षाभूमी स्थित बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास येवून थायलंड येथून प्राप्त झालेल्या १६.५ फूट चालत्या अवस्थेत (अभय मुद्रा) असणार्‍या बुद्धरूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे संरक्षण करण्यास दीक्षाभूमी सक्षम झाली आहे. त्यामुळे बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या भावनांचा आदर करून स्मृतिशेष श्रीहरी खोबरागडे यांच्या निर्वाणानंतर सध्या खोबरागडे परिवाराच्या अधिनस्थ असलेले प.पू. डॉ. बाबासाहेबांचे पवित्र अस्थिकलश बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या दर्शनार्थ कायमस्वरूपी दीक्षाभूमी चंद्रपूरस्थित बुद्ध विहारास सुपूर्द करण्यात यावा, अशी मागणी अरुण घोटेकर यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरद्वारा आयोजित ५८व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात लाखो लोकांना संबोधित करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.घोटेकर पुढे म्हणालेकी, बॅरिस्टर साहेबांच्या निर्वाणानंतर पवित्र दीक्षाभूमी स्थित विहाराचे बांधकाम पूर्णतवास आले नसल्याने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाबासाहेबांचा अस्थिकलश बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यादिवशी दीक्षाभूमीवरील बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्णतवास येईल त्यावेळी बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश दीक्षाभूमी चंद्रपूरस्थित बुद्ध विहारात बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या दर्शनार्थ कायमस्वरुपी देण्यात येईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. आता बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वास आले असून, प.पू. डॉ. बाबासाहेबांचे पवित्र अस्थिकलश बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या दर्शनार्थ कायमस्वरुपी दीक्षाभूमीला सुपूर्द करावे, अशी विनंती करण्यात आली.

Leave a Comment