मुख्यमंत्र्यांचा शेपटीतला दणका

prithviraj-chavan
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली असे थेट काम केलेले आहे. मात्र मनमोहनसिंग यांनी आपले पंतप्रधानपद संपता संपता शेवटी पक्षाला जो दणका दिला तसाच दणका पृथ्वीराज चव्हाण यांनीसुध्दा दिला आहे. मनमोहनसिंग यांनी आपल्या सरकारमधल्या अनेक भ्रष्टाचार्‍यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्याची कारणे विचारली असता, मी त्यांची दखल घेतली असती तर सरकार बदलले असते असे उत्तर देऊन टाकले. पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमके असेच केले आहे. आपल्या पूर्वीचे तीन मुख्यमंत्री आदर्श प्रकरणात दोषी होते. त्यांच्यावर योग्य कारवाई केली असती तर तिघेही तुरुंगात गेले असते आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले असते. म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे त्यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी असे दुर्लक्ष केले म्हणून पक्ष काही फार बलशाली झालेला नाही. शेवटी पक्षाचे व्हायचे ते नुकसान झालेच आहे. कारण पृथ्वीराज चव्हाण काहीही म्हणोत महाराष्ट्रातली जनता या तीन माजी मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारीच समजत आली आहे.

मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पक्षाला दिलेला दणका अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी दिला आहे. त्यामागे त्यांचा हेतू काय हे काही माहीत नाही. पण त्यांच्या दणक्याने पक्ष मात्र घायाळ झाला. आता पक्षाचा दारूण पराभव होत असल्याचे दिसत आहे. कॉंगे्रस पक्षाने लोकसभेत सपाटून मार खाल्ला होता. परंतु त्या पराभवातून सावरून कंबर कसून विधानसभा निवडणूक जिंकायला त्यांनी सज्ज व्हायला हवे होते. मात्र नव्या मनःस्थिती ऐवजी पराभवाला कारणीभूत ठरलेली मनःस्थिती आणि संघटना यांच्याच जोरावर पुन्हा विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संघटना तीच आणि मनःस्थितीही तीच. मग लोकसभेपेक्षा वेगळा निर्णय लागण्याची काय शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणेच पुन्हा एकदा दारूण पराभव झाला. अशा पराभवामुळे कार्यकर्ते निराश झाले की कॉंग्रेसचे नेते त्यांना धीर द्यायला लागतात. आपल्या हातात अजूनही काही राज्ये आहेत. ती असेपर्यंत आपल्याला कोणी नमवू शकणार नाही असेही उसने बळ आणून सांगत होते. हाती असलेल्या राज्यांत हरियाणा आणि महाराष्ट्र यांचा समावेश आवर्जुन केला जात होता. कारण महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि हरियाणा हे राज्य आकाराने लहान असले तरीही ते प्रगत राज्य आहे. त्यामुळे ही दोन राज्ये आपल्या हातात असल्यामुळे ती आपली शक्ती आहे अशी कॉंग्रेस नेते आपल्या कार्यकर्त्यांची समजूत घालत होते.

कितीही समजूत घातली तरी नेते मनातून मात्र पूर्ण हबकलेले आहेत आणि निवडणूक जिंकण्याची इच्छाशक्तीच गमावून बसले आहेत. एका बाजूला राज्यातले नेते बढाया मारत होते. नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण हे पुन्हा सत्ता मिळणार असे छातीठोकपणाने सांगत होते पण त्यासाठी प्रचाराची राण उडवून देणे हे त्यांचे आणि पक्षश्रेष्ठींचे कर्तव्य होते. पराभव होणार की विजय होणार हे मैदानात ठरत असते. पराभव झाला तरीही हरकत नाही पण मैदानात उतरताना मात्र जिंकणारच आहे अशा खात्रीने आणि आत्मविश्‍वासाने उतरले पाहिजे. जोराने प्रचार केला पाहिजे. पण सोनिया गांधीसह सर्व नेते आत्मविश्‍वास गमावून बसले होते आणि प्रचारालाही बाहेर पडत नव्हते. बसल्या जागीच आपण आपला पराभव मान्य केला तर आपण मैदानात काय करू शकतो. सोनिया गांधी यांनी या मैदानात झंझावाती दौरे करायला हवे होते पण त्यांनाही पराभव दिसत असावा. असे झाले की कॉंग्रेसचे कार्यकर्तेही आत्मविश्‍वास गमावून बसतात. पण नेते मंडळी त्यांनी धीर देत असतात. असा धीर देण्याचा उपाय म्हणजे राज्यात नेतृत्व बदल करणे.

खरे म्हणजे असा नेतृत्व बदल करण्याने फार काही साध्य होत नाही. पण निदान पराभवानंतर आपला पक्ष काहीतरी करत आहे असे कार्यकर्त्यांना वाटायला लागते. म्हणून एकप्रकारे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नेतृत्व बदलाचे वारे फिरवले जातात. तसे महाराष्ट्रात आता पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याची चर्चा सुरू झाली आहे. खरे तर हातात सत्ता नाही, विधानसभेत पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे आणि विरोधी पक्ष म्हणूनसुध्दा मान्यता मिळू शकत नाही. अशा अवस्थेत पृथ्वीराज चव्हाण यांना हटवले काय की न हटवले काय काहीच फरक पडत नाही. पण कार्यकर्त्यांचे समाधान व्हावे म्हणून त्यांच्या नेतृत्वबदलाची चर्चा सुरू करून दिली गेली आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही बदलले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. हरियाणातही असा बदल अपेक्षित आहे. खरे म्हणजे हे दोन्ही मुख्यमंत्री पक्षाला यश मिळवून देऊ शकत नाहीत. हे पूर्वीच लक्षात आले होते. पण तरीही त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या. त्यामागची कारणे अनेक आहेत. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण विजय मिळवून देऊ शकत नाही हे दिसत होते. पण कोण विजय मिळवून देऊ शकेल हेही दिसत नव्हते. त्यामुळे मग आहे तोच पराभूत होणारा घोडा पळवावा आणि त्यांनी शक्य तेवढे धावण्याचा प्रयत्न करावा असा मार्ग पक्षश्रेष्ठींनी अवलंबिला. अपेक्षेप्रमाणे पराभव झालेला आहे.

Leave a Comment