मतदानाला सुट्टी न दिल्यामुळे प्रतिष्ठीत कंपन्यांवर कारवाई

voters
मुंबई – वेगवेगळी दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि हॉटेल्स अशा २८० जणांवर विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी आपल्या कार्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यामुळे मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली असून यामध्ये सीटी बॅंक आणि टाटा कन्सलटन्सी या प्रतिष्ठीत कंपन्यावरही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी अविनाश गोसावी यांनी दिली आहे.

या मतदार संघ क्षेत्रातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रमे किंवा इतर आस्थापना तसेच माहिृती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत आदेश कामगार आयुक्त यांनी दिले होते.

लोकप्रतिनित्व अधिनियम १९५१ (भाग-२) नियम १३५ (ब) (१ ते ३) नुसार व्यवसाय, ट्रेड, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे. या सुट्टीसाठी कोणतीही वजाती अथवा कपात करता येणार नाही.

कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान दोन तासाची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल अशा पुरेशा वेळेची सवलत देण्यात यावी अशीही सोय या नियमात आहे.

Leave a Comment