शिवसेनेच्या वाटचालीची दिशा

shivsena
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लगेच मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यानुसार भाजपा आणि शिवसेना या दोघांना मिळून दोनशे पेक्षाही अधिक जागा मिळत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ पाहणारा पराभव फारच दारुण स्वरूपाचा आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती असती तर या दोन पक्षांचा यापेक्षाही अधिक वाईट पराभव झाला असता. हे पाहिले म्हणजे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे पटते. भाजपा-सेना युती मोडायला आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी, उगाच युती मोडू नका, वातावरण चांगले आहे त्याचा फायदा करून घ्या, असा सल्ला भाजपाला दिला होता आणि तसे दिसूनही आलेले आहे. युती मोडून सुद्धा चांगले वातावरण दिसले आहे. परंतु युतीमध्ये ज्येष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण, असा वाद होता. जागा देणारा मी आहे असा उद्धव ठाकरे यांचा अहंभाव होता, तो व्यर्थ ठरला आहे. कारण भाजपाला शिवसेनेच्या दुप्पट जागा मिळणार असे दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या जागा मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा एवढ्या जागा कधी मिळाल्या नव्हत्या. परंतु या यशामध्ये शिवसेनेच्या गालावर भाजपाची एक चपराक बसलेली आहे.

पुढच्या काळात भाजपा-सेना युती पुन्हा निर्माण होणार असेल तर शिवसेनेला भाजपाचा दुय्यम पार्टनर म्हणूनच काम करावे लागेल, तशी मन:स्थिती निर्माण करावी लागेल. पण उद्धव ठाकरे यांच्या मानी स्वभावाला ते मानवेल की नाही, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सत्ता मिळाली नाही तरी हरकत नाही, पण दिल्लीपतीपुढे झुकणार नाही असा बाणा त्यांनी कायम ठेवला तर त्यांना खरोखर एकाकी झुंजावे लागेल. त्यांच्याकडे तेवढी संघटनात्मक तयारी असेल तर याही परिस्थितीत ते कोणाही पुढे न झुकता शिवसेनेला मोठे करू शकतात. तसे त्यांनी केले पाहिजे. परंतु सध्याचा काळ फार वेगळा आहे. सत्तेची संधी असताना आपले नेते निरर्थक स्वाभीमानाच्या गोष्टी करत बसले आहेत आणि सत्तेपासून जाणीवपूर्वक दूर रहात आहेत हे पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आले तर ते कार्यकर्ते स्वाभीमानापेक्षा सत्तेला प्राधान्य देतात आणि पक्षाच्या बाहेर पडतात. हा बाहेर पडू पाहणारा सत्तापिपासूंचा लोंढा अडविण्याची ताकद संघटनेत असली पाहिजे. सत्ता असो की नसो, आम्ही शिवसेनेतच राहणार आणि चिवटपणे झुंज देणार अशा जिद्दीचे कार्यकर्ते असतील तर उद्धव ठाकरे भाजपाच्या विरोधात उभे राहू शकतील. पण या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. भाजपा आणि शिवसेनेचे नाते काय राहणार हे प्रत्यक्षात निकालात हाती पडणार्‍या जागांवर अवलंबून राहणार आहे.

कॉंग्रेसच्या फाटक्या तोंडाचे फटकळ नेते नारायण राणे पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरून बसले होते, पण त्यांना ते मिळाले नाही. त्यामुळे ते चिडले आणि कॉंग्रेसला फार तर २५ जागा मिळतील असे बोलून गेले. रागाच्या भरात त्यांनी व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरणार असे एक्झिट पोलवरून तरी दिसत आहे. राणे नंतर सुतासारखे सरळ झाले आणि कॉंग्रेस श्रेष्ठींना जी हुजूर म्हणून पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले. त्यांना निवडणूक प्रमुख करण्यात आले. परंतु त्यांच्या स्वत:च्या कुडाळ मतदार संघातच त्यांना एवढे मोठे आव्हान जाणवायला लागले की, कुडाळमध्ये घरोघर फिरल्याशिवाय आणि कणकवलीमध्ये दारोदार पोचल्याशिवाय आपल्या आणि आपल्या मुलाचे भवितव्य घडणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नारायण राणे राज्याचे प्रचार प्रमुख असले तरी सिंधुदुगर्र् जिल्ह्याच्या बाहेर फार पडलेच नाहीत. तीच अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली. सुशीलकुमार शिंदे यांना आपल्या कन्येसाठी सोलापुरात ठाण मांडून बसावे लागले.

निवडणुकीच्या घाईमध्ये नंतर नारायण राणे यांनी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार अशा वल्गना केल्या खर्‍या; परंतु त्यांचे २५ जागांचे पहिले अनुमानच खरे ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. खरा फटका बसला आहे तो राष्ट्रवादीला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सत्तेवर येण्याची स्वप्ने बघत होते. शरद पवार यांनी फार पूर्वीपासून १००+ चा प्लॅन आखला होता. राज्यात १०० आमदार निवडून आणायचे आणि एखादा छोटा पार्टनर सोबत घेऊन सत्ता प्रस्थापित करायची, अर्थात कन्येला किंवा पुतण्याला मुख्यमंत्री करायचे, अशी त्यांची योजना होती. पण त्यांच्या आमदारांची संख्या ३० च्या पुढे सरकेल असे काही दिसत नाही. भाजपाला एक्झिट पोलच्या अंदाजानुसार १०२ ते १५१ च्या दरम्यान जागा मिळतील असे दिसते. अशा अवस्थेत बहुमताचे गणित मोठेच गुंतागुंतीचे होणार आहे. भारतीय जनता पार्टीला १३० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर त्याला अन्य छोट्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करता येणार आहे. भाजपाशिवाय अन्य पक्षांच्या जागा बहुमताच्या हिशोबाने एवढ्या कमी राहणार आहेत की, भाजपाशिवाय कोणालाही सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे पर्यायी समीकरणांचा कसलाही प्रयत्न महाराष्ट्रात होणार नाही. सरकार भाजपाचेच असेल, पण भाजपाला १०३ जागा मिळाल्या तर शिवसेेनेची मदत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा स्थितीत शिवसेना शहाणपणाने वागली तर भाजपाला दुय्यम भागीदार म्हणून का होईना पण सत्तेत वाटा मिळवू शकणार आहे.

Leave a Comment