एक्झिट पोलचे म्हणणे काय आहे ?

exit-poll
या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदार चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करायला अनुमती दिली होती. त्यामुळे भाजपाला सर्वात जास्त जागा मिळणार असे संकेत मिळालेच होते. पण तरीही निकालातून नेमके काय बाहेर पडते हे समजायला १९ तारखेपर्यंत थांबावे लागणार होते. एवढी प्रतीक्षा करण्याचा धीर नसणारांना एक्झिट पोल हा एक चांगलाच दिलासा असतो. बुधवारी मतदान संपताच त्याचेही अंदाज बाहेर पडले आणि तेही आधीच्या चाचण्यांच्या लाईनवरच आहेत. एका एक्झिट पोलने भाजपाला १२७ जागा मिळतील असे म्हटले आहे तर एका पोलने १२९ चचा अंदाज व्यक्त केला आहे.हे निष्कर्ष बरोबर असतील तर पंतप्रधान मोदी यांचे भाजपाला स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन जनतेने मनावर घेतले नाही असे म्हणावे लागेल. इक्झिट पोलचे अंदाज थोडेसे चुकले आणि भाजपाला या अंदाजापेक्षा १० ते १५ जागा जास्त मिळाल्या तर मात्र भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करता येते.

या अंदाजात शिवसेनेला ५६ जागा मिळतील असे म्हटले आहे तर एका पोलने शिवसेनेला ७७ जागा दिल्या आहेत. खरे तर लोकांना कोणाला किती जागा मिळतात यात फार रस नव्हता. शिवसेनेला किती जागा मिळतात हे जाणून घेण्यात रस होता. कारण शिवसेना युती तोडून मैदानात उतरली होती. लोकसभेच्या निवडणुकीत आली ती लाट मोदी लाट नव्हती तर शिवसेनेची लाट होती असा त्यांचा दावा होता. तेव्हा त्यांच्या बोलण्यात आता आपल्याला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा सूचित केला जायला लागला होता. पण पोलच्या अंदाजात तरी शिवसेना भाजपाच्या फार मागे आहे असे दिसते. दोन पक्षांतला हा फरक पाहिल्यास आपण असे नक्कीच म्हणू शकतो की, शिवसेनेने काही प्रमाणात कमीपणा घेऊन युती टिकवायला हवी होती. युती झाली असती तर शिवसेनेची झाकली मूठ सव्वा लाखाची ठरली असती आणि जास्त जागा मिळाल्या असत्या. त्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद मिळणार नव्हते आणि आता आततायीपणा करून भाजपाला आव्हान दिल्यानेही ते मिळणार नाहीच. अशा राजकारणात फार शांतपणा लागतो. मोठ्या मुत्सद्दीपणाने वागावे लागते. पोलचे अंदाज काहीही असोत पण निवडणुकीच्या आधी जे चित्र जाणवत होते ते या अंदाजांच्या लायनीतच होते. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कितीही वल्गना केल्या तरी शिवसेनेला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही हे फार पूर्वीपासूनच दिसायला लागले होते. अशा स्थितीत आपल्याला सरकार बनवण्यात मोठी भूमिका बजावता येणार आहे हे त्यांना कळायला हवे होते.

चित्र कसले का असेना पण प्रचाराच्या काळात कोणालाही अपमानास्पद बोलून उगाच दुखावू नये ही तर राजनीती असतेे. कोणालाही दुखावून काही फायदा तर नक्कीच होत नाही. शिवसेनेने सगळ्यांना शत्रू करून ठेवले. आता ६० ते ७५ दरम्यान आमदार असतानाही नेमकी कोणती भूमिका वाट्याला येतेय याचा काही नेम नाही. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला दुखवायचे नाही हे नक्की ठरवले होते. मोडलेली युती पुन्हा करण्याची पाळी आली तर आपले दरवाजे उघडे आहेत हे भाजपाने दाखवून दिले. ते ठाकरे यांना करता आले नाही. आपण कितीही टीका केली तरी आपल्याला भाजपाशी असलेली युती पूर्णपणे मोडता येणार नाही कारण आपला एक मंत्री केन्द्रात आहे आणि राज्यातल्या तीन चार महानगरपालिकेतली सत्ता आपण भाजपाच्या युतीतच भोगत आहोत. तेव्हा भाजपाविषयी किती कटुतेने बोलावे हे ठाकरे यांनी ठरवायला हवे होते.

या पोलमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा मात्र धुव्वा उडणार असे दिसत आहे. कारण त्यात कॉंग्रेसला ४० तर राष्ट्रवादीला ३५ जागा मिळताना दिसत आहेत. हाही अंदाज यापूर्वी झालेल्या चाचण्यांच्या अंदाजांनुसारच आहे. याचा अर्थ आताच्या सत्ताधार्‍यांना विरोधी बाकावर बसण्याचा जनतेचा आदेश आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पारच धुवून निघाली आहे. अर्थात त्यांची ही कामगिरी अपेक्षितच आहे कारण कॉंग्रेसच्या विरोधात जनतेत नाराजी होती आणि राष्ट्रवादीनेही अनेक भ्रष्टाचार केले होते. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपा किेंवा शिवसेनेत गेले होते. पक्षाला गळती लागली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेचीही स्थिती अशीच झाली होती. अनेक नेते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जात होते. पण एवढी गळती लागूनही शिवसेनेला लोकसभेच्या १८ जागा मिळाल्या. पण राष्ट्रवादीला गळतीचे परिणाम भोगावे लागतील असे या पोल मध्ये दिसत आहे. या पोलचे निष्कर्ष दिशा दाखवणारे नक्कीच आहेत. प्रत्यक्षात लागणारे निकाल १९ तारखेला लागतील आणि चित्र स्पष्ट होईल. काही जागा कमी जास्त होतील कारण हा अंदाज आहे. लोक मतदान करून बाहेर पडतात तेव्हा त्यांनी कोणाला मत दिले आहे असा प्रश्‍न विचारता येत नाही. विचारला तर कोणी उत्तर देत नाही कारण मतदान हे गोपनीय असते. म्हणून त्यांच्याशी गप्पा मारता मारता काही अदमास केलेला असतो. तो तंतोतंत नसतो पण दिशा दाखवणारा असतो. एकंदरीत राज्यात नेतृत्व बदल अटळ आहे.

Leave a Comment