पाकिस्तानने पुन्हा भोकाड पसरले

pakistan
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मिरचा प्रश्‍न सतत तेवत ठेवण्याच्या आपल्या राजनीतीचा एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना पत्र लिहिले असून नेहमीप्रमाणेच त्या पत्रात काश्मिरचे रडगाणे गायले आहे. या प्रश्‍नात संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानला सातत्याने चपराक बसते, अनेक ठिकाणी त्याचे हसू होते, सीमेवर गोळीबार सुरू ठेवला तरी भारताने प्रत्युत्तर दिल्यास पाकिस्तानची मोठी हानी होते हे सारे माहीत असून सुद्धा पाकिस्तान हा प्रश्‍न सोडत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना पाकिस्तानचे पंंतप्रधान नवाज शरीफ हेही तिथे होते. त्यांनी युनोच्या आमसभेत काही कारण नसताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. नरेंद्र मोदी यांनी त्याला चोख उत्तर तर दिलेच, पण जागतिक समुदायाने सुद्धा पाकिस्तानला या प्रयत्नाबद्दल चांगलेच झापले. एवढ्यावरही नवाज शरीफ यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये युनोने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

ही मागणी मान्य होणार नाही हे पाकिस्तानला माहीत आहे, तरीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ती केली आहे आणि नेहमीप्रमाणेच युनोच्या सरचिटणीसांनी त्यांच्या या पत्राला केराची टोपली दाखवली हेही अपेक्षितच आहे. पण तरीही पाकिस्तान अशी मागणी करण्यास थकत नाही याचे कारण काय? पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा हा भागच झाला आहे. कारण तिथे कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी त्याची काश्मीर प्रश्‍न जागा ठेवणे ही गरज झाली आहे. ही गरज दोन अर्थांनी आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग म्हणून तर त्यांना काश्मीर प्रश्‍न जागा ठेवावा लागतोच, पण देशांतर्गत राजकारणाचा एक भाग म्हणून सुद्धा त्यांना काश्मीरवरून सातत्याने आरडाओरडा करावा लागतो. जागतिक राजकारणाचा भाग म्हणून काश्मीर प्रश्‍न जागता ठेवणे ही केवळ पाकिस्तानची गरज नाही तर ती पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या अमेरिकेची सुद्धा गरज आहे. म्हणजे काश्मीर प्रश्‍न जळता ठेवणे हे अमेरिकेला दक्षिण आणि पश्‍चिम आशियातल्या आपल्या राजकारणाचा एक भाग म्हणून आवश्यक झालेले आहे. भारताच्या दृष्टीने धोकादायक बाब अशी की, काश्मीर जळता ठेवणे ही चीनची सुद्धा गरज आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि चीन यांच्यात मोठी चुरस आहे. परंतु काश्मीरच्या प्रश्‍नावरून मात्र या दोन देशांचे एकमत आहे.

त्यांच्या त्यांच्या राजकारणासाठी त्यांना हा प्रश्‍न तेवत ठेवायचा आहे. याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या काही मुस्लीम दहशतवादी संघटनांना काश्मीर अस्थिर आणि अशांत हवा आहे. कारण तो तसा असेल तरच त्यांना काश्मीरमध्ये शिरकाव करता येणार आहे आणि काश्मीरमधून भारतामध्ये घुसखोरी करता येणार आहे. एकंदरीत काश्मीर हा प्रदेश जगातल्या किती तरी हितसंबंधांची शिकार ठरलेला आहे. पाकिस्तानचे सैन्य सातत्याने आगळीक करत असते आणि भारताच्या खोड्या काढत असते. खरे तर भारतीय सैन्याने विचारच केला तर आणि पाकिस्तानवर हल्लाच केला तर आठवड्याच्या आत पाकिस्तानला गुडघे टेकावे लागतील एवढी भारताची ताकद आहे. परंतु हे माहीत असूनही पाकिस्तान भारताच्या विरोधात सतत कारवाया करत असते. कारण त्याला अमेरिका, चीन आणि जगभरातील मुस्लीम संघटनांचा काश्मीरच्या प्रश्‍नावर कधी छुपा तर कधी उघड पाठींबा असतो. त्या पाठिंब्यामुळेच पाकिस्तानला भ्याड हल्ले करण्यास मानसिक आधार मिळतो आणि त्यांच्या या हल्ल्यांना तोंड देताना आणि हे सारे प्रकरण हाताळताना भारत सरकारला अनेक प्रकारची अवधाने सांभाळावी लागतात.

अंतर्गत राजकारणातील एक साधन म्हणून सुद्धा पाकिस्तानातल्या सत्ताधार्‍यांना काश्मीरचा मुद्दा हवा असतो. कारण पाकिस्तान अनेक अंतर्गत प्रश्‍नांनी गांजलेला देश आहे. लोकांच्या नागरी सोयी पुरविल्या गेलेल्या नाहीत, सरकारच्या विरुद्ध जनतेत रोष आहे, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरचे काही भाग सातत्याने दहशतवादी कारवायांत जळत आहेत. याच भागात अधूनमधून दहशतवाद्यांना टिपून मारण्यासाठी म्हणून अमेरिकेचे हल्ले होत असतात. त्यामुळे पाकिस्तान हे एक बजबजपुरी माजलेले राष्ट्र आहे. देशातल्या सगळ्या समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांना काश्मीरवरून काही तरी खळबळ उडवून द्यावी लागते. एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला की, सगळ्यांचे लक्ष तिकडेच लागते आणि जनतेच्या खर्‍या प्रश्‍नांकडून ते वळवले जाते. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे पाकिस्तानच्या जनतेच्या मनात वैषम्याची भावना आहे. तिला अनेक कोन आहेत. मात्र त्यात द्वेषाचा भाग मोठा आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भारताची खोडी काढली की, पाकिस्तानातली जनता खूष होते. त्या मूर्ख जनतेला अधिकच मूर्ख करण्यासाठी तिथले राज्यकर्ते अधूनमधून काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करत राहतात.

Leave a Comment