अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहे आजचे मतदान

voters
पंधराव्या विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानात पहिल्यांदाच काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्याने भाजप शिवसेना आमनेसामने मैदानात आहेत. तर १५ वर्षांपासून विळ्याभोपळ्याची मोट असणारे कॉंग्रेस राष्ट्रवादी देखील रिंगणात एकमेकांसमोर उतरले आहेत. या सर्वांच्या पुढे जाण्याची संधी मनसेचे इंजिन साधणार का ? याचा देखील निर्णय त्यामुळे होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे आधारस्तंभ गोपीनाथ मुंडे, कॉंग्रेसमधील जाणते नेते विलासराव देशमुख यांच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच तिनही पक्षांनी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचे दिव्य पार पाडले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या रंगत आणणारे तीन नेते यावेळी प्रचारसभांतून दिसले नाहीत. मार्मिक टिपणी करत मतदारांच्या मनातील बोलणारे बाळासाहेब ठाकरे, मिश्कील कोट्‌या करून विरोधकांच्या टोप्या उडवणारे विलासराव देशमुख आणि आक्रमक भाषण करून मतदारांमध्ये जोश निर्माण करणारे गोपीनाथ मुंडे यावेळी पाहायला मिळाले नाहीत. शिवाजी पार्कवर होणा-या राजकीय पक्षांच्या सभा यावेळच्या निवडणूकीत पाहायला मिळाल्या नाहीत. राज्यातील राजकारणात पहिल्यांदाच जाती आधारित मतदानाचा विचार करून मराठा, इतर मागासवर्गीय, आदिवासी, धनगर आणि मुस्लीम मतदारांची वोट बॅंक चाचपण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी केला आहे. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जाती आधारित मतदानाला पहिल्यांदाच उत्तरप्रदेश, बिहारप्रमाणे महत्व आल्याचे दिसून आले.

मनसेची विकासाची ब्ल्यू प्रिंट, भारतीय जनता पक्षाचे दृष्टीपत्र, शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचा जाहिरनामा असे शब्द वापरून लॅपटॉपपासून शेतीला पाणी मुबलक वीज इत्यादी विकासाची आमिषे मतदारांना देण्यात आली. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला ठोस विकासाचा कार्यक्रम मांडता आला नाही. निवडणूक प्रचारात टोपी, चड्डी, सदरा, लेंगा अशी उदाहरणे देऊन राजकीय पक्षांनी प्रचाराचा दर्जा खालच्या पातळीवर नेण्याचे काम केले. याशिवाय मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन होत असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर मतदारांना थेट तसे आवाहन करून राजकीय अडचण ओढवून घेतल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान आठ ते पंचवीस उमेदवार रिंगणात असल्याने बेरोजगार तरुण आणि गोरगरीब जनतेला निवडणूक प्रचारातील गर्दीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचे उद्धव आणि आदित्य ठाकरे, मनसेचे राज आणि अमित ठाकरे हे पिता-पुत्र, राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार हे काका पुतणे, तर कॉंग्रेस, भाजपतील निर्नायकीचा निर्णय घेण्याकरता सामूहिक नेतृत्व या निवडणूकीत पणाला लागले आहे. स्वबळाची भाषा करणा-या पक्षांच्या नेत्यांना जनतेच्या मनात कोणती जागा आहे ? ते १९ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment