महाराष्ट्राच्या निवडणुकीवर एक दृष्टीक्षेप

vidhansabha
महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या प्रस्थापित विरोधी वातावरणात होत असल्यामुळे या निवडणुकीत आघाडीचा धुव्वा उडणार आणि भाजपा-सेना युतीला प्रचंड बहुमत मिळून ही निवडणूक एकतर्फी होणार असे अंदाज होत असतानाच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. मात्र दोन कॉंग्रेसमधली आघाडीही तुटली आणि भाजपा-शिवसेनेतली युतीही मोडली. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक एकदम वेगळाच रंग घेऊन गेली आणि ती मोठी मनोरंजक सुद्धा झाली. ती चौरंगी झाल्यामुळे तिच्यातली चुरस एकदम वाढली. आता या निवडणुकीचे मतदान होत आहे आणि कोणता पक्ष कोणत्या अवस्थेत आहे हे बघणे मोठे मनोरंजक ठरणार आहे. निवडणूक कितीही चुरशीची झाली तरी भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल याबाबत कोणाचेच दुमत नाही.

निरनिराळ्या संस्थांकडून केल्या जाणार्‍या पाहण्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा दिसत आहेत. परंतु दुसर्‍या जागेवर कोण, यातील चुरस सुद्धा कमी होत चालली आहे. कारण बघता बघता कॉंग्रेस पक्षाने या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला भाजपाचे सामर्थ्य मोठे की, शिवसेनेचे असा वाद असतो. तसाच वाद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष आहे आणि राज्यात आपले बळ कॉंग्रेसपेक्षा जास्त आहे असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा असतो. किंबहुना त्यामुळेच राज्यात आघाडी करून किंवा आघाडी न करता कोणत्याही पद्धतीने शंंभर आमदार निवडून आणायचे आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा अशी योजना शरद पवार यांच्या डोक्यात नेहमी असते. प्रत्यक्षात मात्र तसे काही दिसत नाही. कारण या दोन पक्षातली आघाडी मोडली तेव्हा अचानकपणे ती मोडल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली. १४४ जागा लढविण्याची तयारी करणार्‍या राष्ट्रवादीला २८८ जागांवर उमेदवार शोधण्याची पाळी आली. २८८ जागांवर तर त्यांना उमेदवार मिळाले नाहीतच, पण पूर्व तयारी केलेल्या १४४ जागांवर सुद्धा समर्थ उमेदवार सापडले नाहीत. या पक्षातून शिवसेना किंवा भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते गेले. त्यामुळे या पक्षाची अवस्था वाईट झाली. कॉंग्रेसवर मात्र अशी वेळ आली नाही. राज्याच्या सर्व भागांमध्ये आणि बहुतेक मतदार संघांमध्ये त्यांना उमेदवार मिळाले. निवडणुकीच्या मैदानातील चार पक्षात चुरस होत आहे आणि भाजपा आघाडीवर आहे, कॉंग्रेसच्या विरोधात वातावरण आहे हे सारे खरे असले तरी कॉंग्रेसला राज्यभरात उमेदवार मिळाले एवढ्या एका गोष्टीमुळे कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या पुढे गेला.

परिणामी मतदारांच्या चाचण्यांमधून निघालेल्या निष्कर्षात भाजपाच्या खालोखाल कॉंग्रेसला जागा मिळताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीला ९५ ते १३५ दरम्यान जागा मिळतील असे सर्वेक्षकांना वाटते तर कॉंग्रेसला ६५ पर्यंत जागा मिळू शकतात असा त्यांचा कयास आहे. कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळवणे अवघड आहे, परंतु कॉंग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा चांगले यश मिळविण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रातले सध्याचे सामाजिक वातावरण कॉंग्रेसला बर्‍यापैकी अनुकूल आहे. कारण दलीत आणि अल्पसंख्यांक मुस्लीम समाज मोठ्या संख्येने तूर्तास तरी कॉंग्रेसच्या मागे आहे. कॉंग्रेसच्या या व्होट बँकेत फार मोठी फूट पडलेली नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातही फूट पडली आहे आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा घाट घातला आहे. ही युती तुटल्याने शिवसेना दुखावली आहे. महाराष्ट्रातली भाजपाची ताकद आपल्या मागे उभी रहावी आणि तिच्या जोरावर युतीने बहुमत मिळविताच मुख्यमंत्रीपद प्रादेशिक पक्षाला दिले पाहिजे असे म्हणून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळविता येईल असा शिवसेनेचा मनसुबा होता. परंतु राज्यातले भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या युतीला विटले होते. परिणामी या दोघातली युती तुटली.

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी युती तोडण्याच्या भाजपाच्या निर्णयाची तुलना गद्दारीशी केली. खरे म्हणजे युती तोडणे म्हणजे गद्दारी ही उद्धव ठाकरे यांची कल्पना मतदारांच्या गळी उतरलेली नाही. त्यामुळे युती तुटल्यामुळे मिळणार्‍या कथित सहानुभूतीचा लाभ आपल्याला मिळेल हा त्यांचा कयास चुकला आहे. त्यामुळे शिवसेनेची बॅटल लाईन चुकली असून तिला या निवडणुकीमध्ये फार तर ५० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती मोडली असली तरी कित्येक ठिकाणी भाजपाचे सक्षम उमेदवार नाहीत. तिथे कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला काय वाईट, असा विचार करून भाजपाचे मतदार आणि कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेला मदत करत आहेत. युती तुटली असली तरी शेवटी केंद्रात ती कायम आहे आणि निवडणुकीत अस्थिरता निर्माण झाली तर भाजपाला शिवसेेनेचीच साथ घ्यावी लागणार आहे अशी एक अंडरस्ट्रँडिंग भाजपाच्या मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. तिचा फायदा शिवसेनेला मिळू शकतो. म्हणून शिवसेना ५० ते ६० जागा मिळवू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भाजपाच्या मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये ही जी अंडरस्ट्रँडिंग निर्माण झाली आहे ती तशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यात नाही. त्यामुळे भाजपाचा उमेदवार सक्षम, पण शिवसेनेचा उमेदवार दुबळा अशा मतदारसंघात शिवसेनेची मदत भाजपाला होत नाही. कारण शिवसेनेने भाजपाला कट्टर शत्रू ठरवून टाकले आहे. त्यातूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाला काही जागांचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत कसल्याच आशा नाहीत. परंतु शिवसेना आणि भाजपाचे चुकलेले गणित आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागातील सहकार क्षेत्रातले वर्चस्व यांच्या जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेस ३० जागांपर्यंत मजल मारू शकेल असा निरीक्षकांचा अंदाज आहे. शिवसेनेने भाजपाविषयी असलेले वैर असेच कायम ठेवले तर निवडणुकीनंतरच्या समीकरणांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे नवे समीकरण राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते.

Leave a Comment