मतदारराजा कोणाला करणार मतदान?

vidhansabha
विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर सार्‍यांचे लक्ष आता १५ तारखेच्या मतदानावर लागले आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकमेकांसमोर निवडणूक लढत आहेत. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी राज्यात केलेल्या झंझावती प्रचाराला मतदार साद घालतात का आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला ठेवून शिवसेना आणि भाजप समोरा-समोर असताना कोणत्या पक्षाला बहुमताचा पल्ला गाठता येतो याचा निर्णय लागणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या गैरहजेरीत भाजपने २५ वर्षांनंतर उचललेले आव्हान त्यांना पेलणार आहे का याचाही निर्णय यावेळी होणार आहे. मोदी यांनी घेतलेल्या २७ जाहीर सभांमुळे मतदारांच्या मतदानावर कोणता परिणाम होणार हे आता दिसून येणार आहे. २८८ मतदारसंघात होणार्‍या या निवडणूकीत भाजपला किमान १६५ जागांवर विजय मिळेल असे नरेंद्र मोदी यांना राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांच्या शेवटच्या सभेच्या वेळी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. तसे झाले तर भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल ? भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस की अन्य कोणी ? लोकसभा निवडणूकीत युतीला ४२ जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या आणि या जागांवर मोदींचा प्रभाव होता असा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. या दाव्यानुसार खरोखर भाजपला मोदींचा प्रभाव आहे का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

भाजपच्या नेत्यांना असलेल्या विश्वासानुसार स्थिती राहिली नाही आणि भाजपला बहुमत मिळाले नाही तर पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपकडे ‘प्लॅन बी’ देखील तयार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार भाजपला बाजूला ठेवून नव्याने राज्यात पुलोदचा प्रयोग करू इच्छितात. त्यामुळे भाजपने देखील नव्या राजकीय मित्रांचा शोध घेऊन सत्ता समीकरणे जुळवायचे ठरविले आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकत्र येणे शक्य नाही. शिवसेनेने सध्या ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता पूर्वीच्या मैत्रीपूर्ण पद्धतीने सेना-भाजप सत्तावाटप होणे कठीण आहे. अशावेळी मनसे आणि अपक्ष यांचा भाव वधारणार आहे. शरद पवार यांनी सेना-मनसे आणि राष्ट्रवादी असा सत्तांतराचा प्रयोग करायचे ठरविले आहे, असे बोलले जात आहे. तर कॉंग्रेसने भाजपला बाजूला ठेवून सेना आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन सत्तांतर करण्यासाठी चाचपणी सुरु केल्याचे मानले जात आहे. शिवसेना या नवीन मित्रांच्या प्रस्तावाला कसे सामोरे जाणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. कारण सध्या केंद्रात आणि राज्यातील सात महानगरपालिकांत सेना-भाजप युती सत्तेवर आहे. राज्यात सत्तेवर येण्याचा चंग बांधलेल्या भाजपने मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांतील १०० विधानसभा जागांवर तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे आणि निम्मे संख्याबळ येथून मिळेल असा भाजपचा अंदाज आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत मोदी यांचा प्रचार केला होता. मात्र, यावेळी ते मोदींवर टिका करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपला त्यांना सोबत घेऊन सत्तेत जाणे हे फारसे सोपे नसल्याचे मानले जात आहे. राज्यातील भारनियमन, वीज क्षेत्रातील घोटाळे, जलसंपदा घोटाळा, आदर्श घोटाळा, पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार या वर्षभर गाजत असलेल्या विषयांवर निवडणूक प्रचारादरम्यान सेना-मनसेने सोयीस्कर कानाडोळा केला आणि भाजप एकाकीपणे हे मुद्दे मांडताना दोन्ही कॉंग्रेस पक्षांसमोर बहुमतासाठी संघर्ष करताना दिसली आहे. त्यामुळे कॉंग्रेसविरोधी मतदान मतदार सेना-मनसेला नव्हे भाजपलाच करतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटतो आहे.

Leave a Comment