महाविनाश टळला

hudhud
भारताच्या पूर्व किनार्‍यावर आदळून मोठे नुकसान करू पाहणारे महाविनाशकारी हुडहुड वादळ आंध्र प्रदेशात महाविनाशकारी न ठरता केवळ विनाशकारी ठरले आणि ओडिशाच्या किनार्‍यावर फार मोठी तबाही न करता ते पुढे सरकून क्षीण झाले आहे. या वादळाने नुकसान झाले असले तरी ते नुकसान अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे लोकांनी, या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारनेही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. एवढे असूनही विशाखापट्टणम् परिसरात झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेशाला दोन हजार कोटी रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. म्हणजे नुकसान अपेक्षेप्रमाणे नसले तरी निदान विशाखापट्टमण् पुरते तरी ते मोठ्या वित्तीय हानीला कारणीभूत ठरले आहे. या वादळाने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या एक आठवड्यापासून या संबंधात मोठ्या प्रमाणावर इशारे दिले जात होते. आपल्याला सध्या विज्ञानाचे वरदान लाभले आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशातील काही उपग्रहांच्या माध्यमातून अशा वादळांच्या आणि संकटांच्या आगाऊ सूचना मिळायला लागल्या आहेत.

अनेक लोक हवामान खात्याविषयी कुचेष्टेची भाषा वापरतात. हवामान खात्याचे अंदाज काही वेळा चुकतात आणि त्याचेच भांडवल करून हवामान खात्याची यंत्रणा कुचकामी असल्याची टीका-टिप्पणी करतात. मात्र या लोकांना हवामान खात्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची नीट माहिती नसते. त्या अज्ञानातून ही टीका जन्माला आलेली असते. प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान मानवतेला उपयुक्त ठरणारे आहे. ते नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना देऊ शकते. हुडहुड वादळाविषयीही अशा सूचना मिळत होत्या आणि त्यामुळेच हे वादळ निश्‍चितपणे कधी आणि कोणत्या किनार्‍यावर आदळेल हे सांगितले गेले होते. त्याचा धोका आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांना होता. त्या निमित्ताने सावधानतेच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या आणि अपेक्षेप्रमाणे ते वादळ शनिवारी आंध्राच्या विशाखापट्टणम् बंदरावर येऊन धडकले. ते धडकेपर्यंतच्या काळात हे वादळ ‘महाविनाशकारी’ असेल असा अंदाज होता. या वादळातील वार्‍याचा वेग २७० कि.मी. प्रती तास असा प्रचंड असेल, असेही वाटले होते. मात्र विशाखापट्ट्णम् बंदरावर येऊन धडकण्याच्या अवस्थेपर्यंत त्याचा वेग २०० कि.मी. प्रती तास पर्यंत कमी झाला. प्रत्यक्षात विशाखापट्टणम् बंदराच्या परिसरात १७० ते १८० कि.मी. प्रती तास या वेगाने वारे वाहिले.

म्हणजे वादळ येऊन धडकेपर्यंत ते बरेच सौम्य झाले होते. तरीही त्याला महाविनाशकारी ऐवजी केवळ विनाशकारी असे म्हटले गेले. त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी त्याच्यामुळे प्रचंड वित्तहानी झाली. जवळजवळ काही लाख झाडे उन्मळून पडली. महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. विजेच्या तारा तुटून खांब उन्मळून पडले. घरे उद्ध्वस्त झाली. विशाखापट्टणम् बंदराला वादळाचा प्रत्यक्ष तडाखा बसला. परंतु शेजारच्या पूर्व गोदावरी, विजयनगरम् आणि श्रीकाकुलम् त्याचबरोबर पश्‍चिम गोदावरी याही जिल्ह्यांमध्ये वादळाने थैमान घातले आणि अप्रत्यक्षपणे त्यांचे नुकसान केले. एकंदरीत आंध्र प्रदेशाला हा तडाखा मोठाच जाणवला आहे. प्रत्यक्षात वादळ घोंगावते तेव्हा बसणारा वादळाचा तडाखा डोळ्यासमोर दिसतो आणि तो ताबडतोब बसलेला असतो. परंतु शेजारच्या जिल्ह्याला बसणारा तडाखा वेगळा असतो. तिथे वादळाच्या प्रभावाने पाऊस सुरू होतो, नद्यांना पूर येतात, पिके वाहून जातात आणि जलापघात मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे विशाखापट्टणम्च्या शेजारच्या जिल्ह्यातील नुकसानीला आता सुरूवात होणार आहे आणि आठवडाभरात हुडहुड वादळाने आंध्र प्रदेशाला कितपत तडाखा दिला याचा अंदाज येणार आहे.

या वादळाचा धोका ओडिशाच्या किनारपट्टीला सुद्धा होता, परंतु हे वादळ विशाखापट्टणम्कडून वायव्येकडे वर सरकताना त्याची तीव्रता कमी झाली आणि ओडिशाला बसलेला धक्का तुलनेने सौम्य झाला. ओडिशाच्या किनारपट्टीवर केवळ ५५ कि.मी. प्रती तास या वेगाने वारे वाहिले. मलकनगिरी, गजपती, कोरापूट, गंजम् आणि रायगडा या पाच जिल्ह्यांमध्ये हे वादळ जाणवले. त्यामुळे झालेले ओडिशातले नुकसान आंध्र प्रदेशाच्या तुलनेने कमी असले तरी ते झालेले आहे हे नाकारता येत नाही. गेल्या वर्षी याच भागाने फायलीन वादळाचा तडाखा अनुभवलेला होता आणि त्यात हा परिसर उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे यावर्षीचा तडाखा त्यापेक्षाही कमी तीव्रतेचा असल्याने ओडिशातल्या जनतेने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. अशा वादळांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होत असे. परंतु अलीकडच्या काळात वादळाची सूचनाही मिळत आहे आणि धोकादायक भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या यंत्रणाही चांगल्याच दक्ष झाल्या आहेत. त्यामुळे मनुष्यहानी सुद्धा कमी होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अशा यंत्रणा ज्या कार्यक्षमतेने राबवल्या जातात त्याच कार्यक्षमतेने त्या आता भारतात सुद्धा राबवल्या जायला लागल्या अाहेत.

Leave a Comment