बालहिताच्या कार्यासाठी नोबेल

nobel
शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार पाकिस्तानातली विद्यार्थिनी मलाला युसूफझाई आणि बालकल्याणाच्या कामासाठी आयुष्य समर्पित केलेले कैलास सत्यार्थी यांना मिळून जाहीर झाला आहे. हा शांततेसाठीचा पुरस्कार आहे. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार आजवर अनेकांना दिला गेलेला आहे. मात्र सार्‍या मानवतेला शांततेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींना तो मिळालेला नाही. गांधींच्या हत्येनंतर त्यांना तो द्यावा अशी सूचना पुढे आली होती. मात्र तो मरणोत्तर द्यावा की नाही या वादात ही सूचना मागे पडली. याची खंत नोबेल पुरस्कार समितीला आहे. म्हणून या समितीने मलाला आणि कैलास सत्यार्थी या दोघांचे हे पुरस्कार जाहीर करताना, आम्ही महात्मा गांधींना हा पुरस्कार देऊ शकलेलो नाही याची आम्हास खंत वाटते. अशी भावना व्यक्त केली. ही भावनासुध्दा महत्त्वाची आहे. हा पुरस्कार महात्मा गांधींना मिळू शकला नसला तरी बालकांच्या हक्कांसाठी महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन उभारणार्‍या आणि त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेतलेल्या सत्यार्थी यांना तो जाहीर झाला आहे. ही एक प्रकारे महात्माजींबद्दल व्यक्त झालेली एक भावनाच आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा कल्लोळ जारी आहे. त्यामध्ये हिंदू-मुस्लीम वादाचे पडसाद उमटत आहेत.

भारतात आणि पाकिस्तानातही धार्मिक उच्छाद जारी आहे. अशा वातावरणातच पाकिस्तानातील मुस्लीम कार्यकर्ती आणि भारतातील हिंदू कार्यकर्ता यांना जागतिक स्तरावरचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर व्हावा ही मोठी शुभंकर घटना आहे. आजवर शांततेसाठीचे नोबेल पुरस्कार अनेकांना जाहीर झाले. त्या प्रामुख्याने जागतिक शांतता प्रस्थापित करण्यास प्रयत्नशील असलेले नेते समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ २००८ साली हा पुरस्कार बराक ओबामा यांना मिळाला. परंतु या वर्षी जाहीर झालेले हे दोन्ही पुरस्कार लहान मुलांच्या हक्कासाठी काम करणार्‍या या दोन व्यक्तींना जाहीर झाले आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचेच लक्ष बालकांच्या अधिकाराकडे आणि या अधिकाराची पायमल्ली करून त्यांना शारीरिक कष्ट करावयास लावणार्‍या व्यवस्थेकडे वेधले गेले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सध्या किती तणावाचे वातावरण आहे हे आपण जाणतोच. परंतु या दोन देशातल्या व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यामुळे उभयतांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मलाला युसूफझाई ही पाकिस्तानच्या खैबर पक्तून खवा या परगण्यातली शाळकरी विद्यार्थी आहे. तिचे वय केवळ १७ वर्षे आहे. तिच्या परगण्यामध्ये तालिबानी अतिरेक्यांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी मुलींना शाळेत पाठवू नये. असा फतवा जाहीर केलेला आहे.

असे असले तरी शिक्षण घेतल्याशिवाय मुलींना भवितव्य नाही. हे १३ वर्षीय मलालाच्या लक्षात आले आणि तिने मुलींच्या शिक्षणासाठी आपल्या परिसरात एक मोठी मोहीम सुरू केली. अर्थात, तालिबानी अतिरेक्यांकडून धमक्या येण्यास सुरूवात झाली. त्यांना न घाबरता मलालाने आपला कार्यक्रम चालू ठेवला. त्यामुळे तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याने तिच्या मंेंदूला जखमा झाल्या आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला ब्रिटनमध्ये न्यावे लागले. या घटनेने तिच्याकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले. ही १७ वर्षांची मुलगी म्हणजे एक कमालच आहे. एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे आणि विचारवंताप्रमाणे ती बोलत असते. तिला नोबेल पुरस्कार जाहीर झाला तरी तिचा कालचा दिवस नेहमीप्रमाणेच होता. ती नित्याप्रमाणे शाळेला गेली. तिने तासाला बसून शिक्षणही घेतले. नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे परंतु त्याचा माझ्या परीक्षेला काही उपयोग नाही. तेव्हा माझा मला अभ्यास केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. तिने आपला हा पुरस्कार आवाज दबलेल्या मुलांना अर्पण केला आहे. ज्यांचे आवाज कधी व्यक्त होत नाहीत त्यांच्यासाठी आपण जीवनभर काम करणार आहोत असे ती म्हणाली. आपल्याला हा पुरस्कार येत्या डिसेंबरमध्ये दिला जाईल तेव्हा त्या समारंभाला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी उपस्थित रहावे असे आवाहन तिने केले आहे.

आजपर्यंत भारतातल्या सात जणांना नोबेल पुरस्कार मिळाले आहे आणि कैलास सत्यार्थी हे आठवे मानकरी आहेत. परंतु मलाला युसूफझाई ही मात्र हा पुरस्कार मिळवणारी पहिली पाकिस्तानी व्यक्ती आहे. कैलास सत्यार्थी याने देशातल्या लहान मुलांचे शोषण थांबावे यासाठी बचपन बचाओ मोहीम सुरू केली. बर्‍याच दिवसांपासून म्हणजे स्वतः विद्यार्थी असल्यापासून सत्यार्थी यांना या कामाची निकड लक्षात आलेली आहे आणि जवळपास ३५ वर्षे ते या कामात गुंतलेले असून त्यांनी ८० हजार मुलांना वेठबिगारीतून मुक्त केले आहे. हे काम निव्वळ सेवाभावी काम नाही. कारण लहान मुलांच्या श्रमातून पैसा कमवायला काही कंत्राटदार सोकावलेले आहेत. लहान मुलांना फार मजुरी द्यावी लागत नाही आणि त्यांच्याकडून काम मात्र भरपूर करून घेता येते. संसाराची जबाबदारी नसल्यामुळे मुले कितीही वेळ काम करत राहतात. फार बंड करीत नाहीत त्यामुळे त्या देशात लहान मुलांना कामाला लावणारी एक स्वार्थी व्यवस्था विकसित झाली आहे. तेव्हा अशा मुलांना या व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न करताना या व्यवस्थेतल्या हितसंबंधियांशी संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे हे काम हे सतीचे वाण ठरते. हे सतीचे वाण सत्यार्थी यांनी साडेतीन दशके हाती घेतलेले आहे.

Leave a Comment