डावपेच कसे राहिले ?

vidhansabha
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्रकट प्रचाराचे पर्व संपले आहे. या काळात कोणत्या पक्षांचे डावपेच आणि व्यूहरचना कशी राहिली ? कोण या बाबतीत चतुर ठरले याचा आढावा घेणे मोठे मनोरंजक ठरणार आहे. या काळात दोन प्रश्‍न फार महत्त्वाचे ठरले. पहिला म्हणजे राज्यात मोदी लाट आहे का आणि दुसरा म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात का? निवडणुकीत लाट दिसत आहे का ? गेल्या पंधरा दिवसातल्या प्रचारावरून असे लक्षात येत आहे की, या राज्यातली ही निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या पंधरा वर्षातल्या बजबजपुरीच्या विरोधातल्या लाटेवर तर होत आहेच, पण सोबत मोदी लाटही आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही ती होती पण आता ती पूर्वीपेक्षाही अधिक मोदी झाली आहे. त्यामुळे सरकारविरोधी नकारात्मक लाट आणि मोदी यांची अधिक तीव्र झालेली सकारात्मक लाट या दोन्हींच्या प्रभावाखाली ही निवडणूक होत आहे. गंमत म्हणजे या लाटांचा फायदा भाजपाला तर होत आहेच पण तो शिवसेनेलाही करून घेता आला असता. ती संधी शिवसेनेने गमावली आहे.

या दोन लाटांतल्या राज्य सरकारविरोधी नकारात्मक लाटेचा फायदा तर शिवसेनेला फारच कौशल्याने करून घेता आला असता. परंतु शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तेवढी दूरदृष्टी आणि मुरब्बीपणा नाही. त्यामुळे त्यांनी त्या लाटेचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने प्रचाराचे मुद्दे ठरवलेच नाहीत. त्यांनी काही व्यूहरचना केली आहे असे दिसलेच नाही. भाजपाने युती मोडली म्हणून ते भाजपावर चिडले आणि भाजपावरच बोलत राहिले. ज्यांच्या विरोधात जनतेत राग आहे त्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारला त्यांनी फैलावर घेतलेच नाही. त्यांनी भाजपा बाबतची कटुता हाच मुख्य मुद्दा केला. युती मोडूनही शिवसेनेला काही फायदा मिळाला असता तो फायदा उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची चुकीची दिशा पकडून गमावला आहे. लाटेचा हिशोब मोठा विचित्र असतो. लोकांच्या नाडीवर बोट ठेवण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याला लाट जाणवते. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदी लाट होती, पण ती अनेकांना जाणवली नाही. त्यातल्या अनेकांनी आपल्याला तरी काही लाट दिसत नाही अशा शब्दात मोदी लाट या कल्पनेचीच कुचेष्टा केली. परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना मोदी लाट मान्य करावी लागली. याच लोकांनी आता मोदी लाट ओसरली आहे, असा प्रचार करायला सुरुवात केली होती. लोकसभेची गणिते वेगळी असतात आणि विधानसभेची गणिते वेगळी असतात, त्यामुळे विधानसभेत मोदी लाट दिसणार नाही असा त्यांचा अंदाज होता.

अशा लोकांच्या या म्हणण्याला बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांतील निकालांनी आधारच मिळाला. कारण या पोटनिवडणुकांत भाजपाच्या अनेक जागा गेल्या. त्यामुळे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि माध्यमातले मोदी कावीळ झालेले काही लालभाई मोठ्या आनंदाने मोदी लाट ओसरली, ओसरली म्हणून नाचायला लागले. विधानसभेच्या निवडणुकीत आता मोदी लाट चालणार नाही असे त्यांनी जाहीरच करून टाकले. एका निवडणुकीत जे वातावरण असते ते दुसर्‍या निवडणुकीत नसते हे त्यांचे म्हणणे खरे आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत जे वातावरण होते ते पोटनिवडणुकांत राहिले नव्हते. परंतु या लोकांना एक गोष्ट समजत नाही की, पोटनिवडणुकीत जे वातावरण होते ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा राहिलेले नाही. पोटनिवडणुकांच्या वेळी मोदी लाट त्या राज्यात आली नव्हती पण आता तसे झालेले नाही. महाराष्ट्रात मोदी लाट पुन्हा एकदा तेही मोठ्या तीव्रतेने आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जाहीर सभा घ्यायला सुरुवात करण्याच्या आधी मोदी लाटेचा काही पत्ता लागत नव्हता. पण मोदी यांच्या सभांनी सारे वातावरण बदलून गेले आहे. मोदींच्या सभा कोठे आयोजित कराव्यात याचे सुद्धा व्यवस्थित नियोजन केले गेले आहे. या सभांचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की, त्यांचे विरोधक मोदींनी सभा घ्याव्यात की नाही यावरच वाद घालायला लागले आहेत. पंतप्रधानांनी अशा सभा घेऊन पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा पणाला लावली आहे असा एक विचित्र शोध या लोकांनी लावला आहे. खरे म्हणजे देशाचे पंतप्रधान जेवढ्या लहान गावात जातील तेवढे चांगले, कारण तिथल्या सामान्य माणसांची दु:खे त्यांना कळू शकतात. परंतु मोदींच्या विरोधकांनी पंतप्रधानांनी तालुका पातळीवर जाणे हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे असा दुष्ट प्रचार सुरू केला आहे. त्यांनी काहीही म्हटले तरी गेला पूर्ण आठवडा महाराष्ट्रामध्ये जबरदस्त मोदी लाट उसळलेली आहे. या आठवड्यापूर्वी मोदी लाटेविषयी साशंकता होती, अनिश्‍चिचतता होती आणि या अनिश्‍चिततेमुळे शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात मोदी लाट नसून शिवसेनेचीच लाट आहे असा भास व्हायला लागला होता पण मोदींच्या सभा व्हायला लागल्या आणि शिवसेनेच्याही प्रचारातला रंग उडत चालला. युती मोडली नसती तर बरे झाले असते असे शिवसेनेला वाटणार आहे.

Leave a Comment