थरुर यांचा फुटबॉल

shashi
कॉंग्रेसचे नेते शशी थरुर हे नेमके काय रसायन आहे हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. किंबहुना ते कॉंग्रेसच्या राजकारणात आले कसे, तिथे मंत्री झाले कसे याबद्दल सगळ्यांनाच कोठे पडलेले आहे. ते कॉंग्रेसचे नेते म्हणवतात आणि केंद्रातल्या यूपीए सरकारने त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री केले होते. ते एवढ्या वरच्या स्तरावर चढलेच कसे या प्रश्‍नाने त्यांच्या केरळ राज्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते चकित झालेले होते. कॉंग्रेस पक्षात एवढ्या वरच्या स्तरावर पोहोचण्यासाठी तळागाळातून काम केलेले असले पाहिजे. तरुणपणी युवक कॉंग्रेसमध्ये नंतर विविध पातळ्यांवर काम केल्याशिवाय एखादा माणूस केंद्रीय पदावर जातोच कसा प्रश्‍नच आहे. मात्र शशी थरुर हा प्रकार जरा वेगळा आहे. ते संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये अधिकारी होते. स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर ते बरेच वरही चढलेले होते. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीस पदासाठी ते निवडणुकीलासुध्दा उभे होते. अर्थात ते पराभूत झाले ही गोष्ट वेगळी पण एवढी उच्चस्तरावरची निवडणूक लढवण्याइतक्या वरच्या पदावर गेलेला कोणीतरी भारतीय माणूस तिथे आहे हे तरी लोकांच्या लक्षात आले.

अशा प्रकारचे हे शशी थरुर जेव्हा तिथली नोकरी संपवून परत आले तेव्हा कॉंग्रेसमध्ये शिरले आणि त्यांची ती पात्रता बघून कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षात प्रवेशही दिला आणि खासदार करून मंत्रिमंडळातही घेतले. यूनोमध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांना परराष्ट्र खात्यात मंत्री करण्यात आले. ते कॉंग्रेसमध्ये गेले असले तरी कॉंग्रेसमध्ये सुखाने नांदतील असे काही त्यांचे गुण नाहीत. प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिकच असते. त्यामुळे त्याचा विवाह हा सार्वजनिक चर्चेचा विषय होता कामा नये पण तरीसुध्दा भारतातले लोक अशा गोष्टींना महत्त्व देतात आणि शशी थरुर यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी दुसरा विवाह केला. कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या या विवाहाची तशी काही दखल घेतली नाही ही गोष्ट वेगळी. पण त्यांची ही दुसरी पत्नी संशयास्पदरित्या मरण पावली. याचे मात्र पडसाद उमटले. शशी थरुर हा माणूस आहेच मोठा वादग्रस्त. कारण त्याने कॉंग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात काही विधाने केली आहेत. मागे एकदा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना साध्या राहणीचा आदेश दिला. विमानाने प्रवास करताना तो बिझनेस क्लासने करावा आणि पैसे वाचवावेत वगैरे सूचना केल्या. पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांचा हा खटाटोप होता. अर्थात, कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याला तो मानवणारा नव्हता. त्यामुळे सोनियाजींचा आदेश कोणीच पाळला नाही.

शशी थरुर यांनी मात्र तो केवळ पाळलाच नाही असे नव्हे तर त्याची जाहीरपणे टवाळी केली. तेव्हापासूनच ते कॉंग्रेसमध्ये वादग्रस्त ठरले. आयपीएल क्रिकेटमध्ये त्यांच्या पत्नीची फ्रँचायझी होती. तिच्यासाठी त्यांनी पैसे कोठून आणले यावरून वाद झाला आणि थरुर यांच्या अंगावर हे प्रकरण शेकले. त्यावर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. नंतर पुन्हा आत घेण्यात आले. या सगळ्या भानगडींमुळे शशी थरुर यांच्या केरळ राज्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी थरुर यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी लावून धरली. ऍड. राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी किंवा प्रशांत भूषण असे उप्द्व्यापी बुध्दीमान लोक फार त्रासदायक असतात. त्यांना धड जवळही करता येत नाही आणि दूरही लोटता येत नाही. ते कोणाला कधी अडचणीत आणतील याचा काही नेम सांगता येत नाही. म्हणून कॉंग्रेसने त्यांच्यावर फार कडक कारवाई केली नाही आणि पुन्हा त्यांना लोकसभेवर निवडून आणले.

आता ह्या थरुर महाशयांनी कॉंग्रेस पक्षाला अडचणीत आणायला सुरूवात केली आहे. नरेंद्र मोदी हा माणूस कसाही असला तरी त्याने कॉंग्रेस पक्षाचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या एखाद्या नेत्याने नरेंद्र मोदींची स्तुती करणे हे सोनिया गांधींसारख्या वरिष्ठ नेत्यांना पचणारे नाही. पण शशी थरुर यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतीचा वर्षाव करायला सुरूवात केली. मोदींनी आपल्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रतिनिधींना बोलावले यावर थरुर यांनी त्यांची प्रशंसा केली. नंतरही एकदोन प्रसंगामध्ये त्यांनी मोदींचे अभिनंदन केले. २ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरू केले त्यावेळी मात्र हद्द झाली. शशी थरुर त्या स्वच्छता अभियानात पहिल्या ९ माननीय पाहुण्यांमध्ये समाविष्ट होते. याबाबतचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. आपल्या हातून अभियानाचे उद्घाटन केले आणि अर्थातच ट्विटरवरून त्यांची प्रशंसाही केली. यावेळी मात्र कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना काही प्रमाणात का होईना पण शासन करण्याचे ठरवले आहे आणि त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हटवले आहे. पक्षाचा आदेश मानून तो स्वीकारत आहोत असे म्हणत त्यांनी हा निर्णय स्वीकारला आहे. अर्थात, त्यापेक्षा ते वेगळे काही करू शकत नाहीत. परंतु हा माणूस एक दिवस कॉंग्रेसला प्रचंड अडचणीत आणू शकतो. कॉंग्रेसचे नेते त्यापासून सावध आहेत. परंतु ते काहीच करू शकत नाहीत. गले की हड्डी. धड गिळताही येत नाही आणि धड बाहेरही काढता येत नाही.

Leave a Comment