
मराठवाड्यात आता राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे या दोन मित्रांची अनुपस्थिती चांगलीच जाणवते आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ जागांपैकी सहा जागा भाजप सेनेने जिंकल्या तर कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या. मात्र आता हे चारही पक्ष वेगवेगळे लढत असल्याने चित्र खूपच अस्पष्ट असल्यासारखे आहे. कोण कोणाची मतविभागणी कोठे कसे करतो याला काही मापदंड नाही. प्रत्येक मतदारसंघात वेगळी स्थिती आहे. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले असल्याने जी समीकरणे बदलली आहेत ती सुद्धा अनाकलनीय आहेत. असे हे चित्र असले तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती ही की भारतीय जनता पक्षाची स्थिती या निवडणुकीत चांगलीच राहणार आहे. हा अंदाज कोणालाही अगदी छातीठोकपणे सांगता येईल. याचे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी अगदी नीचांकाकडे गेली हेाती. त्यामुळे आता भाजपला या निवडणुकीत गमावण्यासारखे काहीच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बीड जिल्ह्यातील परळी आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर राखीव या दोनच जागा मिळाल्या होत्या. उदगीरहून सुधाकर भालेराव आणि परळीहून पंकजा मुंडे हे दोघे विजयी झाले होते. मात्र आता परिस्थिती खूपच बदलली आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अनेक उमेदवार शिवसेनेने भाजपविरोधी उमेदवारांना मते देवून पराभूत केले होते अशी चर्चा जोरात होती. यावेळी शिवसेना उघडपणे विरोधात उभी आहे. शिवसेनेची मते गेल्यावेळी भाजपविरोधकाना मिळाली होती ती आता शिवसेना उमेदवारांनाच मिळतील. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशी मतविभागणी प्रत्येक मतदारसंघात आहेच या सर्वाचा फायदा भारतीय जनता पक्षाला होवून भारतीय जनता पक्षाच्या जागा मराठवाड्यात किमान एक डझनने वाढतील असा अंदाज व्यक्त होत आहे. मराठवाड्यात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्या सभा झाल्या. मात्र नरेंद्र मोदी यांच्या बीड, औरंगाबाद, हिंगोली येथील सभांना प्रचंड गर्दी झाली होती. अजूनही मराठवाड्यात मोदी लाट आहे असे या सभांमधून जाणवले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष, मराठवाढ्यातील औद्योगिक विकास, पर्यटनविकास, शेतकर्यांच्या आत्महत्या, कृषी आधारित उद्योग या विषयांवर निवडणुकीत चर्चा फार कमी झाली. स्थानिक प्रश्न काही प्रमाणात चर्चिले गेले मात्र मराठवाड्याच्या विकासाचे, जायकवाडीच्या पाण्याच्या समस्येची चर्चा म्हणावी तेवढी झाली नाही. विशेष आश्चर्याची गोष्ट ही की मराठवाड्यात आठपैकी ज्या दोन लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळविला होता त्या जिल्ह्यातच अनेक कार्यकर्ते कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे विरोधक असलेले कॉंग्रेसजन कॉंग्रेस सोडून बाहेर पडले आहेत. त्यापैकी कट्टर अशोक चव्हाण विरोधक असलेले प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेत गेले आणि ते लोहा मतदारसंघात लढवत आहेत.
मराठवाड्यात यावेळी भाजपला ऍडव्हाण्टेज
अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव खतगावकर, राठोड बंधू, डॉ. माधव किन्हाळकर, दिलीप कंदकुर्ते असे अनेक नेते भारतीय जनता पक्षात आले आहेत. हिंगोलीत जि. प.चे उपाध्यक्ष मिलिंद यंबल हे भाजपमध्ये आले आहेत. उस्मानाबाद येथे संजय पाटील दुधगावकर हे कॉंग्रेसमधून, गंगापूरचे विद्यमान आ. प्रशांत बंब हे अपक्ष, गंगाखेडमधील गुट्टे, परभणीतील आनंद भरोसे, आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे, लातूर येथे शैलेश लाहोटी, औरंगाबादमधील किशनचंद तनवाणी, जालन्यात माजी आ. अरविंद चव्हाण हे भाजपमध्ये आले असून त्यापैकी अनेकजण आपापल्या ठिकाणी उमेदवारी मिळवून निवडणूक लढवत आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे पालवे यानी जी संघर्ष यात्रा काढली त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. शोकसंतप्त वंजारा समाज पंकजा मुंडे यांना आपला आवाज या स्वरूपात पाहतो आहे. यामुळे बीड जिल्ह्यात जोरदार मुंडे लाट आहे. मोदी लाट आणि मुंडे लाट एकत्र आली आहे. तेथे लोकसभेची पोटनिवडणूक आहे. मुंडे यांची दुसरी कन्या डॉ. प्रीतम खाडे ही लोकसभा पोटनिवडणुकीस उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात मातब्बर उमेदवार नाही. लोकसभेला कमळाला मतदान देणारा मतदार तेथेच विधानसभेला वेगळा विचार करेल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी किमान चार जागा भाजपकडे जातील असे चित्र आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची ताकद कमी होईल आणि भाजपची ताकद वाढेल असे चित्र दिसू लागले आहे.
