अमित देशमुखांना निवडणूक सोपी नाही

amit-deshmukh
लातूर मतदारसंघात अमित देशमुख सहज विजयी होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती खोटी आहे. गेल्या निवडणुकीत ९० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने अमित देशमुख निवडून आले असले तरी आता परिस्थिती खूप बदलली आहे. महत्त्वाचा बदल हा आहे की आता विलासराव देशमुख नाहीत. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर लातूरची शान आणि महत्त्व राखण्यात अमित देशमुख यांना तितकेसे यश आलेले नाही. दरम्यान लोकसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुनील गायकवाड हे तब्बल अडीच लाख मतांचे मताधिक्य घेवून विजयी झाले. अशातच लातूरमधील काँग्रेसचे एक मातबर कार्यकर्ते शैलेश लाहोटी यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांनाच अमित देशमुख यांच्या विरोधात उभे केले आहे. लाहोटी कुटुंबियांबाबत लातूरमध्ये मोठी आत्मियता आहे. लाहोटी यांची प्रतिमा राजकारणी म्हणून कमी आणि सामाजिक कार्यकर्ते अशी जास्त आहे. या प्रतिमेचा त्यांना मोठा उपयोग मोदी लाटेत मते मिळण्यासाठी होणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर मतदारसंघात मुर्तजा पठाण यांना उमेदवारी दिली आहे. मुर्तजा पठाण अल्पसंख्याक समाजात लोकप्रिय असलेले कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी विभागणी करण्यात त्यांना यश येईल असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत बसपा उमेदवाराने वीस हजार मते घेतली होती. आताही बसपाचा उमेदवार असल्याने तो अमित देशमुख यांच्याच मतांची विभागणी करण्याची शक्यता आहे. कल्पना गिरी प्रकरणापासून लातूर शहरात काँग्रेसबाबत नकारात्मक चर्चा जास्त आहे. काँग्रेस आघाडी सरकारबाबतची नाराजी, काँग्रेसच्या हमखास मतांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा करणार असणारी मतविभागणी या उलट शैलेश लाहोटी यांची चांगली प्रतिमा, शिवसेनेचा कमजोर उमेदवार या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून अमित देशमुख यांना ही निवडणूक खूपच जड जाणार आहे. लातूरचा मुख्यमंत्री अनेक वर्षे असूनही लातूरमध्ये महिन्यात फक्त दोनवेळा नळाला येणारे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकेचे अपयश या दोन समस्यांची खदखद लातूरकरांच्या मनात आहे. विलासरावांना एकदा मामुली झटका देवून पराभवाची चव चाखण्याचा चमत्कार लातूरकरांनी घडविला होता. आता तोच चमत्कार पुन्हा झाला तर आश्चर्य वाटायला नको.

Leave a Comment