ठाकरे बंधू एक होतील?

combo1
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे एक होतील का असा प्रश्‍न विचारला जात आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून म्हणजे ९ वर्षांपासून हा प्रश्‍न वारंवार विचारला जात आहे. त्याचे उत्तर काय येईल? ठाकरे बंधू कधी एक होतील? जेव्हा महाराष्ट्राताल रिपब्लिकन गट एक होतील तेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील. म्हणजेच रिपब्लिकन गटांचे एकत्रिकरण जेवढे अशक्य आहे. तेवढेच ठाकरे बंधूंचे एकत्र येणे अवघड आहे. त्यांनी एकत्र यावे अशी स्थिती गेल्या दहा वर्षात अनेकदा निर्माण झाली. परंतु या दोघांचे स्वभाव आडवे आले आणि एकत्रिकरण होऊ शकले नाही. हे दोन भाऊ वेगळे झाले तेव्हाच हे वेगळेपण निष्कारण आहे हे सर्वांनाच लक्षात आले होते. त्यातल्या त्यात शिवसेनेच्या चाहत्यांना ही फूट फार खटकत होती. ही फूट काही धोरणात्मक मुद्यावरून झाली नव्हती. ती प्राधान्याने अहंकारातून झाली होती. फार तपशीलाने सांगायचे तर ही फूट संवादाच्या दरीमुळे निर्माण झाली होती. तो संवाद पुन्हा सहज साधला जाईल आणि जे काही गैरसमज असतील ते दूर केले जाऊन हे दोन भाऊ एक होतील असे अनेकांना वाटत होते. तसा प्रयत्न काही चाहत्यांनी केलाही. पण काही ना काही कारण पुढे येत गेले आणि एकत्रीकरण पुढे ढकलले जायला लागले.

अशा एकत्रीकरणाचे प्रयत्न कोणी करीत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, दोघांचीही मनस्थिती बघूनच हे प्रयत्न केले पाहिजेत. अशा लोकांच्या मनात भावनेचे झोके सुरू असतात, अन्य काही पक्षांचे काही वाईट अनुभव आले की, त्यांच्या मनात नकळतपणे असा विचार येतो की, यापेक्षा आपल्या घरातली फूट सांधून आपल्याच भावाशी युती केलेली काय वाईट ? एकाच्या मनात असा काही विचार येतो तेव्हाच दुसर्‍याही बाजूला त्यास अनुकूल असे विचार येत असतील आणि अशा मन:स्थितीत एकीचा प्रस्ताव पुढे केला तर त्यातून काही तरी निष्पन्न होऊ शकते. या बाबतीत प्राथमिक प्रयत्न झाले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांस इच्छुक होते पण राज ठाकरे यांची मन:स्थिती तशी नव्हती. ते विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवत होते. त्यांना फार अपेक्षा होत्या. आपण फार मोठी शक्ती म्हणून पुढे येणार अशी त्यांनाच खात्री वाटायला लागली होती. त्यामुळे त्यांना कोणाच्याच मदतीची आणि युतीची काही गरज नव्हती. त्यामुळे त्यांनी टाळी मिळणार नाही अशा शब्दात एकीच्या प्रयत्नांना खो घातला. टाळीसाठी कोणी हात पुढे केला तरीही टाळी मिळणार नाही असे बजावले. त्यानंतर बरेच दिवस एकीच्या प्रयत्नांना खिळ बसली.

भाजपाने राज ठाकरे यांना हरबर्‍याच्या झाडावर चढवले. ते फार मोठे नेते आहेत तेव्हा शिवसेनेला फाटा देऊन मनसेशीच युती करावी असा विचार भाजपातल्या एका गटाने त्यांच्याशी गुफ्तगू सुरू केले. त्यामुळे राज ठाकरे याच्या मनात पुन्हा एकदा आपल्या शक्तीबद्दल भ्रम निर्माण झाला आणि त्यांच्याकडून एकीच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळेनासा झाला. लोकसभेची निवडणूक संपली आणि मनसे किती पाण्यात आहे याची राज ठाकरे यांच्यासह सर्वांनाच कल्पना आली. भाजपाच्या नेत्यांनी तर ते ओळखलेच. राज ठाकरे यांना चोरून चोरून भेटून त्यांची आपल्याला फार गरज आहे असे दाखवणार्‍या भाजपाच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना हिंग लावूनही विचारलेले नाही. शिवसेनेने मात्र लोकसभेच्या १८ जागा मिळवल्या. आता उद्धव ठाकरे यांना आपल्या शक्तीचा अंदाज आला आणि ते मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पहायला लागले. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत २४ जागा मिळवलेल्या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या या २४ जागा राज्यात शिवसेनेची लाट आल्यामुळे मिळाल्या आहेत असा त्यांना भ्रम झाला. तेव्हापासून त्यांनी राज ठाकरे यांची दखल घेणे बंद केले. या दोघांच्या मनात किती आणि कशी कशी चलबिचल होत होती याचे दर्शन यावरून ़घडते. अर्थात राजकारणात बदल होत असतात आणि त्यानुसार नेत्यांचा नूरही बदलत असतो.

शिवसेनेची भाजपाशी असलेली युती तुटताच उद्धव ठाकरे यांचा नूर बदलला. भाजपाने युती तोडली तरी आपण मनसेशी जमवून घ्यावे असे त्यांच्या मनाने घेतले. याच काळात राज ठाकरे हेही भाजपाच्या खाणाखुणांची वाट पहात होते आणि भाजपाकडून त्यांना काहीही इशारा मिळेनासा झाला होता. त्यामुळे त्यांनाही भावाशी जमवून का घेऊ नये असे वाटायला लागले. त्यातल्या त्यात त्यांना नाशिकमध्ये भाजपाने टांग मारली तेव्हा त्यांना तिथली सत्ता टिकवण्यासाठी सरळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस समोर पदर पसरावा लागला. त्यावेळी त्यांना नक्कीच असे वाटले असेल की आपण ज्यांच्या विरोधात सातत्याने टीका करतो त्यांच्या समोर आपल्याला पदर पसरावा लागत आहे त्यापेक्षा सरळ सरळ आपल्या भावासमोरच नमते का घेऊ नये ? अशा मनस्थितीत काही वैचारिक गोष्टीही भर टाकत असतात. या दोन्ही पक्षांनी परराज्यातल्या नागरिकांचा मुद्दा लावून धरला आहे. फिरून फिरून तोच विषय काढता काढता त्यांनाही या विषयाच्या मर्यादा कळून चुकल्या आहेत. त्यामुळे आता या दोघांच्या विचारातले अंतरही कमी झाले आहे. तेव्हा आपण आपला हा पक्ष उगाच का सुरू ठेवत आहोत अशी उपरतीची भावना राज ठाकरे यांच्या मनात आली असल्यास काही नवल नाही. म्हणूनच त्यांनी एकीचा प्रयत्न करणारांना अनुकूल प्रतिसाद दिला होता. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. कारण उद्धव ठाकरे यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्याची खात्री वाटत आहे. त्यांचे स्वप्न काहीही असो पण त्या स्वप्नाऐवजी वस्तुस्थिती पाहून या दोघांनीही आपल्या एकीकरणाकडे पावले टाकयला सुरूवात करायलल हवी.

Leave a Comment