चाचण्यांचा कल

vidhansabha
निवडणुकीच्या काळात केल्या जाणार्‍या मतदारांच्या चाचण्या या खर्‍याच मतदारांच्या मनाचा कौल दर्शवितात का असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. अशा चाचण्या घेतल्या जाणून त्यांचे निष्कर्ष जाहीर झाले की, त्यावर उलटसुलट चर्चाही होते. अशा चाचण्या कोणी धुडकावतात. ते निष्कर्ष ज्यांच्या सोयीचे नसतात त्यांना ते निष्कर्ष नकोसे असतात पण ज्यांना ते अनुकूल असतात त्यांचा हुरूप त्या निष्कर्षांनी वाढतो. त्या चाचण्यांचे नंतर काय होते हे आपण फार काळजीने पहात नाही. आपल्याला उत्सुकता असते. निवडणुकीच्या पूर्वी ती उत्सुकता पुरी करण्याचे काम हे निष्कर्ष करतात. शेवटी ते आपल्या मनाचे समाधान करून घेणे असते. प्रत्यक्षात निकाल जाहीर होतात तेव्हा समोरच निकाल असल्यामुळे त्या आधीच्या अंदाजांची आठवण आपल्याला होत नाही. झाली तरी त्यांचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष निकाल यांची पडताळणी कोणी करीत बसत नाहीत. तरीही हे अंदाज काही पक्षांचा हुरूप वाढवणारे असतात हे नाकारता येत नाही. शिवाय या अंदाजांचा वापर प्रचाराचे एक साधन म्हणूनही केला जात असतो. तर असे हे महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज आता प्रकट झाले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वेक्षणांच्या आकड्यांविषयी मोठ्या कुचेष्टेने बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात निकाल लागले तेव्हा सर्वेक्षणांनी दाखवलेली दिशा बिनचूक ठरली. भाजपाच्या हातात सत्ता आली. मात्र सर्वेक्षणात दाखवल्यापेक्षा अधिक जागा भाजपला मिळाल्या. आताही सर्वेक्षणांचे आकडे समोर आले आहेत आणि या सर्वेक्षणांमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर १ चा पक्ष असेल असे दिसत आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारचे एक सर्वेक्षण केले गेले आणि त्यामध्येही भाजपाला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवले असले तरी या पक्षाला शंभरापेक्षा अधिक जागा मिळतील असे कोणी म्हणत नव्हते. आता मात्र एका सर्वेक्षणात भाजपाला १०५ जागा मिळतील असे दाखवलेले आहे तर द वीकच्या सर्वेक्षणात भाजपाला १५४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार किंवा स्पष्ट बहुमताला दहा-वीस जागा कमी पडतील इथंपर्यंत भाजपा मजल मारणार असा एकंदरीत निष्कर्ष आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील जनतेची मनःस्थिती अजूनही कायम आहे. नरेंद्र मोदींना मत दिले पाहिजे ही भावना अजूनही आहे. एवढेच नाही तर मोदी लाट लोकसभा निवडणुकीच्या वेळच्या लाटेपेक्षा मोठी झाली आहे. तिला शरद पवार, राज ठाकरे, उध्दव ठाकरे इत्यादी मोदी विरोधकांनी नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करून ही लाट मोठी करायला हातभार लावला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाने जी चूक केली तीच चूक आता हे तिघे करत आहेत. सगळ्यांनी मिळून नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले तर मतदारांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अपेक्षेप्रमाणे नाराजी निर्माण होत नाही. उलट ज्या व्यक्तीवर सगळेच लोक टीका करतात त्यांच्याविषयी सहानुभूती आणि आकर्षण निर्माण होते. म्हणजे हे तिघे नरेंद्र मोदींवर टीका करून त्यांचेच काम करीत आहेत. ती टीकाही तकलादू आहे आणि तिच्याने मोदी यांची काहीही हमी होत नाही. उलट नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यांच्या हिंगोली येथे झालेल्या सभेत तर त्यांनी स्वतःच समोरची गर्दी बघून आश्‍चर्य व्यक्त केले. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदी लाट होती परंतु त्या लाटेतसुध्दा एवढी मोठी सभा आपण कुठेच पाहिली नाही असे मोदी म्हणाले. म्हणजे ठाकरे बंधू आणि शरद पवार मोदी लाट ओसरल्याचे म्हणत असले तरी ते काही खरे नाही. उलट मोदी लाट लोकसभेपेक्षा अधिक तीव्र होऊन या सर्वांना भुईसपाट करायला सिध्द झाली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला नरेंद्र मोदींनी स्पष्ट बहुमतासह निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे काही परिणाम होत असतील तर ते भाजपासाठी अनुकूलच होणार आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत द्यायचे असेल तर ते भाजपालाच दिले पाहिजे असे लोकांना वाटावे इतपत अनुकूल वातावरण निर्माणही झालेले आहे. या लढाईमध्ये शिवसेना कोठे राहील हेही दिसत आहे. शिवसेनेला या निवडणुकीत ४५ ते ५७ च्या दरम्यान जागा मिळतील असा या सर्वेक्षणांचा अंदाज आहे. म्हणजे शिवसेना २००९ सालच्या पातळीपेक्षा साधारण दहा-बारा जागांनी पुढे जात आहे आणि असा निकाल लागला तर शिवसेनेला आपली खरी शक्ती कळणार आहे आणि भाजपाशी युती केली असती तर बरे झाले असते असे त्यांना वाटणार आहे. अर्थात बहुमताची समीकरणे नेमकी कशी निर्माण होतात हे अजूनही शंभर टक्के खात्रीने सांगता येत नाही. परंतु शिवसेनेला फार मोठी संधी नाही याचा अंदाज आलेला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कितीही बढाया मारल्या तरी त्यांची खरी शक्ती एवढीच आहे. त्यामुळे त्यांनी तिची जाणीव ठेवून भाजपाशी युती टिकवायला पाहिजे होती. आता हातून बाण सुटलेला आहे. शिवसेनेला धनुष्यबाण नीट हाताळता आलेला नाही. आता उध्दव ठाकरे यांच्यासमोर राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करणे हाच एक उत्तम उपाय राहिलेला आहे. सर्वेक्षणांचा निकाल असेही सांगतो की राज ठाकरे यांनासुध्दा पुढच्या काळात फार मोठे भवितव्य असणार नाही.