पुन्हा ‘आघाडी’ होणे अशक्य – शरद पवार

pawar
मुंबई – महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पुन्हा कॉंग्रेससोबत आघाडी अशक्य असल्याचे राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षातील मंत्र्यांवर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझे लक्ष पक्षाला बहुमत मिळवून देण्याकडे आहे. त्यामुळे आता आघाडी होणे शक्य नाही, असे म्हणत पवारांनी पुन्हा आघाडी होण्याच्या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करण्यात मग्न असणाऱ्या पवारांना यावेळी मात्र भाजपावर सौम्य भाषेत आरोप केल्याचे दिसून आले. याशिवाय २५ वर्षांची युती तुटण्याचे कारण राष्ट्रवादी असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. परंतु प्रत्येक वेळी राज यांच्या व्यक्तव्याला सडेतोड उत्तर देणारे शरद पवार यावेळी मात्र थंडच होते. तसेच निवडणुकीनंतर पुन्हा कॉंग्रेस किंवा भाजपसोबत नविन आघाडी बनविण्याबाबत उत्तर देणे त्यांनी प्रकर्षाने टाळले. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, निवडणुकीत जनमताने कॉंग्रेसला धुडकावून नरेंद्र मोदींना आपली पहिली पसंती दर्शविली आहे. दोन्ही कॉंग्रेसने महाराष्ट्रावर १५ वर्ष सत्ता चालवली. परंतू मागील चार वर्षांपासून खूपच वाईट काम केली, अशी कबुली देत पवारांनी चुकीचे खापर पृथ्वीराज चव्हाणांवर फोडले आहे. निर्णय घेण्यास विलंब लावत असल्याने कामे अपूर्णच राहिली असे त्यांनी सांगत थेट कॉंग्रेसवर निशाणा साधला.

Leave a Comment