पाकिस्तानला धडा शिकवणार

pakistan
भारत आणि पाकिस्तान यांच्या चकमकींमध्ये नेहमी भारताला पडती बाजू घ्यावी लागते. कारण आपल्या देशात हा प्रश्‍न राजकीय पातळीवरून हाताळला जातो. म्हणून पाकिस्तान सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्याने हल्ला केला की आपले नेते त्यांना इशारे देतात. पण इशारे ऐकून फारसा फरक पडत नाही. पाकिस्तानचे हल्ले वाढतच चालले आहेत. पाकिस्तानचे हल्ले सहन करणारे भारतीय जवान फार अस्वस्थ असतात. आपल्याला सरकारने एकदा परवानगी द्यावी, आपण पाकिस्तानला आठवडाभरात शरण आणू शकतो असे त्यांचे म्हणणे असते आणि त्यासाठी त्यांचे हात शिवशिवत असतात. मात्र सरकार सबुरीचे धोरण स्वीकारते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला त्याच्या पध्दतीने हा प्रश्‍न हाताळण्याची मोकळीक दिली आहे. या गोष्टीचा अर्थ जनतेला चांगलाच कळतो. आता आठवडाभरात भारताचे लष्कर पाकिस्तानला शरण काही आणणार नाहीत पण निश्‍चितच असा धडा शिकवेल की पाकिस्तान पुन्हा भारताची आगळीक करणार नाही. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या आठवडाभरात तर अतिरेकच झाला. पाकिस्तानने केवळ गोळीबार न करता भारतीय हद्दीत तोफांचाही भडीमार सुरू केला.

एरवी अशा गोळीबाराच्या घटना घडतात तो गोळीबार पाकिस्तानातल्या अतिरेक्यांना भारतात घुसता यावे यासाठी केलेला असतो. म्हणजे एका बाजूला गोळीबाराच्या फैरी सुरू झाल्या की दुसर्‍या बाजूला भारताकडून उत्तर दिले जाते आणि अशा चकमकी जारी राहिल्या की त्या गडबडीचा फायदा घेऊन दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसतात. तेव्हा दहशतवाद्यांना कव्हर म्हणून केल्या जाणार्‍या या गोळीबाराबरोबरच घुसखोरांनाही गोळ्या घातल्या जातात. हे गेल्या काही वर्षांपासून घडत आलेले आहे. पण सध्या पाकिस्तानची जी हरकत सुरू आहे ती केवळ दहशतवाद्यांना संरक्षण देणारी नाही. कारण या हल्ल्यांचे स्वरूप वेगळे आहे. ते एवढे तीव्र स्वरूपाचे आहे की सीमेवरच्या कित्येक गावातील शेकडो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. अशा या हल्ल्यांना भारतीय सैनिक नेहमीच उत्तर देत आले आहे. आताही तसे उत्तर दिले जात आहेच. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय हद्दीतील पाच नागरीक मारले गेले आहेत आणि काही जवान जखमी झाले आहेत. या निमित्ताने केल्या जाणार्‍या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैनिकांनी जशास तसे उत्तरही दिलेले आहे. अलीकडच्या काळात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दोन तीन वेळा इशारा देऊन आता आपल्याला लष्कराला त्यांना योग्य वाटेल त्या पध्दतीने कारवाई करण्याची मोकळीक दिली आहे.

भारतीय सैन्य त्यांच्या हद्दीत घुसून प्रतीचढाई करील असेही म्हणता येत नाही. कारण भारताचे धोरण आक्रमक नाही. पाकिस्तान हे बेजबाबदार राष्ट्र असल्यामुळे स्वतःच्या शक्तीचा विचार न करता ते वाट्टेल तशी कारवाई करू शकते. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात मिळणार्‍या प्रतिष्ठेची त्याला तमा नाही. भारताचे धोरण तसे नसल्यामुळे आणि भारताला कायद्याच्या आधारावर चालणारे शांतताप्रिय राष्ट्र म्हणून आपली प्रतिष्ठा टिकवायची असल्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये घुसखोरी करू शकत नाही. सभ्यपणा ही आपली अडचण झाली आहे. मात्र सभ्यपणालाही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा आता संपल्या आहेत. म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या कारवाया त्यांना किती महाग पडू शकतात हे समजून सांगण्याचे ठरवले आहे. म्हणूनच काल भारतीय सैन्याच्या हल्ल्यामध्ये १५ पाकिस्तानी लोक मारले गेले आहेत आणि भारत पाक सीमेवरच्या पाकिस्तानच्या २३ चौक्या उद्धवस्त झाल्या आहेत. आजवर कॉंग्रेस सरकारने हे केलेले नव्हते. भारताच्या या चढाईची उघड चर्चा करता येत नाही. पण ती नक्कीच पाकिस्तानचे कंबरडे मोडणारी आहे.

मात्र भारत सरकारचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री किंवा पंतप्रधान पाकिस्तानचे १५ लोक आपण ठार केले आहेत असे जाहीर करणार नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या त्या मर्यादा आहेत. अशा वेळी देशातल्या विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवे. हा मुद्दा निवडणुकीचा करता कामा नये. सीमेवर पाकिस्तानचा हल्ला होत असताना भारत सरकार काहीच करत नाही. असे त्यांनी जाहीर सभांत म्हणता कामा नये. त्यातून त्यांना मोदी सरकारचा कथित नाकर्तेपणा दाखवण्याची कदाचित संधी मिळत असेल परंतु त्यामुळे लोकांचे मनोधैर्य खचते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांना काही मर्यादा पाळाव्या लागतात. त्या पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सीमेवरची परिस्थिती नक्कीच शांत होईल असे सूचकपणे सांगत आहेत परंतु तेवढी समज नसणारे शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासारखे नेते पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा टोकत आहेत आणि सरहद्दीवर पाकिस्तानचे हल्ले होत असताना पंतप्रधान भाषणे देत फिरत आहेत अशी बालीश टीका करत आहेत. यांना देशाचे संरक्षण, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आपल्याला त्यात पाळाव्या लागणार्‍या मर्यादा याचे भान नाही. नरेंद्र मोदी यांच्या सभांना प्रचंड गदर्ी होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यांच्या सभांना लोकांचा जसा प्रतिसाद मिळत होता तसा आजही मिळत आहे. त्यामुळे या सभांनी राज ठाकरे आणि शरद पवार अस्वस्थ झाले आहेत आणि ती अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी ते सीमेवरील तणावाचा राजकीय वापर करत आहेत. आपण सुरक्षेच्या प्रश्‍नाकडेसुध्दा राष्ट्रीय दृष्टिकोनातून बघू शकत नाही याचे हे लक्षण आहे.

Leave a Comment