अहमदनगर जिल्ह्यात ५३ मतदान केंद्रे संवेदनशील

polling
अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रे संवेदनशील आणि ४२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. या सर्व ५३ मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येणार असून सर्वच मतदान केंद्रांवर होणा-या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

नगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि श्रीरामपूर या दोन विधानसभा मतदारसंघात एकही मतदान केंद्र संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील नाही. जिल्हा प्रशासनाने अतिसंवेदनशील म्हणून सुमारे ४२ मतदान केंद्र जाहीर केली आहेत. अकोले मतदारसंघात केळी ओतूर, पिंपळगाव माथा, वरूडी पठार, मालेगाव आणि आंबी खालसा हे पाच मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात घुलेवाडी अमृतनगर दोन मतदान केंद्र आणि कोकणेवाडी आणि चौधरीवाडी असे चार मतदान केंद्र अति संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. शिर्डी मतदारसंघात राहाता, कोल्हार बुद्रुक, लोणी बुद्रुक, निमगाव जाळी, हनमंत गाव, ओझर खुर्द, जोर्वे ही ७ मतदान केंद्र धोकादायक केंद्रांच्या यादीत आहेत. नेवासा मतदारसंघात कान्हेरवस्ती, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी ही तीन केंद्र तर शेवगाव मतदारसंघात दहिगावने, शेवगावमधील २ मतदानकेंद्र तसेच कासारा पिंपळगाव मधील तीन मतदान केंद्र आणि चितळीमधील २ मतदान केंद्र, डांगेवाडी, पाथर्डी मधील ३ केंद्र या प्रमाणे १२ मतदान केंद्र अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दहिगावाने हे राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचे तर कासार पिंपळ गाव हे भाजपा उमेदवार मोनिका राजळे यांचे आहे. राहुरीमध्ये कणगर बुद्रुक, चिंचविहीरे, राहुरी बुद्रुक, वांबोरी, शंकरवाडी, त्रिभुवनवाडी हे ६ केंद्र तसेच पारनेर मतदारसंघात वड गुप्तामधील २ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नगर शहर मतारसंघातील माळीवाडा येथील एक मतदान केंद्र तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघात शिंदे आणि राशीन ही दोन मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील सर्वाधिक १२ मतदान केंद्रे धोकादायक गटातील आहेत. याच मतदार संघातील सर्वाधिक चार मतदान संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. राहुरी मतदान संघात नगर तालुक्यातील बु-हाणनगर परिसरातील ४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. बु-हाणनगर हे राहुरीचे भाजप उमेदवार शिवाजी कर्डिले यांचे गाव आहे. श्रीगोंदा मतदार संघात पिंपळागाव पिसा, काष्टी या गावातील दोन मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यापैकी पिंपळगाव पिसा हे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांचे गाव असून काष्ट्री हे भाजपाचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे गाव आहे. कर्जत-जामखेड मतदार संघात थेरवडी आणि घेरवडी हे दोन केंद्र संवेदनशील आहेत.

Leave a Comment