विदर्भावर ठाम रहा

vidrbha
विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही असे घोषित केले आहे. खरे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विदर्भ निर्मितीला पाठींबा आहे, परंतु निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा आल्यामुळे महाराष्ट्रीयन मतदारांच्या भावना दुखावल्या जातील आणि भाजपाला मतदान होणार नाही या धास्तीने भारतीय जनता पार्टीने या संबंधातील उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची दखल घेऊन विदर्भाबाबत बचावात्मक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे हा फार जबाबदारीने बोलणारे नेते म्हणून आधीही लोकांना माहीत नव्हतेच, पण आताही ते एवढे बेजबाबदारपणे बोलायला लागले आहेत की, त्यांचे बोलणे अतार्किक तर आहेच पण सर्वांनाच शत्रू करून ठेवणारे आहे. त्यामुळेच त्यांच्या या स्वभावाला धरून त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपालाच शत्रू करून टाकले आहे. यदाकदाचित महाराष्ट्रात सरकार तयार करण्याच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरावी एवढ्या जागा शिवसेनेला मिळाल्याच तर कोणालाही मित्र म्हणून जवळ करता यावे असे धोरण असले पाहिजे आणि कोणाचाही टोकाचा द्वेष करता कामा नये हे उद्धव ठाकरे यांना कळेना.

आपण बाळासाहेबांसारखे बोलले पाहिजे अशा आविर्भावात ते सगळ्यांच्या विरोधात जिभेचा पट्टा चालवत आहेत. त्यांचे सल्लागार कोण आहेत हे माहीत नाही, पण युती तोडण्यापासून ते या प्रचारापर्यंत त्यांना चुकीचा सल्ला दिला जात आहे हे उघड दिसत आहे. कोणीतरी शिवसेनेत राहून उद्धव ठाकरे यांना बदसल्ला देऊन विनाशाकडे नेत आहे असे दिसते. त्यातूनच त्यांनी आता विदर्भाच्या मुद्यावरून रान पेटवायला सुरुवात केली आहे. भाजपाने त्यांच्या या प्रचाराची दखल घ्यायला नको आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करणार नाही ही भाजपाची भूमिका रास्त आहे आणि ती तेवढ्याच ठामपणे सांगितलीही पाहिजे, मात्र त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी हा पक्ष वेगळ्या विदर्भाचा समर्थक आहे हेही भाजपाच्या नेत्यांनी ठासून सांगितले पाहिजे. त्याबाबतीत कसलेही अनमान करता कामा नये. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा भाजपाला अडचणीचा ठरू शकतो म्हणून जाणीवपूर्वक मांडायला सुरुवात केली आहे. आपण जणू भाजपाशीच लढत आहोत अशा आविर्भावात ते भाजपाच्या विरोधात अतीशय अतार्किकपणे बोलत सुटले आहेत. मात्र त्याची एवढी दखल घेण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे मोदींच्या तुलनेत फारच लहान आहेत.

भारतीय जनता पार्टी लहान राज्यांची भूमिका मांडत असते. त्यामुळेच केंद्रात भाजपाचे सरकार असताना त्या सरकारने छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड ही तीन नवी छोटी राज्ये निर्माण केली. त्याच धर्तीवर तेलंगण आणि विदर्भ हीही दोन राज्ये निर्माण होणार होती, परंतु त्या सरकारला आंध्रामधून तेलुगु देसमचा आणि महाराष्ट्रातून शिवसेनेचा पाठींबा होता आणि हे दोन पक्ष त्या राज्यांच्या विभाजनाच्या विरोधात होते. आपल्या मित्रपक्षाचा आग्रह मानून भाजपा सरकारने त्यावेळी विदर्भ आणि तेलंगणाची निर्मिती टाळली. परंतु सातत्याने आपण विदर्भ आणि तेलंगणाच्या निर्मितीला अनुकूल आहोत ही भूमिका कायम ठेवली. पुढे पुढे तेलुगु देसमला सुद्धा तेलंगणाची निर्मिती अटळ आहे हे लक्षात आले आणि त्यांनी तेलंगण विरोध सोडून दिला. आता महाराष्ट्रात विदर्भाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भाजपा आणि शिवसेना यांची २५ वर्षे युती होती. परंतु युतीत असतानाच दोन्ही पक्षांनी विदर्भाविषयीची आपली भूमिका कायम ठेवली होती. विदर्भ राज्य निर्माण करणे म्हणजे महाराष्ट्र तोडणे आहे असे वाक्य शिवसेनेकडून वापरले जाते आणि त्यातूनच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे तुकडे करत आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. या प्रचारामुळे भाजपाचे नेते थोडे बचावात्मक पवित्र्यात आले आहेत आणि त्यांनी विदर्भाच्या मुद्यावर मौन पाळायला सुरुवात केली आहे.

खरे म्हणजे भाजपाने अशी बचावात्मक भूमिका घेण्याची काही गरज नाही. भाजपा विदर्भवादी आहे आणि सत्तेत आल्यास विदर्भ हे वेगळे राज्य करण्यासाठी भाजपा प्रयत्न करील असेच त्यांनी सांगितले पाहिजे. हे करताना शिवसेनेच्या प्रचारातला फोलपणा दाखवला पाहिजे. विदर्भ निर्माण होणार आहे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे होणार आहे आणि त्यात महाराष्ट्राचे नुकसान आहे हीच भूमिका मुळात चुकीची आहे. शिवसेनेने हा मुद्दा मराठी अस्मितेचा केलेला आहे. एखाद्या राज्याच्या प्रशासनाच्या दृष्टीने दोन वेगळे भाग निर्माण करणे या गोष्टीशी अस्मितेचा काहीच संबंध नसतो. भारताची विभागणी २९ राज्यात झालेली आहे हे काही भारताचे ‘तुकडे’ आहेत का? भारतात भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी एका भाषेचे एक राज्य व्हावे ही कल्पना स्वीकारली गेली, परंतु एका भाषेचे एकच राज्य व्हावे असे काही म्हटलेले नव्हते. तसे असते तर आजचा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड या सगळ्या हिंदीभाषक राज्यांचे एकच राज्य करावे लागले असते. यातल्या प्रत्येक राज्याचा कारभार हिंदीतूनच होतो, परंतु त्यांचे एकच राज्य असावे असा आग्रह धरता येणार नाही.

महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि त्यातून विदर्भ हे वेगळे राज्य निर्माण केले तर मराठी भाषा आणि संस्कृती यांचे काहीही नुकसान होणार नाही. हा अस्मितेचा मुद्दाच नाही, मुद्दा असेल तर तो गरिबीचा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग कमालीचे उपेक्षित आहेत. प्रगत पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भ कमालीचा मागे आहे. त्यामुळे विदर्भाचे छोटे राज्य निर्माण केले तर विदर्भाच्या विकासाला गती येणार आहे. झारखंड, छत्तीसगड या राज्यात असे दिसून आले आहे. त्यामुळे विदर्भ हे छोटे राज्य झालेच पाहिजे, भाजपाने याबाबतीत उद्धव ठाकरे यांच्या दु:प्रचाराचा विचार करून माघार घेण्याची काहीही गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी विदर्भ महाराष्ट्रात असणे हा अस्मितेचा मुद्दा आहे. शिवसेना हा पक्ष अशा भावनिक मुद्यावरच निर्माण झालेला आणि वाढलेला पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात हा मुद्दा उपस्थित करून त्यांना मते मिळवायची आहेत, परंतु देशात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या असणारा हा मागासलेला विदर्भ भाग उद्धव ठाकरे यांच्या अस्मितेवर जगू शकणार नाही. असली पोकळ अस्मिता काय चाटायची आहे का? अस्मितेवर पोट भरत नाही, अस्मितेवर प्रगती होत नाही आणि अस्मितेवर शेतीही पिकत नाही. तेव्हा अस्मितेचा विचार बाजूला ठेवून भाजपाने ठरवलेले विदर्भाविषयीचे धोरण कायम ठेवले पाहिजे.

Leave a Comment