मोदींच्या उर्जेने चकीत झालेले ओबामा योगा करणार

yog
वॉशिग्टन- अमेरिका वारीत नऊ दिवसांचे कडक उपास करत असूनही अदम्य इच्छा, ऊर्जेचे दर्शन घडविणार्‍या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूपच प्रभाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर पडला आहे. नऊ दिवसांत केवळ गरम पाणी पिऊनही ५० हून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावणार्‍या मोदींच्या या अथक ऊर्जेमागे ते करत असलेला नियमित योगाभ्यास कारणीभूत असल्याचे समजल्यावर अध्यक्ष चकीत झाले आहेत आणि त्यांनीही नियमित योगाभ्यास करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये सर्वप्रथम योगाची सुरवात करण्याचा मान फर्स्टलेडी मिशेल ओबामा यांच्याकडे जातो.

अमेरिका वारीवर जाण्यापूर्वीच ओबामा मोदींना शॉर्ट डिनर देणार या वार्तेने आणि त्यानंतर मोदींच्या नवरात्र उपवासामुळे व्हाईट हाऊसमध्ये ओबामांसमवेत मोदींनी केवळ गरम पाणी प्यायल्याच्या बातम्यांनी कांही काळ वर्तमानपत्रांचे रकाने भरले असतानाच आता व्हाईट हाऊसतर्फे प्रसिद्ध केल्या गेलेल्या पत्रकात मोदींच्या इच्छाशक्तीची ओबामा यांनी खूपच तारीफ केल्याचे आणि मोदींप्रमाणेच योगाभ्यास सुरू करण्याची इच्छा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेत ठिकठिकाणी दिलेल्या भाषणातूनही मोदींनी योगप्रचार केला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणातही मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा विचार मांडला होता आणि अनेक देशांच्या प्रतिनिधींनी त्याला दुजोरा दिला होता. मेडिसन स्क्वेअर मधील भाषणातही मोदींनी शरीरचा पूर्ण विकास आणि शरीराची क्षमता पूरेपूर वापरता येण्यासाठी योगाभ्यास किती महत्वाचा ठरतो यावर भाष्य केले होते. तासनतास काम करणारे नेते अशी मोदींची ओळख जगभरात झाली असून मोदींच्या या कार्यक्षमेतेचे कौतुक ओबामा यांनीही केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिवसात १५ ते १६ तास काम करणारे मोदी न चुकता सकाळी अर्धा तास योगाभ्यास आणि त्यानंतर ध्यानधारणा करतात. मग ते भारतात असोत वा परदेशात.

Leave a Comment