केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिष्ठेची लढत

raosaheb
जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. येथे आणीबाणीनंतर २००४ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच चारवेळा विधानसभेवर विजयी होत आले होते. विठ्ठलअण्णा सपकाळ, रावसाहेब दानवे हे चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र २००४ मध्ये भाजपचे माजी खासदार पुंडलिक हरि दानवे यांचे चिरंजीव चंद्रकांत दानवे हे भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. भाजपमधील या फाटाफुटीमुळे २००४ व २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे हा मतदारसंघ निसटत्या मताधिक्याने गेला आहे. दोन्ही वेळेस चंद्रकांत दानवे हे अनुक्रमे तीन हजार व सोळाशे मतांनी विजयी झाले आहेत. गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांना ६७ हजार ४८० मते तर रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाबाई दानवे यांना ६५ हजार ८४१ मते मिळाली होती. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. संतोष दानवे हे केवळ रावसाहेबांचा मुलगा म्हणून राजकारणात नाहीत. गेल्या काही वर्षापासून ते भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून तसेच साखर कारखान्याचे निवडून आलेले अध्यक्ष या नात्याने सक्रीय आहेत. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. या निवडणुकीत संतोष दानवे आणि आ. चंद्रकांत दानवे यांच्यात ही लढत रंगतदार होणार आहे. या शिवाय युती आणि आघाडी तुटल्याने शिवसेनेकडून रमेश गव्हाड आणि कॉंग्रेसकडून सुरेश गवळी तसेच मनसेकडून दिलीप वाघ हे उमेदवार आहेत. रावसाहेब दानवे यांनी प्रचंड विरोध असताना लोकसभेची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकली. तेव्हापासून जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांची लाट आहेच. केंद्रीय मंत्रीमंडळात रावसाहेब दानवे यांचा समावेश झाल्यानंतर या तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन आश्वासक झाला आहे. कॉंग्रेसचा परंपरागत मतदार कॉंग्रेसकडे वळण्याची शक्यता असून त्याचा मोठा फटका चंद्रकांत दानवे यांना बसणार आहे. शिवसेनेचा उमेदवारही भाजपची मतविभागणी करण्याऐवजी भाजपविरोधी जी मते शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळत होती ती मते यावेळी शिवसेनेच्या उमेदवारालच मिळणार आहेत. त्यामुळे भाजपची विरोधी मते कॉंग्रेस, शिवसेना यांच्यात विभागली जावून त्याचा फायदा संतोष दानवे यांना मिळण्याची शक्यता आहे. जाफ्राबाद तालुक्यात हिंदुत्त्वाचे वारे नेहमीच असते. यावेळी त्याचा फायदाही संतोष दानवे यांनाच मिळणार असून दोन दानवेंच्या या लढ्यात भारतीय जनता पक्षाचे तरूण उमेदवार संतोष दानवे हेच बाजी मारतील अशी शक्यता दिसत आहे.

Leave a Comment