सहानुभूतीच्या लाटेमुळे सुरेश धस संकटात

suresh-dhas
बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाकडे यावेळी सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविणारे, एकेकाळी भारतीय जनता पक्षातूनच आमदार झालेले पुनर्वसन मंत्री सुरेश धस हे या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे भीमराव धोंडे हे आव्हान देत असून मतविभागणीमुळे आणि मुंडे यांच्या सहानुभूतीच्या लाटेमुळे धस यांच्या समोर चांगलेच संकट उभे राहिले आहे. नगर जिल्ह्याला लगत असलेल्या या तालुक्यात सिंचनाआभावी शेतीत फारसे उत्पन्न नाही. दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. कुकडी प्रकल्पाचे पाणी या भागात येणार अशी चर्चा दरवेळी होते मात्र प्रत्यक्षात हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे. आष्टी आणि पाटोदा असा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वंजारा समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. मात्र यावेळी ती सर्व मते एकगठ्ठा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांना पराभूत करण्यासाठी आपले मंत्रीपद आणि सर्व ताकद धस यांनी पणाला लावली होती. मात्र मोदी लाटेमुळे धस यांचा सव्वा लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. मुंडे यांना शेवटच्या काळात सर्वाधिक त्रास देणारी व्यक्ती म्हणून धस यांची प्रतिमा आहे. त्यामुळे मतदार त्यांना अद्दल घडवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बीड जिल्ह्यात मुंडे याच्या सहानुभूतीची प्रचंड लाट आली आहे. त्यात मोदी यांच्या सभेने आणखी भर पडली आहे. आष्टी मतदारसंघात पंचरंगी लढत असली तरी धस आणि धोंडे यांच्यासमोर अन्य उमेदवारांचे फारसे अस्तित्व नाही. भीमराव धोंडे हे आष्टी मतदारसंघातील मतदारांचे अतिशय परिचित नाव आहे. तीनवेळा सलग आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तीनवेळा ते पराभूत झालेले आहेत. सुरेश धस यांनीच त्यांचा भाजपकडून दोनवेळा पराभव केला होता. नंतर सुरेश धस पक्षांतर करून भाजपतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना मंत्रीपदही मिळाले. गेल्यावेळी त्यांनी भाजपचे बाळासाहेब अजबे यांचा २७ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र आता सुरेश धस यांना या मतदारसंघात झगडावे लागत आहे. या मतदारसंघात सुरेश धस यांना असुरक्षित वाटल्याने त्यांनी नगर जिल्ह्यातील जामखेड – कर्जत मतदारसंघातून उभे राहण्याची चाचपणी केली होती. मात्र तेथेही आष्टीपेक्षा अवघड स्थिती असल्याने अखेर ते आष्टीतच उभे राहिले आहेत. भीमराव धोंडे यांच्याकडे या मतदारसंघातील संस्थांचे जाळे आहे. या संस्थांमध्ये काम करणारी यंत्रणा त्यांच्या मदतीला आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि मनसे यांचे उमेदवार या मतदारसंघात आहेत मात्र लढतीच्या चित्रात ते जवळपासही कुठे नाहीत. माजी आमदार साहेबराव दरेकर हे भीमराव धोंडे यांच्या पाठीशी उभे असल्याने धोंडे यांचे पारडे अधिकच जड झाले आहे. शिवाय धोंडे यांची एक व्होटबँक त्यांच्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होत आहे. त्यासाठी प्रीतम मुंडे खाडे या निवडणूक लढवित असल्याने प्रचंड सहानुभूतीची लाट बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन कमळाची बटणे दाबण्याची लाट असून विधानसभेतील भाजप उमेदवारांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. सुरेश धस हे प्रभावी उमेदवार आणि मंत्री असले तरी त्यांना या लाटेचा व भीमराव धोंडे यांच्या मतदारसंघातील शक्तीचा दुहेरी फटका बसणार आहे.

Leave a Comment