
वॉशिंग्टन – सीआयएचे माजी संचालक आणि संरक्षण सचिव लिओन पॅन्नेटा यांच्या ‘वर्थी फाईट्स : अ मेमॉयर ऑफ लीडरशीप इन वॉर एण्ड पीस’ या पुस्तकात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. अल कायदा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावण्यात आली, याचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात देण्यात आला आहे.
लिऑन पॅन्नेटाच्या वर्थी फाईट्स पुस्तकाने जगभरात खळबळ
पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये घुसून अमेरिकेच्या विशेष दलाने अल कायदा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार केले होते. त्यानंतर अमेरिकेने त्याचा मृतदेह एका मोठ्या ब्लॅक बॉक्समध्ये ३०० पौंड्स वजनाच्या साखळ्यांनी बांधून समुद्रात टाकल्याचे सीआयएचे माजी संचालक आणि संरक्षण सचिव लिओन पॅन्नेटा यांनी म्हटले आहे. पॅन्नेटा यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, ओसामा बिन लादेन याच्या मृतदेहावर इस्लामिक रिती रिवाजांप्रमाणे अंत्यविधी पार पाडण्यात आले. त्याचा मृतदेह एका पांढ-या कफनमध्ये गुंडाळण्यात आला आणि अरेबिक भाषेत अंतिम प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका अवजड ब्लॅक बॉक्समध्ये ठेवण्यात आला. ३०० पौंड्स वजनाचे साखळदंड त्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले. जेणेकरुन त्याचा मृतदेह समुद्रात सोडल्यानंतर पाण्यावर तरंगू नये, असे त्यांनी सांगितले. मात्र पॅन्नेटा यांनी बिन लादेनचा मृतदेह समुद्रात सोडल्याच्या जागेचा कोठेही उल्लेख केलेला नाही. ओसामा बिन लादेनचा मृतदेह जर जमिनीत पुरला असता, तर जगातील अतिरेक्यांसाठी तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असता, असा अमेरिकेचा अंदाज होता.
