प्रादेशिकतेचा आधार

vidhansabha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या प्रचारासाठी जोरदार फिल्डिंग लावल्यानंतर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांना नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय प्रश्‍नांच्या संदर्भात एका शब्दानेही टीका करण्याची सोय राहिलेली नाही. मात्र आपण नरेंद्र मोदींना विरोध केला नाही तर या निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही याची जाणीव या तिघांना झालेली आहे. म्हणूनच राष्ट्रीय प्रश्‍नावर निरुत्तर झालेल्या या नेत्यांनी आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी प्रादेशिकतेचा आधार घ्यायला सुरूवात केली आहे. पराभूत मनोवृत्तीतून त्यांच्या प्रचारात हा बदल झालेला आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली परंतु भारत देश एवढा विविधांगी आहे आणि मराठी माणूससुध्दा अन्य राज्यांमध्ये धाडसाने जायला लागला आहे हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनीसुध्दा आपला मराठी वाद कालबाह्य झाल्याचे ओळखले होते आणि मराठी मराठी करता करता ते हिंदुत्त्वाची भाषा बोलायला लागले होते. आपण मराठी मराठी करत बसलो तर मुंबईतसुध्दा आपल्याला राजकीय फायदा होणार नाही हे ओळखले होते म्हणून त्यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली होती.

उध्दव ठाकरे यांनी मात्र आता उलटा प्रवास सुरू केला असून हिंदुत्त्वापेक्षा मराठीवादाला अधिक चालना द्यायला सुरूवात केली आहे. मात्र त्यांच्या या घडाळ्याचे काटे उलटे फिरविण्याच्या कृतीमुळे शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तेवढी दूरदृष्टी त्यांच्याकडे नसल्यामुळे ते तात्पुरता फायदा विचारात घेऊन अधिकाधिक मराठीवादी होत चालले आहेत. राज ठाकरे, उध्दव ठाकरे आणि शरद पवार या तिघांनी मिळून एक नवा शोध लावला आहे. एकदा एखादा माणूस देशाचा पंतप्रधान झाला की त्याने फक्त लोकसभेच्याच निवडणुकीचाच प्रचार केला पाहिजे. पंतप्रधानांनी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करणे चुकीचे आहे हा तो नवा शोध होय. या तिन्ही ग्रेट नेत्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेतृत्व नावाचा काही प्रकारच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अशी चर्चा होणे अपेक्षितच आहे. या तिघांच्याही प्रादेशिक मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यांना लोकांच्या प्रादेशिक भावना भडकविण्याची संधी आहे. ते मुळी राष्ट्रीय प्रश्‍नावर चर्चाच करीत नाहीत. त्यामुळे त्यांना पंतप्रधान राज्यात कसे आले, तालुक्याच्या पातळीवर कसे गेले असे प्रश्‍न उपस्थित करणे सोयीचे जाते. मात्र भारतात सध्या जी मतदारांंची नवी पिढी समोर येत आहे. ती प्रादेशिक विचार करत नाही. कारण या मतदारांची दृष्टी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर ग्लोबल झालेली आहे.

मी मराठी, माझी मराठी, माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे सारे आपले शत्रू असा दृष्टिकोन ते स्वीकारूच शकत नाहीत. कारण हा नवा तरुण उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने सगळ्या जगाल गवसणी घालत आहे. महाराष्ट्रातले हजारो तरुण आज कूपमंडूक वृत्ती सोडून देशाच्या सार्‍या राज्यांमध्ये उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत. तिथली संस्कृती, तिथले लोक आणि त्या लोकांकडून मिळणारा सन्मान यामुळे त्यांच्या मनात केवळ महाराष्ट्राच्या अभिनिवेशाची संकुचित वृत्ती राहिलेली नाही. त्यामुळे केवळ मराठीपणा आणि मराठी बाणा यांच्या जोरावर राजकारण करण्याने या विशिष्ट पक्षांना याच अस्मिता गोंजारत बसण्याची सवय लागते. हे या नव्या पिढीला कळले आहे. त्यामुळे राज ठाकरे असोत की उध्दव ठाकरे असोत त्यांच्या संकुचित राजकारणाला महाराष्ट्रातल्या नव्या मतदारांचा अजिबात प्रतिसाद मिळणार नाही. आजवर तो मिळालेला नाही आणि भविष्यातही मिळण्याची शक्यता नाही. शिवसेना हा राजकीय पक्ष मराठी माणसांसाठी स्थापन झाला. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मराठी माणसांना नोकर्‍या हव्या होत्या. पण आता परिस्थिती बदलली आहे.

मराठी माणूस विपुल प्रमाणात अन्य राज्यात जाऊन नोकर्‍या पटकावत आहे आणि परराज्यातले हजारो लोक महाराष्ट्रात, मुंबईत येऊन नोकर्‍या मिळवत आहेत. नोकर्‍या मिळवण्याला प्रांताच्या सीमा राहिलेल्या नाहीत. त्या राहणे राष्ट्रीय एकात्मतेसाठीही धोक्याचेच आहे. त्यामुळे मराठी मराठी करणार्‍यांना महाराष्ट्रात थारा मिळणे शक्यच नाही. महाराष्ट्रातला कोणताही सामान्य माणूस राज आणि उध्दव ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या द्वेषाचा विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या असे लक्षात येते की आपलेही काही भाईबंद नातेवाईक आणि मुले ही परराज्यात नोकर्‍या करत आहेत. नोकरीसाठी महाराष्ट्रात येणार्‍या परराज्यातल्या लोकांचा आपण द्वेष करायला लागलो तर आपल्याही मुलांचा तिथे द्वेष केला जाईल. तेव्हा हे टाळले पाहिजे हे त्यांना कळते. राज ठाकरे नेहमी मुंबईतल्या नागरी सेवांवर पडणार्‍या ताणाची चर्चा करत असतात. मुंबईतल्या गर्दीची चर्चा करत असतात. हे ताण, ही गर्दी आणि ही समस्या केवळ मुंबईची नाही. कलकत्ता, चेन्नई, बेंगळूर याही शहरांमध्ये या समस्या आहेत. परंतु राज ठाकरेंचे मुंबईतल्या समस्यांचे विश्‍लेषण हे वेगळे असते. परराज्यातले लोक मुंबईत आले म्हणून मुंबईत गर्दी झाली आहे आणि त्या गर्दीमुळे व्यवस्था कोलमडत आहे, असे त्यांचे म्हणणे असते. मुंबईत परराज्यातल्या लोकांच्या ऐवजी तेवढेच महाराष्ट्रातले लोक येऊन राहिले असते तर गर्दी होणार नव्हती का? शहरातल्या समस्या गर्दीने निर्माण होतात, ती गर्दी कोणत्या राज्यातल्या लोकांनी केेली आहे याला काहीच महत्त्व नसते. परंतु प्रांतवादाची आग पेटवून आपली राजकीय पोळी भाजून घेणार्‍या अशा पक्षांना हे मतभेद वाढवायचेच असतात. म्हणून दर निवडणुकीला शिवसेना असो की राज ठाकरे असोत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी हाकाटी केली जाते. निवडणुका जिंकण्याचे या संकुचित पक्षांना हे एक साधनच होऊन बसले आहे. पण लोकांना त्यातले फोलपण लक्षात येते.

Leave a Comment