
मुंबई – उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांनी प्रथमच मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या ही जाणून घेतल्या.
प्रथमच पंकजा मुंडेंनी केला लोकलमधून प्रवास
भाजपचे उल्हासनगरमधील उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारानंतर पंकजा मुंडे यांची घाटकोपर येथे प्रचार सभा होणार होती. मात्र, सभेला उशीर होत असल्यामुळे पंकजा यांनी लोकल ट्रेनने घाटकोपरला येण्याच्या पर्याय निवडला.
उल्हासनगर ते घाटकोपर असा लोकल प्रवास पंकजा यांनी केला. यानिमित्ताने आपण प्रथमच लोकल ट्रेनने प्रवास करत असल्याचे पंकजा यांनी सांगितले.
रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान भेडसावणाऱ्या समस्यांना जाणून घेण्यासाठी तसेच या समस्या दूर करण्यासाठी आपण काही करू शकतो का पाहण्यासाठी लोकलने प्रवास केल्याची प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
