कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात गटबाजीला बहार

congress
यवतमाळ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि याबाबत कोणाचे मतभेद होण्याचे कारण नाही. कॉंग्रेसवाल्याचा पराभव कॉंग्रेसवालाच करू शकतो असे पूर्वी म्हटले जात होते. मात्र नंतर नंतर बाहेरच्या लोकांनीही कॉंग्रेसचा पराभव केला. शिवसेना कॉंग्रेसचा पराभव करू शकते हे सिध्द झाले. पण अजूनही यवतमाळमध्ये मात्र कॉंग्रेसपक्ष अंतर्गत फुटीने जर्जर झाला असून कॉंग्रेसचे बंडखोरच कॉंग्रेसचाच पराभव करण्यास टपले आहेत. यवतमाळच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. २००९ च्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातल्या सात मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते. विदर्भाला भाजपाचा बालेकिल्ला म्हटले जात असले तरी यवतमाळ मात्र तरी त्याला अपवाद होता कारण यवतमाळ जिल्ह्यातून भाजपाचा एकही आमदार विजयी झालेला नव्हता.

या जिल्ह्यातील वणी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी आणि उमरखेड हे पाच मतदारसंघ कॉंग्रेसकडे, पुसदचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि दिग्रस मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता यवतमाळ मतदारसंघ वगळता बाकी सर्व मतदारसंघात विद्यमान आमदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यातल्या बहुतेक विद्यमान आमदारांना २००९ साली आपण ज्यांच्याशी लढत दिली त्यांच्याशीच पुन्हा लढत द्यावी लागत आहे. केवळ यवतमाळ मतदारसंघात कॉंग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे. २०१३ सालच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तेथून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या आमदार नंदिनी पारवेकर यांचे तिकिट कापून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या चिरंजीवांना म्हणजे राहुल ठाकरे यांना रिंगणात उतरवले गेले आहे आणि या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सात मतदारसंघ असले तरी त्यातले चार मतदारसंघ राज्याचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. कारण त्या मतदारसंघात बडे लोक उभे आहेत. एकंदरीत तीन मतदारसंघात कॉंग्रेसची तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यवतमाळ मतदारसंघात राहुल ठाकरे यांना पराभव पत्करावा लागला तर केवळ माणिकराव ठाकरे यांचीच नव्हे तर कॉंग्रेस पक्षाचीही प्रतिष्ठा जाणार आहे. म्हणून माणिकराव ठाकरे या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. चिरंजीवांना तिकिट मिळवून दिल्यामुळे कॉंग्रेसचा एक गट नाराज आहे आणि या गटाचा पाठिंबा तिथले राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बाजोरिया यांच्या मागे उभा राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे तिथले उमेदवार संदीप बाजोरिया यांचे पारडे त्यामुळे जड झाले आहे. या मतदारसंघातली निवडणूक फारच चुरशीची होत आहे. कारण तिथले शिवसेनेचे उमेदवार संतोष ढवळे हे सामान्य जनतेत मिसळून काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचाही प्रभाव चांगला आहे आणि भाजपाचे तिथले उमेदवार मदन येरावार हे पूर्वी आमदार होते. असे हे चार तुल्यबळ उमेदवार उभे असून माणिकराव ठाकरे हे आपली सारी शक्ती पणाला लावत आहेत पण बसपाचे उमेदवार तारिक समी हेही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत.

वणी मतदारसंघात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान वामनराव कासावार हे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपाचे संजिवन रेड्डी उभे आहेत. या दोघांमध्ये चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर नाईक हे पुसद मतदारसंघात उभे आहेत आणि हा मतदारसंघ सातत्याने नाईक घराण्याच्या मागे उभा राहत आल्यामुळे मनोहर नाईक यांचा विजय सहज समजला जात आहे. परंतु सध्याच्या वातावरणात त्यांच्या विरुध्द उभे असलेले शिवसेनेचे प्रकाश देवसरकर हे माजी आमदार आहेत. त्यांचा प्रभाव मनोहर नाईक यांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. मनोहर नाईक यांच्या बंजारा मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी कॉंग्रेसने सचिन नाईक यांना उभे केलेले आहे.

कॉंग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे दुसरे उमेदवार म्हणजे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे (आर्णी) आणि विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके (राळेगाव). या दोघांनाही अनुक्रमे संदीप धुर्वे (शिवसेना) आणि मिलिंद धुर्वे (राष्ट्रवादी) यांनी चांगलेच आव्हान दिलेले आहे आणि त्यांची दमछाक केलेली आहे. या दोन्ही मतदारसंघातले भाजपाचे उमेदवारसुध्दा सक्षम आहेत. दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड यांना कोणी आव्हान देऊ शकत नाही असे मानले जाते. परंतु यावेळी भाजपाच्या अजय दुबे यांचे आव्हान त्यांना चांगलेच जाणवत आहे. उमरखेड मतदारसंघात विद्यमान आमदार कॉंग्रेसचे विजय खडसे यांना अनुकूल परिस्थिती असल्याचे मानले जात आहे. त्यांच्यासमोर सक्षम उमेदवार उभा करण्यात त्यांच्या विरोधकांना यश आलेले नाही.

Leave a Comment