अमेरिकेचा कुजकेपणा

america
व्यंगचित्र ही एक फार वेगळी कला आहे. तिच्यातून ज्याची टिंगल केली जाईल त्यालासुध्दा हसू आले पाहिजे तरच ते व्यंगचित्र चांगले समजले जाते. परंतु अशा व्यंगचित्रातून त्यातून विषयव्यक्तीचे मन दुखावले गेले तर ते व्यंगचित्र म्हणजे व्यंगचित्र न राहता द्वेषचित्र होऊन बसते. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स या दैनिकामध्ये भारताविषयी प्रसिध्द झालेल्या एका व्यंगचित्राच्या निमित्ताने ही चर्चा सुरू झालेली आहे. या व्यंगचित्रात भारताची टिंगलटवाळी तर करण्यात आलेली आहेच पण भारताची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे न्यूयॉर्क टाईम्सच्या हजारो वाचकांनी (जे भारतीय नाहीत) तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे या दैनिकाला दिलगिरी व्यक्त करावी लागली. भारताने नुकताच मंगळाच्या कक्षेमध्ये आपले अंतराळ यान यशस्वीरित्या पाठवून एक विक्रम नोंदवला आहे. भारताला मागासवर्गीय देश म्हणणार्‍या कथित प्रगत देशांच्या कानाखाली आवाज काढण्याचाच हा एक प्रकार आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या काही उच्चभ्रू लोकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याच सडक्या मेंदूतून या व्यंगचित्राची कल्पना बाहेर पडली आहे.

भारताच्या मंगळ यशामुळे भारताचा अंतराळ संशोधनात चौथा क्रमांक लागला आहे. यापूर्वी मंगळयान पाठविणार्‍यामध्ये अमेरिका, रशिया आणि यूरोपीयन युनीयन यांचा समावेश आहे. आता चौथा क्रमांक भारताचा लागला आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेसारखा प्रगत देशसुध्दा अंतराळ संशोधनातून प्राप्त होणारी भारताची काही माहिती वापरत आहे. भारताचे चांद्रयान हे अंतराळ यान चंद्रावर गेले तेव्हा ते अमेरिकेच्या एका उपग्रहाला घेऊन गेले होते. आता अमेरिका म्हणजे प्रगत आणि भारत म्हणजे मागास असा भेदभाव राहिलेला नाही. परंतु या कार्टुनमध्ये दोन पाश्‍चात्य संशोधक एका खोलीत बसलेले दाखवले आहेत. ती खोली आहे एलिट क्लासची. म्हणजे उच्चभ्रू लोकांची आणि एक भारतीय खेडूत एका हाताने एक म्हैस पकडून घेऊन आलेला आहे आणि तो त्या एलिट क्लासच्या केबिनच्या दारावर टक टक करून आपल्याला आत घ्यावे अशी विनंती करत आहे. यातली भारतीय माणसाची प्रतिमा ही जुन्या काळातली वापरली गेली आहे आणि हाही भारतीय माणूस आपल्याला एलिट क्लासमध्ये घेतले जावे यासाठी विनंती करत आहे. हे कार्टुन चितारणार्‍या व्यंगचित्रकाराच्या डोक्यातून भारताची जुनी प्रतिमा जात नाही ही एक गोष्टी उघड झाली.

भारत म्हणजे अंगावर साप खेळत असलेल्या साधुंचा, हत्तींचा देश अशी भारताची प्रतिमा प्रदीर्घ काळ उभी केली गेलेली आहे. तिच कल्पना भारतीय माणूस चितारताना वापरली गेलेली आहे. म्हणजे भारत देश आता कुठे चाललेला आहे याची या व्यंगचित्रकाराला कल्पना तर नाहीच पण असली तरी पुन्हा भारताची ती जुनीच प्रतिमा वापरून त्याने भारताची टिंगल केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एलिट क्लासमध्ये येण्यासाठी भारत कोणाचे तरी दार ठोठावत आहे हीसुध्दा कल्पना चुकीची आहे. भारताला त्याची गरज राहिलेली नाही. उलट अमेरिकेसारख्या देशाला धडकी भरावी असे यश भारतीय संशोधक आपल्या देशात निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे मिळवत आहेत. तेव्हा भारताचा हा शेतकरी दार ठोठावत आहे हीसुध्दा कल्पना विपरित आहे. हे व्यंगचित्र काढणार्‍या व्यक्तीने आपले अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी एकदा चर्चा करायला हवी होती. कारण बराक ओबामा भारताला चांगले ओळखतात. अमेरिकेतल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना बराक ओबामा यांनी भारताविषयीचे आपले खरे मत व्यक्त केले होते. त्यांनी अमेरिकेतल्या या विद्यार्थ्यांना असा इशाराच दिलाच होता की आज अमेरिका जगाच्या पुढे आहे त्याचा फार गर्व करू नका. जोपर्यंत भारतीय तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत होत नाही तोपर्यंत आपण पुढे आहोत. एकदा का भारतीयांना तंत्रज्ञानाची नीट ओळख झाली की आपला पहिला नंबर जायला काही वेळ लागणार नाही.

बराक ओबामा यांच्या या इशार्‍यामध्ये बरेच काही आलेले आहे. ओबामा जगात कोणालाच घाबरत नाहीत. प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, तब्बल ३२ लाख सैनिक असलेले लष्कर आणि सार्‍या विश्‍वाला केवळ सहा मिनिटात बेचिराख करू शकेल एवढी अण्वस्त्रे अमेरिकेकडे आहेत. तिच्या अध्यक्षाने कोणाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. परंतु बराक ओबामा फक्त भारतीय तरुणांच्या बुध्दीमत्तेला घाबरतात. त्यांना या बुध्दीमत्तेची किंमत माहीत आहे. मात्र न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्रकाराला या गोष्टीची यथार्थ जाणीव नाही. त्यातून अमेरिकेतल्या लोकांची भावना व्यक्त झालेली आहे. भारतीयांचे यश अमेरिकेला सहन होत नाही, पचत नाही. हेच यातून दिसून आलेले आहे. विशेषतः भारताचे अंतराळ संशोधनातले यश अमेरिकेला जास्त डाचते कारण भारताला हे यश मिळू नये यासाठी अमेरिकेने भारताच्या संशोधनात बिब्बा घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला असून मिळालेले आहे. पूर्वी भारताच्या प्रगत संशोधनासाठी क्रायोजेनिक इंजिनाची गरज होती. ते इंजिन रशिया आणि अमेरिका यांच्याकडेच होते. मात्र अमेरिकेचे इंजिन रशियापेक्षा तिप्पट महाग असूनसुध्दा भारताने अमेरिकेचेच इंजिन विकत घ्यावे असा प्रचंड दबाव अमेरिकेने भारतावर आणला. हा दबाव भारतासाठी आपद्धर्मच ठरला. भारतीय संशोधकांनीहे आव्हान समजून रशियापेक्षाही स्वस्तात स्वतःच क्रायोजेनिक इंजिन तयार केले. अमेरिकेच्या थोबाडीत मारण्याचाच एक प्रकार होता. म्हणून अमेरिकेला भारताची या क्षेत्रातली उन्नती सहन होत नाही. ती व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त होते.

Leave a Comment