जय शिवाजी……..

shivaji-maharaj
सध्या निवडणुका आल्या आहेत आणि शिवाजी महाराजांचे नाव प्रचारात वापरले जात आहे. शिवसेना तर सातत्याने हे नाव वापरत आली आहे. संघटनेेचे नावच शिवसेना आहे. आता भाजपाने आपल्या अनेक जाहीरातींपैकी एका जाहीरातीत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. शरद पवार यांनी भाजपाला आणि मोदींना शिवाजी महाराजांचे नाव वापरण्याचा अधिकार काय असा सहवाल खडा केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडवणीस यांनी आम्ही महाराजांचे नाव घेताच यांच्या पोटात का दुखते असा प्रश्‍न केला आहे. एवढे म्हणून ते थांबले नाहीत. महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांना मानणार्‍यांनी आपल्यालाच मते द्यावीत असे आवाहन राजकीय पक्ष करीत असतात. आपल्यात महाराजांचे रक्त आहे असे त्यांचे म्हणणे असते. महाराजांचे रक्त कोणाच्या अंगात आहे हे काही सिद्ध करता येत नाही आणि तसा दावा कोणी करीत असेल तर तो मोठाच संशोधनाचा विषय ठरणार आहे. त्याच्या फार खोलात न जाता आता निवडणुकीच्या काळात एक प्रश्‍न विचारावासा वाटतो की, कोणाच्या अंगात शिवाजी महाराजांचे रक्त आहे म्हणून त्यांना समस्त मतदारांनी मते देण्याचे कारण काय ?

या ठिकाणी रक्त असणे याचा अर्थ शब्दश: न घेता लक्ष्यार्थाने घ्यावा असे कोणी म्हणेल तर त्याचाही विचार करावा लागेल. रक्त असणे याचा अर्थ आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो असा घेता येईल. वेगळ्या शब्दात सांगायचे तर शिवाजी महाराजांचा खरा अभिमान आम्हालाच वाटतो. तेव्हा असाच अभिमान ज्यांना वाटतो त्यांनी आम्हालाच मते द्यावीत. आता शिवाजी महाराजांचा खरा अभिमान त्यांनाच वाटतो हे खरे मानले तरीही त्यावरून आम्हा सगळ्या शिवप्रेमींनी त्यांनाच मते दिली पाहिजेत असे कसे म्हणता येईल ? शिवाजी महाराजांना मानण्याचा, त्यांचा अभिमान असण्याचा आणि त्यांचे रक्त अंगात असण्याचा मतदानाशी संंबंध काय ? शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमानाचा आणि भक्तीचा विषय आहे. तेव्हा त्याचा वापर या मताच्या राजकारणात व्हायलाच नको आहे. कारण निवडणुका या दोन पक्षात असतात. विषय खरे तर साधा असतो. राज्यकर्ता पक्ष कसा वागला, त्याने कसा कारभार केला याची चर्चा निवडणुकीत झाली पाहिजे. त्याचा कारभार चांगला असेल तर त्यांनी तसे सांगावे आणि तो चांगला नसेल तर तसे विरोधकांनी सांगावे, यातली जी बाजू लोकांना पटेल त्या बाजूने मतदारांनी आपले मतदान करावे. एवढी साधी गोष्ट असताना या वादात हे लोक शिवाजी महाराजांना का ओढतात हे कळत नाही.

आपण एकवेळ ही गोष्ट मान्य करू की, शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य स्थापन केले होते. सामान्य जनता आणि शेतकरी यांच्याविषयी त्यांना फार कळकळ होती. आपल्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्‍या सैनिकांना तर ते आपले दैवतच वाटत असत. त्यांनी चांगल्या राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. तेव्हा आपणही त्यांच्याच प्रमाणे राज्यकारभार करीत आहोत असा कोणी दावा करीत असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन खुशाल मते मागावीत. पण दुर्दैवाने तसे होत नाही. तसे काही सोदाहरण न दाखवता केवळ महाराजांचा पोकळ अभिमान कोणी दाखवत असतील तर त्यांचा अभिमान पोकळ असल्याने ते लगेच उघडे पडतील. तसे आपण उघडे पडायला नको म्हणून आपली शिवनिष्ठा कशी खरी आणि प्रतिस्पर्ध्यांची निष्ठा कशी तकलादू अशी तुलना मात्र केली जाते. जाणते राजे शरद पवार यांनी काल सोलापुरात, मोदी यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काय अधिकार असा सवाल केला तो याच धाटणीचा आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोण देणार आहे ?

पवार म्हणतात ज्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटले त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मते मागण्याचा काही अधिकार नाही. पवार ही गोष्ट मोदींना उद्देशून बोलत आहेत पण त्यांना विस्मरण होत असेल की, शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणारे महापुरुष तर पंडित नेहरू हे होते. पवार ही गोष्ट मोदींना उद्देशून बोेलत असतील तर त्यांना नीट विचार करावा लागेल कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्सवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा ८५ वर्षांपासून आहे. त्या काळात कॉंग्रेसचे पंडित नेहरूंचे मत महाराजांविषयी चांगले नव्हते. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते मात्र शिवाजी महाराजांचे नाव जाहीरपणाने घ्यायला कचरत असत. कारण नेहरू नाराज होण्याची तर भीती होतीच पण मुस्लिम मतदार खप्पा होतील हीही भीती होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते आणि नेहरूंना हिंदू या शब्दाविषयी तिरस्कार होता. तो त्यांनी जाहीरपणाने बोलून दाखवला होता. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते महाराजांविषयी मनात कितीही आदर असला तरीही तो आदर मनात ठेवत असत. नेहरू हिंदू शब्दाची टवाळी करीत असत तेव्हा त्यांच्या पक्षातल्या कोणाही नेत्याने नेहरूंना खडसावले नव्हते. शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे हा प्रश्‍न आपण बाजूला ठेवू पण शिवाजी महाराजांसारखा जनहिताचा कारभार करणारांनाच मते दिली पाहिजेत असे मात्र म्हणायला काही हरकत नाही. आता आपण हे ठरवले पाहिजे.

Leave a Comment