नागपूरकडे देशाचे लक्ष

vidhansabha
विदर्भातील विधानसभा मतदारसंघांची संख्या ६२ आहे आणि या विभागात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. त्यामुळे विदर्भात भाजपाचे वर्चस्व पुन्हा सिध्द होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व दहा जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात नागपूर जिल्ह्याकडे लक्ष लागून राहिले आहे कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस याच जिल्ह्यात उभे आहेत आणि याच नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. बंडखोरीची मोठीच लागण या जिल्ह्यात सगळ्याच पक्षांना लागली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा लाभ भाजपाला मिळेल का याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

रणजित देशमुख हे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचे कॉंग्रेसमधले स्थान फार मोठे होते. १९७७ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा देशभर सफाया झाला होता आणि इंदिरा गांधी यांचे अस्तित्व नष्ट होईल असे बोलले जात होते. मात्र १९७८ मध्ये हळूहळू इंदिरा गांधी यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हायला लागले. पण हे वातावरण निर्माण होत आहे याची जाणीव फार कमी लोकांना झाली होती. स्वतः इंदिरा गांधींनासुध्दा आपण पुन्हा सत्तेवर येऊ असे वाटत नव्हते. मात्र तसे जाहिररित्या खात्रीशीरपणे सांगणार्‍यांमध्ये रणजित देशमुख आघाडीवर होते. इतके ते इंदिरानिष्ठ असलेले रणजित देशमुख आता मात्र कॉंग्रेसपासून दूर आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून असेच दूर राहत आले आहेत. त्यांचा एक मुलगा अमोल देशमुख हा राष्ट्रवादीचा रामटेकमधला उमेदवार आहे. तर त्यांचा दुसरा मुलगा आशीष देशमुख हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. नागपूर जिल्ह्यातली कॉंग्रेसमधली बंडखोरी कोणत्या थराला गेली आहे याचे हे एक उदाहरण होय. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते दत्ता मेघे हेसुध्दा भाजपामध्ये आलेले आहेत हे सर्वाना ठाऊकच आहे. नागपूरमधल्या बंडखोरीची कहाणी तशी मोठीच आहे. तिचे तपशील देण्याची गरज नाही. तिचे परिणाम मात्र भाजपवर चांगलेच होणार आहेत.

नागपूर जिल्हा १२ मतदारसंघांचा जिल्हा आहे. म्हणजे सर्वाधिक मतदारसंघ याच जिल्ह्यात आहेत. मतदारसंघाला शहर जोडलेले असल्यामुळे मतदारसंघांची संख्या वाढते. कारण यातले सहा मतदारसंघ तर केवळ नागपूर शहरातले आहेत आणि प्रामुख्याने शहरी मतदारसंघ असल्यामुळे भाजपाच्या बाजूने लोकांचा कल आहे. मावळत्या विधानसभेत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. त्याशिवाय कॉंग्रेसचे सुनील केदार हे सावनेरमधून निवडून आले होते. नागपूर दक्षिण मतदारसंघातले दिनानाथ पाडोळे आणि नागपूर उत्तर मतदारसंघातले गृहराज्यमंत्री नितीन राऊत हेही दोन कॉंग्रेसचे आमदार होते. एकंदरीत नागपूर जिल्ह्यातल्या बारापैकी तीन मतदारसंघात कॉंग्रेसचे एका मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला होता. सात मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. म्हणजे या जिल्ह्यावर भाजपाचे वर्चस्व होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्‍चिम मतदारसंघातून निवडून आलेले होते आणि ते पुन्हा उभे आहेत. पण दुर्दैवाने त्यांच्या विरोधात भाजपाचेच बंडखोर नगरसेवक पंजू तोतवानी हे उभे आहेत. त्यांच्या बंडखोरीचा फडणवीस यांना काही उपद्रव होणार नाही परंतु प्रश्‍न प्रतिष्ठेचा असतो. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेतही बंडखोरी झाली आहे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे हे दक्षिण नागपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्याशी ते टक्कर देत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी हेही या मतदारसंघात उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातली लढत चुरशीची झाली आहे.

काटोल मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे आशीष देशमुख उभे आहेत. परंतु शिवसेनेच्या उमेदवारामुळे मतांची विभागणी होईल आणि तिचा फायदा अनिल देशमुख यांनाच होईल असा अंदाज आहे. सावनेर मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचे सुनील केदार हे आमदार आहेत आणि मंत्री आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे भाजपाची मोठी नामुष्की झाली आहे आणि सुनील केदार यांच्या विरोधात भाजपाचा मातब्बर उमेदवार उभा नसल्यामुळे त्यांची निवडणूक सोपी जाणार आहे.

नागपूरमधला दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्‍चिम. तिथे भाजपाचे देवेंद्र फडणवीस उभे आहेत आणि त्यांच्यासमोर कोणतेच मोठे आव्हान नाही. एकंदरीत तिथे भाजपाला बर्‍याच आशा आहेत. मध्य नागपूरमधून कॉंग्रेसचे अनिस अहमद हे पुन्हा नशिब आजमावत आहेत. २००९ साली ते पराभूत झाली होते. भाजपाच्या विकास कुंभारे यांनी त्यांचा पराभव केला होता. परिणामी अनिस अहमद यांना ५ वर्षे विश्रांती मिळाली. आता ते पुन्हा नशिब आजमावत असले तरी त्यांना फार आशा नाहीत. पश्‍चिम नागपूर, पूर्व नागपूर या दोन मतदारसंघात आता भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते आपल्या जागा राखू शकतात. त्याशिवाय हिंगणा आणि उमरेड याही दोन जागांवर पुन्हा भाजपाच विजयी होईल. नागपूर उत्तरची जागा मात्र सध्या मंत्री असलेले नितीन राऊत यांच्या हातात आहे आणि या राखीव जागेवर ते पुन्हा कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याविरोधात फार मोठे आव्हान उभे करण्यात भाजपाला यश आलेले नाही. रामटेक मतदारसंघात मागच्यावेळी आशीष जैस्वाल हे शिवसेनेेचे उमेदवार निवडून आले होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अमोल देशमुख यांच्याशी मोठा सामना करावा लागणार आहे. अमोल देशमुख हे रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहे. कामठी मतदारसंघात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा उभे आहेत. कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक यांच्याशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. या जिल्ह्यातला हिंगणा मतदारसंघ सध्या भाजपाच्या हातात आहे. भाजपाचे विद्याबाबू घोडमारे हे २००९ साली तिथून निवडून आले होते. पण आता भाजपाने दत्ता मेघे यांचे चिरंजीव समीर मेघे यांना उभे केले आहे आणि राष्ट्रवादीचे रमेश बंग हेही तिथे नशिब आजमावत आहेत. यांच्यातला सामना प्रेक्षणीय ठरणार आहे.

Leave a Comment