परळीत रंगणार वारसा हक्काची लढाई !

munde
विधानसभा निवडणुकीतील सर्वात उत्सुकतेची लढत परळी विधानसभा मतदार संघात होत आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या व विद्यमान आमदार पंकजा मुंडे पालवे यांना या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे धनंजय मुंडे यांनी आव्हान उभे केले आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहीण मानून या जागेवर उमेदवार देणार नाही असे जाहीर केल्यानुसार येथे उमेदवार दिलेला नाही. कॉंग्रेसने येथे गोपीनाथराव मुंडे यांचे परंपरागत विरोधक व गेल्यावेळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले टी. पी. मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तीन मुंडे यांच्यात होणारी ही लढत अटीतटीची होत आहे.

गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना ९६ हजार मते तर टी. पी. मुंडे यांना ६० हजार मते मिळाली होती. मात्र त्यावेळी धनंजय मुंडे भाजपच्या बाहेर पडलेले नव्हते. वास्तविक गेल्या विधानसभेलाच धनंजय मुंडे यांना उमेदवारी न देता पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने धनंजय मुंडे व पंडित अण्णा मुंडे हे गोपीनाथराव मुंडे यांच्यावर नाराज झाले होते. वेगळे होण्याच्या विचाराला तेथूनच सुरूवात झाली होती. धनंजय मुंडे यांना गोपीनाथराव मुंडे यांनी आपला राजकीय वारस म्हणून झपाट्याने पुढे आणले. जिल्हा परिषदेत त्यांना उपाध्यक्ष केले. भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष केले. धनंजय मुंडे हे गोपीनाथरावांचा वारसदार या समजुतीतच उत्साहात राजकारणात पुढे जात होते. आपले एक स्वतंत्र संघटन त्यांनी तयार केले होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गोपीनाथरावांच्या सल्लागारांनी धनंजय मुंडे यांना विधानसभेत उमेदवार करण्याऐवजी पंकजा मुंडे-पालवे यांना उमेदवारी द्यावी असा सल्ला दिला. तो सल्ला गोपीनाथरावांनी मानला. यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू झाली. धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदार केल्यानंतरही ही धुसफूस कमी झाली नाही. मात्र गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव असल्यामुळे धुसफूस, अंतर्गत विरोध यावर मात करत पंकजा मुंडे या गेल्यावेळी ३६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाल्या.

दरम्यान, गोपीनाथराव मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी प्रचंड विरोध केला. धनंजय मुंडे यांच्या विरोधामुळे गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक जड जाणार असे भाकित वर्तविले जात होते. वातावरण मुंडे यांच्या विरोधात करण्यात धनंजय आघाडीवर होते. मात्र मोदी यांच्या लाटेने गोपीनाथराव मुंडे सव्वालाखांपेक्षा जास्त मतांच्या आघाडीने विजयी झाले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या दुर्देवी अपघातात मुंडे यांचे निधन झाल्यानंतर परळी येथे अंत्यविधीच्यावेळी लोकांच्या अनावर झालेल्या भावना, दगडफेक यातून गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल किती सहानुभूती या भागात आहे याचे प्रत्यंतर आले. या सर्व घटनेत आ. पंकजा मुंडे यांनी दाखविलेला संयम, धीरोदात्तपणा याचा एक प्रभाव समाजावर पडलेला आहे. त्यानंतर आ. पंकजा यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे त्यांच्या नेतृत्त्वाची एक सकारात्मक प्रतिमा जनतेसमोर गेली आहे. धनंजय मुंडे या निवडणुकीत पंकजा यांच्या विरोधात उमेदवारी देणार नाहीत असे अनेकांना वाटत होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. टी. पी. मुंडे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा कॉंग्रेसकडे होती. मात्र आता दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार उभे आहेत. भाजप विरोधी मतांची विभागणी त्यामुळे होणार असून त्यामुळे पंकजा मुंडे यांचे मताधिक्य वाढण्यात मदत होणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्याबाबतच्या सहानुभूतीची प्रचंड लाट असून त्यामुळे तीन मुंडे मैदानात एकमेकाविरोधात असले तरी पंकजा मुंडे निश्चित विजयी होणार यात काही दुमत नाही. फक्त किती मतांची आघाडी त्या घेतील एवढीच उत्सुकता आहे.

Leave a Comment