नगर जिल्ह्यातली बदलती समीकरणे

vidhansabha
एकेकाळी साखर कारखानदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नगर जिल्हा बघता बघता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या हातातून सुटून भाजपा-शिवसेनेचा बालेकिल्ला बनत चालला आहे. विशेषत: भारतीय जनता पार्टीचा जोर या जिल्ह्यात वाढत आहे. नगर जिल्ह्यात या निवडणुकीत १२ मतदारसंघ असून त्यात अनेकरंगी लढती होत आहेत. त्यातल्या ९ मतदारसंघातल्या चौरंगी लढती अधिक चुरशीच्या होणार आहेत. नेवासे, शेवगाव-पाथर्डी आणि श्रीरामपूर या तीन मतदारसंघात मनसेचे उमेदवार असल्यामुळे लढती पंचरंगी होणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि परंपरागत कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीची कास धरल्यामुळे या जिल्ह्यातली समीकरणे बदलून गेली आहेत. पंचरंगी लढतींशिवाय अपक्षांचे मोठे आव्हान उभे राहिल्यामुळे या जिल्ह्यातील एकूण उमेदवारांची संख्या १३८ वर गेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव मतदारसंघातील लढत सर्वाधिक लक्षणीय ठरणार अशी चिन्हे आहेत. कारण अनेक दशके कॉंग्रेसचे राजकारण करणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नूषा स्नेहलता बिपीनदादा कोल्हे या भाजपाच्या तिकीटावर उभ्या आहेत. स्नेहलता कोल्हे यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोठे काम करून केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या कर्तबगारीमुळेच २००९ साली शरद पवार यांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता. परंतु त्यावेळी त्या उभ्या राहिल्या नाहीत. आता उभ्या आहेत हे खरे, पण भारतीय जनता पार्टीत जाऊन उभ्या आहेत. त्यामुळे सारी समीकरणे बदलून गेली आहेत. सध्या या मतदारसंघात अशोक शंकरराव काळे हे शिवसेनेचे आमदार आहेत. नगर जिल्ह्याच्या राजकारणात काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वांना माहितच आहे. परंतु पूर्वी हा संघर्ष कॉंग्रेसच्या अंतर्गत होता, आता कोल्हे गट भाजपाकडे आणि काळे गट शिवसेनेकडे सरकला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचे नितीन अवताडे आणि राष्ट्रवादीचे अशोक गायकवाड उभे आहेत आणि शिवसेनेने आशुतोष काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीत कोल्हे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परंतु त्या प्रतिष्ठेच्या परीक्षेला भाजपाच्या प्रभावाची साथ मिळाली असल्यामुळे ती नक्कीच राखली जाईल अशी खात्री वाटत आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे खंदे नेते शिवाजी कर्डिले हे अधूनमधून भाजपामध्ये येत असतात आणि यावेळीही त्यांनी भाजपाचे उमदेवार म्हणून राहुर येथून अर्ज भरला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे आणि कॉंग्रेसचे अमोल जाधव हे उभे असले तरी कर्डिले यांना खरे आव्हान शिवसेनेच्या उषाताई तनपुरे यांनी दिली आहे. उषाताई तनपुरे या राहुरच्या नगराध्यक्षा होत्या. कै. बाबुराव तनपुरे हे नगर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारीतले अग्रगण्य नाव आहे. त्यांचे पती प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत. ते राष्ट्रवादी खासदार होते, परंतु उषाताई तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला. तनपुरे घरातल्या कोणी तरी असा शिवसेनेत प्रवेश करणे हा नगर जिल्ह्यातल्या राजकारणातला भूकंपच म्हणावा लागेल. त्यामुळे त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा आणि शिवसेनेची लोकप्रियता या दोन्हींचा संगम होऊन उषाताई तनपुरे कर्डिले यांच्यासमोर मोठेच आव्हान उभे करणार आहेत.

शेवगाव-पाथर्डी हा मतदारसंघ सुद्धा यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, कारण या मतदारसंघात सारी राजकीय समीकरणे एकदम उलटी-पालटी झाली आहेत. सध्या या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले हे आहेत. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे, परंतु त्यांना मोनिका राजळे यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले आहे. राजळे हे सुद्धा माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या स्नूषा आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत. त्यांचे पती राजीव राजळे हेही माजी आमदार. असे हे कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेले घराणे, परंतु मोनिका राजळे यांनी अचानकपणे भाजपात प्रवेश करून सारी समीकरणे बदलून टाकली आहेत. याच मतदारसंघात जनता दलाचे माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. वंजारा समाजाचे असल्यामुळे बबनराव ढाकणे हे गोपीनाथराव मुंडे यांच्याशी जवळीक साधून होते. त्यामुळे बबनराव यांनी जनता दल, भाजपा, राष्ट्रवादी असा प्रवास केला आणि त्यांचे चिरंजीव बाबासाहेब ढाकणे आता त्यांच्याच शेवगाव-पाथर्डी मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. समीकरणे कशी बदलतात याचे हे एक उदाहरण.

कर्जत-जामखेड या मतदारसंघात भाजपाचे प्रा. राम शिंदे हे सध्याचे आमदार आहेत आणि तेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे रमेश खाडे आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके हे उभे आहेत. मात्र प्रा. राम शिंदे हा मतदारसंघ राखतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगर जिल्ह्यात बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे बबनराव पाचपुते यांचा भाजपा प्रवेश. तसे बबनराव पाचपुते हे अस्थिर मनोवृत्तीचे आहेत. यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे आणि तिकीटही मिळवले आहे. त्यांच्या विरोधात फार मातबर उमेदवार नसल्यामुळे त्यांची निवडणूक सोपी आहे. पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, परंतु त्याची पर्वा न करता भाजपाने त्यांना दत्तक घेतले आहे. राजकीय समीकरणांच्या बाबतीत गाजलेले हे मतदारसंघ वगळता नगर जिल्ह्यातील अकोले हा मतदारसंघही लक्ष वेधून घेत आहे. कारण हा मधुकर पिचड यांचा मतदारसंघ आहे. यावेळी त्यांनी आपले चिरंजीव वैभव पिचड यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. बाळासाहेब थोरात (संगमनेर), राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) याही दोन मतदारसंघात फारसे बदल अपेक्षित नाही.

श्रीरामपूर हा राखीव मतदारसंघ आहे. तिथे राष्ट्रवादीच्या सुनीता गायकवाड या कॉंग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना आव्हान देत आहेत. त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे हे भाजपाचे उमेदवार प्रभावी ठरतील, परंतु सुनीता गायकवाड या सुद्धा तळागाळात चांगले वजन असणार्‍या उमेदवार आहेत. नेवासा मतदारसंघात सहकारी क्षेत्रातील मातबर नेते शंकरराव गडाख हे निवडून आलेले आहेत आणि त्यांनाही फार मोठे आव्हान नाही. पारनेर हा शिवसेनेचा मतदारसंघ. तिथून विजय औटी निवडून आले होते, आताही तेच उमेदवार आहेत. परंतु बाबासाहेब तांबे हे भाजपाचे उमेदवार असल्यामुळे विजय औटी यांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा दगाफटका शिवसेनेेला होऊ शकतो. अहमदनगर शहर मतदारसंघात अनिल राठोड हे शिवसेनेला पुन्हा विजय मिळवून देतील, कारण त्यांच्याही विरोेधात भाजपाचा फार प्रभावी उमेदवार नाही.

Leave a Comment