कॉंग्रेसची प्रतिष्ठा सातार्‍यात पणाला

chavhan
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जनाधार नसलेले मुख्यमंत्री मानले जातात. महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांनी आदर्श प्रकरणात भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्या जागी कॉंग्रेसचा नवा मुख्यमंत्री नेमावा लागला आणि तो स्वच्छ चारित्र्याचा असेल ही दक्षता घ्यावी लागली. तशी ती घेतानाच त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांची आठवण झाली आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात कार्यरत असलेले राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. ते मुळातले सातारा जिल्ह्यातले कराडचे राहणारे आहेत आणि त्यांना आता विधानसभेवर निवडून येणे आवश्यक ठरले आहे. त्यांनी अभावितपणेच आपला कराड दक्षिण हा मतदारसंघ आपल्यासाठी निवडला. जो उमेदवार विद्यमान मुख्यमंत्री आहे किंवा संधी मिळालीच तर पुन्हाही मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याच्यासाठी आपली जागा खाली करून देण्यास आमदारमंडळी नेहमीच उत्सुक असतात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र आपला मतदारसंघ विनासायास मिळालेला नाही. त्यांच्या मतदार संघातल्या लोकप्रियतेवर प्रश्‍नचिन्ह उभा करणारी ही स्थिती आहे. या मतदारसंघातले यापूर्वीचे आमदार कॉंग्रेसचे विलासकाका उंडाळकर यांनी मतदारसंघ मोकळा करून देण्यास नकार तर दिलाच, पण पक्षाने पुन्हा उमेदवारी न दिल्याच्या विरोधात अपक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या विधानसभेच्या मतदारसंघातच विनासायास निवडून येऊ शकत नाहीत हे कॉंग्रेससाठी मोठे दुर्दैव आहे. हा जिल्हा विरोधकांच्या ताब्यात असता तर ही गोष्टही आपण समजून घेऊ शकलो असतो. पण हा तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यातल्या आठ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकलेले होते आणि एक मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला होता. बाकी तीन मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले असले तरी ते कॉंग्रेसच्याच परंपरेतले होते आणि या जिल्ह्यात २००९ साली भाजपा किंवा शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. अशा या बालेकिल्ल्यात सुद्धा मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विलासकाका उंडाळकर यांनी तर आव्हान दिलेले आहेच, परंतु शिवसेनेचे अजिंक्य पाटील आणि भाजपाचे अतुल भोसले हेही मोठे मातबर उमेदवार आहेत. ते मुख्यमंत्र्यांचा पराभव करतील असे म्हणता येत नाही, परंतु ते मुख्यमंत्र्यांना जेरीस आणतील हे निश्‍चित. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या जिल्ह्यामध्ये मोदी लाट चालली नाही असा सातारा हा एकमेव जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीने जिंकला आणि या जिल्ह्यातले तीन मतदारसंघ ज्या माढा मतदारसंघात समाविष्ट आहेत तो माढा मतदारसंघही राष्ट्रवादीने जिंकला. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. कराड उत्तर मतदारसंघात सध्याचे आमदार बाळासाहेब पाटील हे पुन्हा उभे आहेत, परंतु ते २००९ साली अपक्ष होते आता राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्या विरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी बाळासाहेबांना मोठे आव्हान दिले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील उभे असले तरी त्यांचा फारसा प्रभाव नाही. पण कॉंग्रेसचे उमेदवार धैर्यशील कदम हे बाळासाहेबांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. बाळासाहेब पाटील यांना त्यातल्या त्यात भाजपा-शिवसेनेच्या फुटणार्‍या मतांचा आधार आहे.

राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर हे प्रतिनिधीत्व करत असलेल्या पाटण मतदारसंघात विक्रमसिंह पाटणकर यांनी आपले चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांना मैदानात उतरवले आहेत. त्यांना शिवसेनेचे शंभुराजे देसाई हे मोठेच आव्हान देत आहेत. पाटण तालुक्यात पाटणकर आणि देसाई या दोन घराण्यात नेहमी लढत होत असते, यावेळीही लढत तशीच आहे. मात्र आघाडी आणि युती फुटल्याचे फायदे सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे. युतीच्या मतातल्या फुटीचा फायदा कॉंग्रेसच्या हिंदुराव पाटील यांनाही अपेक्षित आहे, परंतु ते फार प्रभावी उमेदवार मानले जात नाहीत.

सातारा मतदारसंघ हाही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले यांना कॉंग्रेसचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भापजपाचे दीपक पवार आणि शिवसेनेचे दगडू सपकाळ यांच्याकडून फार मोठे आव्हान दिले जाणार नाही. दीपक पवार हे पूर्वी शिवसेनेतच होते, परंतु त्यांनी ऐनवेळी पक्ष बदलून भाजपाची उमेदवारी मिळवली. कॉंग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या प्रचाराला वेग आणत आहेत, पण सर्वसाधारणपणे सातारा-जावळी हा मतदारसंघ भोसले राजघराण्याला निवडून देत आलेला आहे.

या जिल्ह्यातील कोरेगाव हा मतदारसंघ लक्षणीय ठरत आहे. कारण पाटबंधारे राज्यमंत्री शशीकांत शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे आहेत. या मतदारसंघातून पूर्वी शालिनीताई पाटील या उभ्या होत्या आणि शशीकांत शिंदे यांनी त्यांना पराभूत केले होते. आता कृष्णेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. शालिनीताई पाटील राजकारणाच्या क्षेत्रातून बाहेर पडल्या आहेत आणि इथे कॉंग्रेसने विजयराव कणसे यांना उभे केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातले असले तरी त्यांचे जिल्ह्यातल्या कॉंग्रेस पक्षावर नियंत्रण नाही. पक्षात गटबाजी आहे आणि तिचा उपद्रव विजयराव कणसे यांना होणार आहे. विजयराव कणसे यांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संजय भगत यांचा प्रभाव चांगलाच जाणवत आहे, परंतु खरी लढत कणसे आणि शिंदे यांच्यात होणार आहे.

वाई मतदारसंघ हा या जिल्ह्यातला प्रचंड मोठा मतदारसंघ आहे. सध्या तिथून मकरंद पाटील हे निवडून आले आहेत आणि ते पुन्हा निवडणुकीस उभे आहेत. परंतु ते २००९ साली ते अपक्ष म्हणून उभे होते आणि यावेळी ते राष्ट्रवादीतर्फे उभे आहेत. प्रतापराव भोसले हे मोठे नेते मानले जातात, त्यांचे चिरंजीव मदन भोसले हे पुन्हा उभे आहेत आणि या दोघांची लढत पुन्हा रंगली आहे. भाजपाचे आणि शिवसेनेचे या ठिकाणचे उमेदवार फारसे प्रभावी नाहीत.

माणखटाव हा एक या जिल्ह्यातला मतदारसंघ जो मागच्या निवडणुकीत बंडखोर कॉंग्रेस नेते जयकुमार गोरे यांनी जिंकला होता. यावेळी हे जयकुमार गोरे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्यात आणि सदाशिव पोळ यांच्यात लढत होत आहे. सदाशिव पोळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पार्टीला सोडलेला आहे आणि रासपने तिथे शेखर गोरे यांना उमेदवारी दिली आहे.

फलटण मतदारसंघात २००९ साली राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण निवडून आले होते, पुन्हा तेच उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे दिगंबर आगवणे उभे आहेत. शिवसेनेने नंदकुमार तासगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे, परंतु भाजपाने ही जागा स्वाभीमानीला सोडली आहे. दिगंबर आगवणे (कॉंग्रेस) आणि दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होत आहे परंतु या लढतीत विजयी कोण होणार हे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार पोपटराव काकडे यांच्यावर अवलंबून आहे.

Leave a Comment