एलआयसी विमाधारकांना येणार ‘अच्छे दिन’

lic
मुंबई – देशातील अग्रगण्य विमा संस्था असलेल्या एलआयसीला आयकर परताव्याच्या स्वरुपात ११,५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. या रकमेच्या मोठ्या प्रमाणावरील हिस्सा विमाधारकांना हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे एलआयसीच्या विमाधारकांना लवकरच ‘अच्छे दिन…’ येणार असल्याचे सांगितले जात आहे. एलआयसीच्या एका अधिकार्‍याने याबाबत माहिती देताना सांगितले की, आयकर विभागाबरोबर एका प्रकरणात विजय मिळविल्यानंतर एलआयसीला आयकर परताव्याच्या रुपाने दोन टप्प्यात ११,५०० कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कंपनीला आत्तापर्यंत मिळालेल्या आयकर परताव्यापेक्षा कदाचित सर्वात जास्त रक्कम आहे, असे देखील त्यांनी सांगितले. असे असले तरी एलआयसीचे अध्यक्ष एस.के.राय यांनी मात्र अजूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

या अधिकार्‍याने पुढे सांगितले की, मुंबई येथील आयकर कायदा न्यायाधिकरणाने तीन एप्रिल २०१३ रोजी दिलेल्या आदेशात एलआयसीच्या बाजूने निकाल दिला होता. हे प्रकरण २००७-०८, २००८-०९ आणि २००९-१० या मूल्यांकन वर्षांशी संबंधित होते. १९५६च्या एलआयसी अधिनियमातील कलम २६ नुसार आयकर परताव्याच्या स्वरुपात मिळणार्‍या रकमेपैकी ९५ टक्के हिस्सा या विमाधारकांना दिला जातो. तर पाच टक्के हिस्सा हा सरकारला लाभांश म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे एलआयसीला झालेल्या या फायद्यापैकी सुमारे ११ हजार कोटी रुपये कंपनी विमाधारकांमध्ये वाटू शकेल. त्यामुळे देशातील एलआयसी विमाधारकांना फायदा होणार आहे.

Leave a Comment