अमिता चव्हाण यांच्यासमोर जबरदस्त आव्हान

amita-chavhan

सगळ्या मराठवाड्याचे नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष सध्या नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुमारे एक लाख सहा हजार मतांनी निवडून आले होते. मात्र त्यांच्या विजयाला अशोकपर्व या पुरवणीमुळे पेडन्यूज प्रकरणाचे आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला आदर्श घोटाळ्याचे गालबोट लागले. त्यांना मुख्यमंत्रीपद सोडून अजूनही न्यायालयीन लढाई लढविण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भोकर मतदारसंघातील निवडणुकीला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.

अशोक चव्हाण यांना माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी चांगलेच आव्हान दिले आहे. या मतदारसंघात शंकरराव चव्हाण हे तीनवेळा निवडून आले होते. त्यानंतर ते लोकसभेत गेले आणि त्यानंतर बाबासाहेब गोरठेकर, त्यांचे चिरंजीव व दोनवेळा डॉ. माधव किन्हाळकर हे विजयी झालेले आहेत. अशोक चव्हाण यांनी गेल्यावेळी किन्हाळकरांचा पराभव केला होता. आता अशोक चव्हाण खासदार झाल्याने या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. कॉंग्रेसचा उमेदवार ठरविण्याआधीच डॉ. माधव किन्हाळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मोदी लाट असतानाही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची लाज राखण्याचे काम या मतदारसंघाने आणि शेजारच्या हिंगोली मतदारसंघाने केले. लाटेतही अशोक चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत विरोधकांना बरेच परिश्रम करावे लागतील असे वाटत असतानाच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी जणू रीघच लागली. अशोक चव्हाण यांचे पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधक सेना भाजपमध्ये दाखल होण्याची जणू स्पर्धाच लागली. प्रताप पाटील चिखलीकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक शिवसेनेत गेले. डॉ. माधव किन्हाळकर आणि अशोकरावांचे निकटचे नातेवाईक माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. माधव किन्हाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भोकर तालुक्यातील ४५ गावच्या सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले. हा जो पक्षांतराचा धडाका झाला त्यामुळे हबकून कॉंग्रेसचा उमेदवार अखेरपर्यंत ठरत नव्हता. अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी लोकसभेलाही नांदेडमधून अर्ज भरला होता मात्र अखेरच्या क्षणी अशोकराव चव्हाण यांची उमेदवारी पक्की झाली. आता भोकरमधूनही बदलत्या परिस्थितीत अशोक चव्हाण हेच अर्ज भरतील अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरच्या क्षणी हायकमांडकडून निरोप आला आणि बी फॉर्म अमिता चव्हाण यांच्या अर्जाला लागला. अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीत खूप अंतर आहे. मतदारांच्या दृष्टीने दोघांच्या उमेदवारीत फारच फरक पडतो. डॉ. माधव किन्हाळकर यांच्याबाबत मतदार संघात मोठी सहानुभूती आहे. किन्हाळकरांनी लढविलेल्या न्यायालयीन लढाईमुळे त्यांची लढाऊ प्रतिमा निर्माण झाली आहे. दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून आणि मंत्री म्हणून गावागावात त्यांनी केलेल्या कामामुळे ते परिचित आहे. सध्यातरी डॉ. माधव किन्हाळकर यांनी अमिता चव्हाण आणि कॉंग्रेससमोर एक जबरदस्त आव्हान उभे केले आहे.

Leave a Comment