सार्वजनिक सुट्टय़ा, सणांच्या दिवशी मेट्रो तिकिटांवर सवलत

metro
मुंबई – या महिन्यात महात्मा गांधी जयंती, दसरा, बकरी ईद, दिवाळी अशा सण येणार असल्यामुळे सणांचे निमित्त साधत प्रत्येकजण आपल्या नातलगांना भेटण्यासाठी जातील. मुंबई मेट्रो प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेता यंदा ऑक्टोबर महिन्यात नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रोच्या तिकिटांवर सवलत देण्याचे ठरवले आहे. मेट्रो प्रशासनाने मेट्रो तिकीट दरांवर धमाका ऑफर लावली असून ऑक्टोबर महिन्यात येणारे सण, सार्वजनिक सुट्टय़ा, आठवडय़ाचे शेवटचे दिवस या दिवसांना मेट्रो तिकिटांच्या दरात सवलत देण्यात आली आहे. हे दिवस वगळता इतर दिवशी मेट्रो तिकिटांचे नेहमीचे दर लागू असतील.

मुंबईकरांनी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणा-या मुंबई मेट्रोला भरभरून प्रतिसाद दिला असल्यामुळे मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमिटेडने मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीकोनातून परतीचे तिकीट, स्मार्ट कार्ड, कुपन अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त सण येत असल्याने मेट्रो प्रशासनाने सणांच्या कालावधीत मेट्रो तिकिटांवर सवलत देण्याचे ठरविले आहे. तसेच ही सवलत सध्यातरी केवळ ऑक्टोबर महिन्यापुरती मर्यादीत आहे. सध्या मेट्रोचे तिकीट दर १५ ते २० रु. आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यातील सार्वजनीक सुट्टय़ा, सणांचे दिवस, शनिवार-रविवार या दिवशी १२ वर्षांपर्यंतच्या मुलांचे तिकीट ५ रु. तर प्रौढांसाठी १० रु. तिकीट दर आकारले जातील. २, ५, ११, १२, १८, १९, २३ आणि २६ ऑक्टोबर या दिवशी मेट्रोच्या तिकिटांवर सवलत असेल. हे दिवस वगळता इतर दिवशी मेट्रोचे नेहमीचे तिकीट दर आकारले जातील.

Leave a Comment