सोलापुरात कॉंग्रेस-राष्ट्रवादी बंडखोरीने जर्जर

congress
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वाधिक प्रभावशाली पक्ष आहे. त्या खालोखाल शिवसेना बळ राखून आहे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचे एक विशिष्ट प्रभावक्षेत्र आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची फार धुलाई होणार नाही अशी आशा वाटत होती. परंतु या दोन्ही पक्षातील बंडखोरांमुळे त्यांच्यावर निराशेचे सावट पसरले आहे. या दोन्ही पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी श्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून शिवसेना किंवा भाजपात जाणे पसंत केले आहे, शिवाय काही नेत्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला जवळ केले आहे.

सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठींनी तो मंजूर करून त्यांना मुक्त केले, पण आठवडाभरातच त्यांना प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस केले. ही गोष्ट मोठी हास्यास्पद ठरली आहे. कारण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार्‍या पदाधिकार्‍याला पक्षाने बढती दिलेली आहे. हेच बाळासाहेब शेळके दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायला इच्छुक होते, परंतु पक्षाने विद्यमान आमदार दिलीप माने यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे शेळके यांनी कॉंग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी मिळवली आहे. बाळासाहेब शेळके यांच्या या बंडखोरीला मोठे राजकीय परिमाण आहे, कारण त्यांचे सासरे आनंदराव देवकते हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. आता या दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपाचे मातबर उमेदवार आणि माजी खासदार सुभाष देशमुख हेही उभे आहेत. या मतदारसंघात एमआयएम या पक्षाचा मुस्लीम उमेदवार उभा असल्यामुळे दिलीप माने आणि बाळासाहेब शेळके या दोघांच्याही उमेदवारीला आव्हान उभे राहिले आहे. या मतदार संघात शिवसेनेने गणेश वानकर या निष्ठावंत पण नवख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असल्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य जाणवत नाही. या मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांना शिवसेनेने नाकारल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. परिणामी सुभाष देशमुख यांची निवडणूक सोपी झाली आहे.

कॉंग्रेस पक्षाला बंडखोरीचा खरा फटका सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य मतदारसंघात बसला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख आणि गेल्या ५० वर्षांपासूनचे त्यांचे जीवलग मित्र विष्णुपंत कोठे यांनी आपले चिरंजीव महेश कोठे यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या घरातली ही बंडखोरी त्यांना भारीच महाग पडणार आहे. कारण विष्णुपंत आणि महेश कोठे यांचा सोलापूर महानगरपालिकेवर वरचष्मा आहे आणि ते प्रणिती शिंदे यांना पराभूत करू शकतात. मुस्लीम मतदार हे कॉंग्रेस पक्षाचे हक्काचे मतदार, परंतु या शहर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तौफिक शेख यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली असून आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या मुस्लीम मतांत मोठी घट होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही सोलापूर जिल्ह्यात मोठे झटके बसले आहेत. पक्षाने कॉंग्रेसशी असलेली युती मोडल्यामुळे सगळ्या मतदारसंघात उमेदवार उभे करता येतात आणि इच्छुक उमेदवारांचे समाधान करता येते, तरी सुद्धा अनेक इच्छुक नाराज राहिलेले आहेत आणि त्यांनी पक्षाला रामराम ठोकून अन्य पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन असलेले माढ्याचे संजय शिंदे हे त्याचे उदाहरण. ते पूर्वी पंचायत समितीचे सभापती सुद्धा होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे ते बंधू होत. त्यांना लोकसभेत सुद्धा उमेदवारी हवी होती, पण ती मिळाली नाही म्हणून ते नाराज होते. आपल्या माढा मतदारसंघात आपल्या बंधूला डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याला तिकीट देणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करून स्वाभीमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. आता ते महायुतीचे उमेदवार म्हणून करमाळा मतदारसंघात उभे आहेत. तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. रश्मी बागल या विद्यमान आमदार श्यामलताई बागल यांच्या कन्या आहेत आणि बारामतीच्या शरद पवार यांच्याशी जवळीक असलेल्या कोलते कुटुंबाच्या स्नुषा आहेत. त्या राहतात बारामतीत, पण त्यांना पवारांच्या कृपेने करमाळ्याची उमेदवारी मिळालेली आहे. त्यांना संजय शिंदे यांच्याशी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. दहा वर्षांपूर्वी रश्मी बागल यांनी करमाळ्याच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपले दिवंगत पिताजी, माजी आमदार दिगंबर बागल यांचा गट संघटित करून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाशी दोन हात केले होते. त्यावेळी या मुलीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांना अजित पवार यांनी बळ दिले होते. परंतु दहा वर्षांपूर्वी त्यांच्याविषयी निर्माण झालेले मतदारांतील आकर्षण आता शिल्लक नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसलेला दुसरा धक्का म्हणजे पंढरपूरच्या परिचारकांचा. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे १९८५ पासून सलग पाच वेळा पंढरपूर मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून येत गेले. २००९ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांना त्यांचा माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे पंढरपुरात आणून उभे करण्यात आले आणि त्यासाठी परिचारकांचा बळी देण्यात आला. सलग पाच वेळा निवडणूक जिंकणार्‍या आमदाराला अशा प्रकारे डावलले गेले असले तरी त्यांचे पुनर्वसन कोठे तरी केले जाईल असे वाटत होते. प्रत्यक्षात पुनर्वसन तर झाले नाहीच, पण शरद पवार यांनी त्यांचे एस.टी. महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेतले आणि ते आपले नातेवाईक असलेल्या जीवन गोरे यांना दिले. सुधाकरपंत परिचारक यांचा बळी ज्यांच्यासाठी दिला ते मोहिते-पाटील सुद्धा परिचारकांवरच उलटले. मोहिते-पाटलांचा पराभव करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार भारत भालके यांनी मोहिते-पाटलांशी हातमिळवणी केली आणि या दोघांनी मिळून परिचारक गटाचे खच्चीकरण करायला सुरुवात केली. त्यामुळे आता परिचारकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेशी साेयरिक केली आहे. आता सुधाकरपंतांचे पुतणे आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक हे विधानसभेला उभे आहेत. गमतीचा भाग म्हणजे अपक्ष म्हणून २००९ साली निवडून आलेले आमदार भारत भालके हे आता कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे मोहोळ मतदारसंघात २००९ साली निवडून आले होते. मात्र आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आला. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सत्तेचा वापर करून राज्याच्या कानाकोपर्‍यात अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत आणि आश्रमशाळा चालवलेल्या आहेत. प्रा. ढोबळे यांचे ते एक संस्थानच झालेले आहे. त्यातल्याच नवी मुंबईच्या एका महाविद्यालयातील कर्मचारी महिलेने ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. कायद्याच्या काही सवलती मिळवून ढोबळे यांनी अटक टाळली. परंतु त्यांची बदनामी झाली. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच या घटना घडल्यामुळे ढोबळे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे ढोबळे चिडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिव्यांची लाखोली वहात मोहोळ मतदारसंघातच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या व्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना बंडखोरीचे बरेच धक्के बसले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माढा, माळशिरस या दोन जागा मजबूत आहेत. सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने शे. का. पक्षाचे उमदेवार गणपतराव देशमुख यांचा मान राखण्यासाठी त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नाही. म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यातल्या आठ मतदारसंघात संकटात आहे. मावळत्या विधानसभेत सहा आमदार असलेल्या या पक्षाचे बळ दोन वर खाली येणार आहे. कॉंग्रेसचे सध्या दोनच आमदार जिल्ह्यात आहेत आणि या दोन्हीही जागा संकटात आहेत.

अरविंद जोशी

Leave a Comment