सेक्युलॅरिझमचा तुळजापुरात बळी

tuljabhavani
काल अष्टमी होती, नवरात्रातल्या अष्टमीला तुळजापूरच्या तुळजाभवानी समोर बोकड बळी दिला जातो. तुळजाभवानी देवस्थान तर्फे रिवाजानुसार हा बळी दिला गेलाच असेल, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी काल सेक्युलॅरिझमचा बळी दिला. कॉंग्रेसची विचारसरणी काय, असा प्रश्‍न विचारल्यास कॉंग्रेसचा कोणताही नेता एका क्षणाचाही विलंब न लावता धर्मनिरपेक्षता ही कॉंग्रेसची विचारसरणी असल्याचे आवर्जून सांगतो. याचा अर्थ राजकारणात धर्म नको असा होतो. हे तत्वज्ञान सांगत असतानाच कॉंग्रेसचे आणि अन्यही सर्व सेक्युलरवादी पक्षांचे नेते प्रत्यक्षात या सेक्युलॅरिझमशी पूर्णपणे विसंगत वर्तन करत असतात. तोंडाने सेक्युलॅरिझमची भाषा करून प्रत्यक्षात त्या तत्वज्ञानाची सर्वाधिक कुचेष्टा याच मंडळींनी केलेली आहे. कॉंग्रेस पक्षाने काल तुळजापूर मध्ये आपल्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ केला. त्यांनी कॉंग्रेसच्या प्रचाराचे दोन शुभारंभ केले आहेत. पहिला शुभारंभ त्यांनी मुंबईत केला होता. मुंबईतल्या हुतात्मा चौकात त्यांची पहिली सभा झाली होती. आता आपल्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे असे म्हणून तिथेही अनेक नारळ फोडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तुळजाभवानीच्या साक्षीने दुसरा नारळ फोडण्याची काय गरज होती हे काही समजले नाही.

मुंबईमध्ये हुतात्मा चौकात नारळ फोडण्यामागे काही एक वेगळा हेतू होता. हुतात्मा चौकात नारळ फोडला की संयुक्त महाराष्ट्राची आठवण होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने आणाभाका घेऊन प्रचाराला भावनिक आधार देता येतो. तसा काही तरी तो देण्याचा कॉंग्रेसचा हेतू असावा. कॉंग्रेसच्या नेत्यांना आता काय करावे हे समजेनासे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराती आहेत, त्यामुळे निवडणुकीला मराठी विरुद्ध गुजराती असे रूप देऊन नरेंद्र मोदींच्या नावाने भरपूर शिमगा करून महाराष्ट्रातली मराठी मते मिळवावीत असा त्यांनी डाव टाकला आहे. परंतु त्यांच्या डोक्यात किंवा खोक्यात एवढीही एक गोष्ट येत नाही की, संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे पंडित नेहरू हे कॉंग्रेसचेच होते आणि मुंबईच्या हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रवादी मोर्चावर गोळीबार करून १०५ जणांचे बळी घेणारे मोरारजी देसाई यांचे सरकार कॉंग्रेसचेच होते. अर्थात कॉंग्रेसच्या नेत्यांचा नेहमीच लोकांची दिशाभूल करण्यावर भर असतो. ते नंतर त्यांच्या लक्षात आले आणि आता निवडणुकीचा खरा नारळ तुळजापूरात तुळजाभवानीच्या पायाशी फोडण्यात आला. मग असे जर आहे तर तुळजाभवानीच्या पायाशी नारळ फोडण्यामुळे राजकारणाला धार्मिक स्वरूप येत नाही का? याचा विचार कॉंग्रेसचे नेते तर करत नाहीतच, पण मतदार सुद्धा करत नाहीत.

एका बाजूला सर्वधर्म समभाव किंवा निधर्मीवादाचा डांगोरा पिटायचा आणि दुसर्‍या बाजूला धर्माचे अवडंबर माजवायचे अशी सर्वांनाच खोड जडली आहे. कालच भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा प्रारंभ पंढरपुरात झाला. कॉंग्रेसने तुळजाभवानीला साकडे घातले तर भाजपाने पांडुरंगाला साकडे घातले. एकंदरीत देवाचे नाव घेतल्याशिवाय प्रचाराचा प्रारंभच केला जात नाही. खरे म्हणजे विधानसभेचे सदस्य निवडायचे आहेत त्याचा धर्माशी आणि देवाशी काय संबंध? असा प्रश्‍न कोणाच्याच मनात येत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे देवाधर्माला न मानणारे अंधश्रद्धाविरोधी नेते मानले जातात. त्यांनी अनेकदा ही गोष्ट स्पष्टही केली आहे. तरी त्यांना एकदा पंढरपूरला यावेच लागले. त्यावेळी त्यांनी पत्नीच्या आग्रहासाठी आलो असे म्हणून वेळ मारून नेली. पण त्यांच्याही प्रचाराचा प्रारंभ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या साक्षीने झाला. त्यांना सुद्धा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रचाराचा प्रारंभ करून लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालण्याचा मोह टाळता आला नाही. शिवसेनेला तर तो टाळता येणारच नाही. कारण त्यांनी स्वत:ला निधर्मवादी म्हणवलेलेच नाही. म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या आधी उद्धव ठाकरे तुळजापूरला येऊन गेले.

त्यांनी घटस्थापनेदिवशी तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेतले आणि तिथून बाहेर पडून भाजपाशी घटस्फोट घेण्याची घोषणा केली. म्हणजे तुळजाभवानीने त्यांना काय सद्बुद्धी दिली असेल याचा अंदाज येतो. निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ देवाच्या साक्षीने करणे ही लोकशाहीतली एक विसंगती आहे हे यापैकी कोणाच्याच लक्षात येत नाही. मात्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे अशा धार्मिकतेपासून खूप दूर रहात असत. पंतप्रधान म्हणून दर्शनाला जाणे, आपल्या धार्मिक श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन करणे आणि निवडणुकीचा प्रारंभ देवाचा आशिर्वाद घेऊन करणे अशा गोष्टी ते कटाक्षाने टाळत असत आणि ते सेक्युलॅरिझमशी सुसंगत असेच होते. पण त्यांच्या कन्या इंदिरा गांधी देवदर्शनाचे ढोंग-धत्तुरे फार माजवले, अनेक साधू आणि सन्याशी त्यांचे सल्लागार बनले. त्या रुद्राक्षाची माळ गळ्यात घालायला लागल्या आणि बघता बघता त्यांच्या एकंदर जीवनामध्ये या कर्मकांडांचा बडिवार निर्माण झाला. नंतर तर कोणालाच या गोष्टीचे वैषम्य वाटेनासे झाले. सार्वजनिकदृष्ट्या असे अवडंबर तर केलेच जातेच, पण वैयक्तिक जीवनात सुद्धा सेक्युलर म्हणवणारे नेते कमालीचे अंधश्रद्ध असतात. महाराष्ट्रात अनेक उमेदवारांनी निवडणूक येण्यासाठी अनुष्ठाने सुरू केली आहेत. अशा प्रकारच्या कालबाह्य कर्मकांडाच्या आहारी जाताना प्रत्यक्षात मात्र ते व्यासपीठावरून परिवर्तनाच्या गप्पा मारत असतात.

Leave a Comment