फार अवघड आहे

yuti
शिवसेनेने रागाच्या भरात आणि कथित सल्लागारांच्या कान फुंकण्याने युती मोडली असल्याचे जाहीर केले असले तरी सर्व पातळ्यांवर ती मोडीत काढणे किती अवघड आहे हे आता उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात यायला लागले आहे. म्हणूनच केन्द्रातल्या सत्ताधारी एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याची त्यांनी काल घोषणा केली असली तरी आज त्याबाबत सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. नरेन्द्र मोदी परदेशातून परत आल्यावर त्यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय घेतला जाईला असे त्यांनी म्हटले आहे. ही युती मोडली असली तरीही ती गेल्या २५ वर्षांपासून एवढी गाढ झाली होती की, ती पूर्णपणे मोडणे अवघडच आहे. आता विधानसभा निवडणुकीत दोघांचे जमले नाही म्हणून सगळ्या स्तरांवर युती मोडायची ठरवली तर मुंबई महानगरपालिकेचे काय करणार ? तिथे युती मोडली तर शिवसेनेेचे कंबरडेच मोडणार आहे. विधानसभा निवडणुकीपुरती युती मोडताना शिवसेनेच्या नेत्यांनी याचा विचार केला नव्हता असे दिसते. पण आता युती मोडणे किती प्रकारे हानीकारक ठरू शकते याचा साक्षात्कार होत असेल.

तो जसा होईल तशी परस्परांवरील टीकाही कमी होईल. खरे तर टीका पूर्णपणे अनाठायी आहे. खरे तर दोन पक्ष वेगळे आहेत. त्यांनी कायम युतीतच राहिले पाहिजे अशी काही सक्ती करता येत नाही. म्हणून आरोप प्रत्यारोप व्यर्थ आहेत. दोन्हीही पक्षांच्या नेत्यांना युती मोडली हे काही ठीक झालेले नाही हे लक्षात यायला लागले आहे. युती मोडली ते बरेच झाले असे आजवर तरी कोणी म्हटलेले नाही. शिवसेनेने या निमित्ताने भाजपावर टीका केली तरीही भाजपाचे नेते त्यांना प्रत्युत्तर देणार नाहीत असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. कारण आता भाजपाला शिवसेनेची युती नको आहे हे खरे पण शिवसेनेला दुखवून किंवा त्यांच्यावर टीका करून भाजपाला काहीच साध्य करायचे नाही. त्याचा आज तरी कसलाच राजकीय फायदा होणार नाही. भाजपालाच स्पष्ट बहुमत मिळेल अशी फडणवीस यांना खात्री आहे पण असा आत्मविश्‍वास व्यक्त करणारे नेते तरीही सगळ्या शक्यता गृहित धरत असतात. आपण स्पष्ट बहुमत मिळणार असे कितीही म्हणत असलो तरीही समजा बहुमताला काही जागा कमी पडल्या तर त्या इतर कोणाकडून मागण्यापेक्षा शिवसेनेलाच मागणे प्रशस्त ठरणार आहे. तेव्हा भविष्यातली ही गरज लक्षात घेऊन आज शिवसेनेला फार दुखवू नका असाही त्यांचा सावधतेचा पवित्रा आहे.

मात्र त्यांच्या या धोरणामागे अजून एक कारण आहे. सध्या युती मोडली असली तरीही अजून तळागाळातले अनेक कार्यकर्ते युती असायला हवी होती असे म्हणत आहेत. युतीची गरज दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कळली नाही. स्थानिक पातळीवर तिची गरज अनेक कार्यकर्त्यांना अजूनही कळते. शिवसेना आणि भाजपाची संघटनात्मक ताकद अजूनही पूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झालेली नाही. अजूनही अनेक मतदारसंघात अशी स्थिती आहे की, दोन्हीतला एक पक्ष तिथे अगदीच उपस्थित नाही. एखाद्या मतदारसंघात शिवसेनेचा कार्यकर्ता निवडून येण्याची शक्यता आहे आणि भाजपाला औषधालाही कार्यकर्ता सापडत नाही अशी अवस्था आहे. याच्या उलटही स्थिती आहे. युती मोडली असली तरीही तिथे एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिल्याने कॉंग्रेसचेच फावणार असेल तर वरच्या वितुष्टाचा विचार न करता आपण स्थानिक पातळीवर समझोता केला पाहिजे असा विचार आता केला जाणार आहे. दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल आणि हे चित्र दिसेल. फडवणीस आणि ठाकरे यांनी युती मोडली असली तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी नकळतपणे ती टिकवली आहे असे दृश्य आपल्याला पहायला मिळेल. कारण युतीची पाळेमुळे खोलवर रुजलेली तर आहेतच पण आता युती मोडण्याचा फायदा कॉंग्रेसला होण्याची भीती आहे हे या सामान्य कार्यकर्त्यांना कळते.

ठाकरे यांनी युती मोडली असली तरी ती सर्वत्र मोडणे आणि एनडीएतून बाहेर पडणे हे किती अवघड आहे याचा साक्षात्कार त्यांना होत आहे. राज ठाकरे त्यांना डिवचत आहेत. भाजपासमोर लाचार होऊ नका, केवळ महाराष्ट्रातली युती मोडून भागणार नाही तर एनडीए आघाडीतून बाहेर पडले पाहिजे. केन्द्रातला मंत्रीही बाहेर पडला पाहिजे अशी चिथावणी राज ठाकरे देत आहेत. खरे तर त्यांना असे बोलण्याचा आणि शिवसेनेची लाचारी काढण्याचा काहीही अधिकार नाही कारण त्यांनी स्वत:च नाशिक महानगरपालिकेतली सत्ता हाती रहावी म्हणून छगन भुजबळ यांची लाचारी स्वीकारली आहे. त्यांच्यात थोडा जरी स्वाभीमान असता तर त्यांनी नाशिक महानगर पालिकेतली सत्ता गेली तरी बेहत्तर पण त्या मफलरवाल्या पुढे झुकणार नाही असा निर्धार केला असता पण त्यांना स्वाभीमानापेक्षा नाशिक महानगरपालिकेतली ती अर्धीमुर्धी सत्ता अधिक प्रिय वाटली. तेच राज ठाकरे आता उद्धव ठाकरे यांना स्वाभीमान शिकवायला लागले आहेत. त्यांचा प्रभावही पडत आहे. पण प्रत्यक्षात हे अवघड आहे. असा टोकाचा विचार केला महानगर पालिकांतही युती मोडून हातातली सत्ता सोडणे फार अवघड जाणार आहे. राज ठाकरे यांना बोलायला काय जाते ?

Leave a Comment