कविता करकरे यांनी मृत्यूनंतरही वाचवले तीन जीव

kavita-karkare
मुंबई- शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी मृत्यूनंतरही देहदानाच्या माध्यमातून त्यांनी तीन व्यक्तींचा जीव वाचवला असून अंधांना दृष्टी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तीन मुलांनी प्रचंड धैर्य दाखवत हा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकाराने करकरे कुटुंबीयांनी एक आदर्श घालून दिला आहे.

आकाश, सायली आणि जुई अशी तीन मुले हेमंत आणि कविता करकरे यांना आहेत. मुलगी अमेरिकेतून परत येईपर्यंत कविता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कविता यांची एक किडनी रुग्णाला दान करण्यात आली असून हा रुग्ण दशकभरापासून डायलिसिसवर होता. गेल्या मार्च महिन्यात या रुग्णाने किडनीसाठी मागणी नोंदवली होती.

जसलोक रुग्णालयातील एका रुग्णाला दुसरी किडनी दान करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून तो ट्रान्सप्लॉंटची वाट बघत होता.

गेल्या काही वर्षांपासून एक रुग्ण लिव्हर खराब झाल्याने त्रस्त होता. त्याला कविता यांचे लिव्हर दान करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात या रुग्णाने लिव्हरसाठी नोंदणी केली होती.

परेल येथील हाजी बचोली आय बॅंकेला कविता यांचे डोळे दान करण्यात आले आहेत. यातून दोन अंधांना दृष्टी मिळणार आहे.