लोभी नेत्यांना धडा

vidhansabha
विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात लोकशाहीची कशी कुचेष्टा केली जाते याचे प्रात्यक्षिकच बघायला मिळाले. या लोभी लोकांना मत देण्याचीसुद्धा लाज वाटते. कोणीही कोणत्याही पक्षातून कोणत्याही पक्षात जात होता आणि त्याला तिकिट द्यायला बसलेले दलाल त्याच्या टोपीबदलूपणाची काहीही क्षिती न बाळगता त्यांना तिकिटे वाटत सुटले होते. या बाजारातून कोणताही पक्ष सुटला नाही. महाराष्ट्रातले राजकीय नेते कपडे बदलावे इतक्या वेगाने पक्ष बदलत होते. राजकीय पक्ष, त्याची बांधीलकी, राजकारणाचे पावित्र्य या सार्‍या गोष्टी गुंडाळून ठेवून हे नेते केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या उमेदवारीचा बाजार मांडत होते. हे सारे खैळ पैसा आणि प्रतिष्ठा यांच्यासाठी चाललेले होते. खरे तर यापेक्षाही चांगल्या मार्गाने यापेक्षाही जास्त पैसा कमावता येतो पण सर्वांना गैरमार्गांनी पैसा कमावण्याची हाव सुटली आहे.

याच दिवशी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना अशाच हव्यासाचे फळ म्हणून चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली जात होती. गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांनी मनमुराद भ्रष्टाचार करायला सुरूवात केली. कितीही भ्रष्टाचार केला तरी काही होत नाही अशा कल्पनेने त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. त्यात अनेक नेते गाजले. अंतुले, मायावती, राजीव गांधी, रॉबर्ट वड्रा, लालू प्रसाद, मुलायमसिंग, अशोक चव्हाण अशा किती नेत्यांवर खटले भरले गेले. त्यातल्या काहींची प्रकरणे न्यायालयापर्यंत चालून त्यांना शिक्षाही सुनावल्या गेल्या. लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावली. हरियाणातले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला हे तर आता जेलमध्येच आहेत. महाराष्ट्रात सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांना सध्या कोठडीत ठेवले आहे. त्यांच्यावरचे खटले उभे राहिलेले नाहीत पण त्यांना दोन वर्षांपासून जामीन मिळालेला नाही. सुरेेश कलमाडी, ए. राजा यांच्यावरचे खटले कोणत्याही क्षणी उभे राहू शकतात. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी हेही वर्षाची कोठडी भोगून बाहेर पडले आहेत. कर्नाटकातले रेड्डी बंधू आणि येडीयुरप्पा यांना कोणत्या क्षणी आत जावे लागेल याचा काही भरवसा नाही. अलीकडच्या काळात या लोकांच्या हातात बेड्या पडायला लागल्या आहेत. त्यांचे प्रमाण कमी असेल पण आणि त्यांनाही सामान्य चोरांप्रमाणे कारागृहात जावे लागते, या दरोडेखोेरांना कधी ना कधी आपल्या कृष्णकृत्यांचा जाब द्यावा लागतोय हे बघून व्यवस्थेवरचा विश्‍वास दृढ होतो.

अशा सुखद गोष्टी घडण्यासाठी कोणाला तरी साहसी पाऊल टाकावे लागते. जयललिता यांनी १९९१ ते १९९६ या पाच वर्षात पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना आपल्या मैत्रिणीच्या मदतीने ६६ कोटी रुपयांची बेकायदा संपत्ती मिळवली असा त्यांच्यावर आरोप होता. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या विरोधातले पुरावे गोळा केले आणि धारिष्ट करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले म्हणून त्यांच्यावर कारवायी होऊ शकली. भ्रष्टाचाराच्या विरोधात असे कोणीतरी साहसाने उभे राहिले म्हणूनच जयललिता यांचा भ्रष्टाचार उघड झाला. ही एक मोठी जोखीमच असते. असे लोक भ्रष्ट नेत्यांच्या ढोंगाचा पडदा उघडण्याचे साहस करतात आणि त्यांना राजकारणातून बाद व्हावे लागते. अशा वेळी त्यांना मोठेच जोखमीचे जीवन जगावे लागते. भारतात आजवर माहितीच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करणार्‍यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरीही अनेक लोक या क्षेत्रात कार्य करीत आहेत.तेच खरे देशभक्त आहेत. पण त्यांंना साधे संरक्षणही मिळत नाही.

भ्रष्टाचार करणारे मात्र छत्र चामरांचा मान मिळवून सरकारी गाड्यातून फिरत आहेत. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी अशाच धाडसाने २ जी स्पेक्ट्रम प्रकरण उघड केले आहे. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा तर सतत चार वर्षे केला होता. लोकांनी त्यांनाच आधी वेड्यात काढले. पण स्वामी यांनी चिकाटीने हे काम केले आणि देशातला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघड्यावर आणला. तरी आपले दुर्दैव असे की, पद्म पुरस्कार देताना अशा लोकांच्या नावाचा कोणी विचारही करीत नाही. सदैव टीकेचे आणि उपहासाचे घाव सोसून का होईना पण हे लोक आपले काम करीत असतात. जयललिता यांना या प्रकरणात त्यांचे मैत्रीण शशीकला ही भोवली. आपल्या मैत्रिणीच्या पदाचा गैरवापर करून शशीकला यांनी पैसा कमावला. खरे तर पैसा ही एक अशी वस्तू आहे की जी कितीही हिकमतीने कमावली तरीही शेवटी यमाजींचे बोलावणे आले की सारा पैसा येथेच ठेवून अंतिम प्रवासाला जावे लागते. हे सारे माहीत असूनही लोकांचा हव्यास कमी होत नाही. खरे तर जयललिता हा एक नमुना आहे. देशातले अनेक पुढारी याच लायकीचे आहेत पण त्यांना न्यायालयाच्या प्रक्रियेत आणून कारागृहात पाठवले पाहिजे तरच या लोकांवर जरब बसेल. लोकशाहीच्या शुद्धीकरणाची ही प्रक्रिया एकदा सुरू झाली पाहिजे. सत्तेसाठी लाचार होऊन भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याचे उद्योग थांबलेच पाहिजेत.

Leave a Comment