उद्धव ठाकरे यांचे नैराश्य

uddhav
भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी असलेली युती मोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांना वाईट वाटले. ही युती अशीच सुरू राहील असे त्यांना वाटत होते पण तसे झाले नाही. म्हणून त्यांना वाईट वाटले. त्यावर ते चिडले आणि त्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत बोटे मोडायला सुरूवात केली. युती मोडणे ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे असा आरोप त्यांनी केला. तो आरोप भाजपासाठी होता हे कोणाला सांगावे लागत नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती टिकणे म्हणजे महाराष्ट्राशी निष्ठा आणि युती मोडणे ही गद्दारी हा त्यांचा युक्तिवाद खरा असेल तर त्यांनी ही गद्दारी कोणी केली आहे याचा आपल्या मनाशी तपास करून पहावा. या दोन पक्षांचे मनोमीलन झाल्याशिवाय युतीला काही अर्थ नव्हता. पण शिवसेनेने आपल्या सामना मधून भाजपाला किती वेळा आणि किती शिव्या दिल्या आहेत याची मोजदाद करावी म्हणजे युतीच्या दुधात मिठाचा खडा पहिल्यांदा कोणी टाकला आहे हे त्यांच्या लक्षात येईल.

उद्धव ठाकरे सध्या देत आहेत ते शिव्याशाप हे नैराश्यातून आले आहेत. आयती मोदी लाट आली आहे आणि तिचा फायदा घेऊन आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता येईल हे त्यांचे स्वप्न भंगले आहे म्हणून ते निराश झाले आहेत. मांजर डोळे झाकून दूध पिते पण त्याला वाटते की आपले नाही तर जगाचे डोळे बंद आहेत. ठाकरे यांचे तसेच सुरू होते. महाराष्ट्रात मोदी लाट नाही तर शिवसेनेची लाट आहे असा त्यांचा दावा होता. मोदी लाटेचे लाभ करून घ्यायचे पण मोदींना तुच्छ लेखायचे, महाराष्ट्रात सत्ता मिळवायची पण मोदीमुळे आपल्याला लाभ मिळाला नसून आपल्यामुळे मोदींना लाभ मिळाला आहे असे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे बकध्यान कोणी ओळखले असेल तर तो ते ओळखणारांचा दोष आहे का ? गलितगात्र झालेल्या शिवसेनेला मोदी लाटेने जीवदान मिळाले आहे पण भाजपा नेत्यांनी ठाकरे यांना त्याची फारशी स्पष्टपणे जाणीव दिली नाही. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आमच्यामुळे मिळालेले आहे तेव्हा आता शिवसेनेने ११७ आणि भाजपाने १६९ जागा लढवल्या पाहिजेत असे भाजपा नेत्यांनी त्यांना खडसावले असते तर त्यांची काही चूक आहे असे कोणी म्हटले नसते. पण तशी जाणीव दिली नाही म्हणून ठाकरे यांनी ही बाब समजून घ्यायला काय हरकत होती ? ती त्यांनी समजून तर घेतली नाहीच उलट ते भाजपालाच हीन वागणूक द्यायला लागले. आता आपला हा मतलबीपणा उघड झाला म्हणून ते स्वत:च चिडले आहेत. आणि भाजपाला गद्दार म्हणायला लागले आहेत.

युती मोडण्यात चूक काय ? या दोन पक्षांची युती होताना ती यावच्चंद्रदिवाकरौ कायम राहील अशा काही आणाभाका झाल्या होत्या का? तशा आणाभाका झाल्या नव्हत्या म्हणजे ही युती कधी तरी मोडणार हे ठरलेलेच होते. शिवसेनेेनेही यापूर्वी काही वेळा युती करून ती मोडली आहे. शिवसेनेने प्रथमच राजकारणात पाऊल टाकले तेव्हा त्यांना आपला हा पक्ष नेमका कसा असावा याचा निर्णय घेता आला नव्हता. मराठी भाषकांच्या हितासाठी तो होताच पण राजकीय विचार सरणी काय असावी याची निश्‍चिती करता आली नव्हती. लोकांना कदाचित जुन्या घटना आठवत नसतील पण शिवसेनेने पहिल्यांदा प्रजा समाजवादी पार्टीशी युती केली होती. ती नंतर मोडली. मग तो काय महाराष्ट्राशी गद्दारी करण्याचा प्रकार होता का ? शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या मराठी माणसासाठी खूप काही केले आहे. पण त्यांना नंतर नंतर केवळ मराठी माणूस मराठी माणूस म्हणत बसल्याने काही साध्य होणार नाही हे लक्षात आले आणि त्यांनी नंतर हिंदुत्वाचा पुकारा करायला सुरूवात केली. आणीबाणीत तर शिवसेना इंदिरा गांधी यांची प्रशंसा करीत होती कारण आणीबाणीच्या रूपाने बाळासाहेबांचे एकाधिकारशाहीचे स्वप्न सत्यात उतरले होते.

आता मोडलेली युती ही महाराष्ट्राची गद्दारी आहे. बाळासाहेब आणि प्रमोद महाजन हयात असते तर त्यांनी युती मोडू दिली नसती असा काही लोकांनी सूर लावला आहे. तोही यथार्थ नाही. १९९९ साली प्रस्तुत लेखकाने प्रमोद महाजन यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांना या बाबत एक प्रश्‍न विचारला होता. कोणत्याही पक्षाची संघटना निवडणुकीच्या निमित्तानेच तयार होत असते आणि वाढत असते. पण भाजपाने १६९ जागा शिवसेनेला सोडल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या १६९ मतदारसंघात भाजपाची संघटना कायम बंद राहणार का ? तसे असल्यास ही युती भाजपाच्या काय फायद्याची ? त्यावर प्रमोेद महाजन यांनी थेट काही उत्तर दिले नाही पण नंतरच्या निवडणुकीत सेंट परसेंट भाजपाची घोषणा केली होती. राज्यात कॉंग्रेस संपत आहे. पण तिच्याजागी कोणताही एक पक्ष उभरून येत नाही. अशा वेळची युती ही सोय आहे. कधीना कधी युतीतला कोणता तरी पक्ष वाढत वाढत जाऊन पर्यायी म्हणून पुढे येणारच. तसा पर्याय आपण देऊ शकतो असा भाजपाचा दावा आहे. त्यामुळे युती मोडणारच. शेवटी या दोन पक्षांचे विचारही वेगळे आहेत. यांची युती टिकली असती तर वेगळा विदर्भ, जैतापूर अणु प्रकल्प अशा विषयावरून त्यांच्यात जुंपलीच असती पण आता दोघे वेगळे झाल्याने असे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत.

Leave a Comment