थोरला भाऊ आला अडचणीत

yuti
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे आणि हे दोन्ही पक्ष आता स्वतंत्रपणे लढणार असल्यामुळे त्या दोघांनाही आपली खरी ताकद कळून चुकणार आहे. काही पत्रकारांनी आणि माध्यमांनी भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेच्या जोरावर वाढलेली पार्टी आहे असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वास्तविकता आता दिसून येईल. भारतीय जनता पार्टीची सुद्धा स्वत:ची एक ताकद आहे हे लक्षात येईल. फाटाफुटीचे मात्र राजकारणावर फार गंभीर परिणाम होणार आहेत. विशेषत: शिवसेनेला अनेक गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. भाजपालाही काही नुकसान सहन करावे लागणार आहे. गेली पंचवीस वर्षे राज्याच्या १६९ विधानसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक यंत्रणा मोडली होती, तर ११९ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची यंत्रणा मोडलेली होती. आता या सर्वच जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे राहणार आहेत आणि त्या आधी त्या भागातल्या कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे, यंत्रणा दुरुस्त कराव्या लागणार आहेत. मोठे कठीण काम आहे. युती न करता निवडणूक लढविण्याचा निर्णय असा ऐनवेळी घेण्याच्या ऐवजी एक महिन्यापूर्वीच घेतला असता तर दोन्ही पक्षांना या दुर्लक्षित मतदारसंघात आपल्या यंत्रणा सज्ज करायला वेळ मिळाला असता. परंतु तेवढा चाणाक्षपणा दोन्हीही पक्षांच्या नेत्यांकडे नाही हे दिसून आले आहे.

नारायण राणे कॉंग्रेसमध्ये वैतागले आहेत, त्यांना कॉंग्रेस पक्ष सोडायचा होता. पण राष्ट्रवादीत जाण्यात काही फायदा नव्हता आणि शिवसेना त्यांना आत घेत नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर अच्छे दिन येण्यासाठी भाजपात जाणे हाच एक मार्ग उरला होता. तसे संकेतही मिळत होते. परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर डोळे वटारले. नारायण राणे यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांना खूप त्रास दिलेला आहे, त्यामुळे भाजपाने राणे यांना जवळ करू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. खरे म्हणजे भाजपात कोणाला घ्यावे किंवा कोणाला घेऊ नये हे ठरविण्याचा अधिकार भाजपाच्या नेत्यांचा आहे. परंतु भाजपाला शिवसेनेशी मैत्री टिकवायची होती म्हणून शिवसेनेचा मान राखण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी आपली दारे नारायण राणे यांच्यासाठी बंद केली. आता युती तुटली आहे. भाजपाने शिवसेनेची तमा बाळगण्याचे काही कारण नाही. परंतु नारायण राणे यांनी भाजपात यावे अशी स्थिती आता राहिलेली नाही. तेव्हा भाजपाची एक संधी गेली. हा काडीमोड आधीच झाला असता तर नारायण राणे यांचा नारायण रथ मागेच भाजपात येऊन दाखल झाला असता. आता राणेही गेले आणि मैत्रीही तुटली, असे भाजपाचे दुहेरी नुकसान झाले आहे. शिवसेनेची युतीमधली नेमकी अडचण काय होती? त्यांना युतीतल्या जागा वाटपाबाबत ताणून का धरावेसे वाटले? याचीही कारणे मानसिक स्वरूपाची आणि गुंतागुंतीची आहेत.

शिवसेना हा पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी गलितगात्र झाला होता. सेनेतले बरेच नेते बाहेर पडले होते. मात्र सेनेला लोकसभेत १८ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेनेची इभ्रत वाचली. मात्र शिवसेनेला मिळालेले हे यश मोदींच्या प्रभावामुळे मिळाले होते. परंतु उद्धव ठाकरे ते उघडपणे मान्य करत नव्हते. तसे आपण उघडपणे मान्य केले तर भाजपाचे नेते आपली कोंडी करतील आणि आपल्याला राज्यात दुय्यम स्थान स्वीकारावे लागेल या भीतीने त्यांना ग्रासले. या भीतीपोटी आणि थोरला भाऊ हे आपले स्थान टिकावे म्हणून त्यांनी जागा वाटपाची अनेक नवी सूत्रे पुढे करायला सुरुवात केली. त्या सर्व सूत्रांमागचा विचार आपले वर्चस्व कायम टिकवणे हाच होता. शिवसेनेच्या या पवित्र्याचा आणखी एक फायदा शिवसेनेला झाला. महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले अनेक नेते शिवसेनेत आले. खरे म्हणजे त्यांना भाजपात जायचे होते, परंतु भाजपा आणि शिवसेना एकत्र असल्यामुळे भाजपात गेले काय की, शिवसेनेत गेले काय सारखेच असा विचार त्यांनी केला आणि त्यातले काही नेते शिवसेनेत गेले.

पक्षांतर करणार्‍या अशा नेत्यांचा मुख्य रोख विधानसभेच्या तिकीटावर होता आणि शिवसेना १५० जागांवर निवडणूक लढवणार होती. तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला येणार्‍या १५० मतदारसंघातल्या कॉंग्रेसच्या दलबदलू कार्यकर्त्यांना शिवसेनेत जाणेच सोयीचे होते. ते तिकीट मिळवून देणारे होते. त्यामुळे शिवसेनेत बर्‍यापैकी आवक झाली. शिवसेनेचे नेते याबाबतीत भाजपावर डाफरायला लागले. राज्यात भाजपापेक्षा शिवसेनेचे वर्चस्व जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेत अधिक लोक येत आहेत असे शिवसेनेचे लोक दावे करायला लागले. पण त्यामागचे खरे कारण वेगळे होते. आता भारतीय जनता पार्टी २२० जागा लढवणार आहे आणि जवळपास ६० जागा आपल्या मित्रपक्षांना सोडणार आहे. तेव्हा आता २२० मतदारसंघातील कॉंग्रेसच्या पक्ष बदलू कार्यकर्त्यांना भाजपात जाणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक-दोन दिवसांत आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत भाजपात प्रवेश करणार्‍यांची संख्या मोठी दिसायला लागेल. शिवसेना आणि भाजपा यांच्या जागा वाटपात भाजपाकडे नसलेल्या जागा आता भाजपासाठी मोकळ्या झाल्या आहेत. तिथे आता भाजपात येणार्‍यांची रीघ लागेल. किंबहुना या मतदारसंघा तील ज्या कार्यकत्र्यांनी विधानसभेवर डोळा ठेवून शिवसेनेत प्रवेश केला होता तेच कार्यकर्ते आता भाजपाकडे यायला लागतील आणि शिवसेनेला आपण खरेच किती पाण्यात आहोत हे समजून चुकेल.

Leave a Comment