अहंकाराचा खेळ रंगला

vidhansabha
भाजपा आणि शिवसेनेची युती ही देशातली सर्वाधिक टिकलेली युती आहे असे वारंवार सांगितले जात होते आणि ही गोष्ट खरीही होती आणि त्यामुळेच ही युती तुटली ही घटना सुद्धा ऐतिहासिक ठरली आहे. युती तुटण्यामागची पडद्याआडची कहाणी आणि प्रत्यक्षात तुटण्याची प्रक्रिया यावर आता दीर्घकाळ चर्चा होत राहणार आहेत. भाजपा-सेना युती जशी तुटली आहे तशीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही आघाडी मोडली आहे. या दोन्ही घटस्फोटांना २०१४ सालच्या मे मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे. या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव होता. शहरी भागात भाजपा-शिवसेनेचा वरचष्मा होता. परंतु शिवसेनेला गळती लागली होती आणि भारतीय जनता पार्टी गोंधळात पडली होती. अशा वातावरणात लोकसभेची निवडणूक झाली आणि जनतेने राजकीय कार्यकर्त्यांना अनपेक्षित वाटेल असा एक वेगळाच कौल दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा या चारही पक्षांच्या नेत्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आणि त्यातून आताची स्थिती उद्भवली आहे.

निवडणुकीपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यामध्ये असलेला बदल हा जसा विविध नेत्यांच्या मानसिकतेचा परिपाक आहे तसाच तो त्यांच्या भावी राजकारणाविषयीच्या आकलनाचाही भाग आहे. लोकसभेची निवडणूक मोदी लाटेत झाली असली तरी आता होणारी विधानसभेची निवडणूक कशी होईल या संबंधात या चारही पक्षांचे चिंतन वेगवेगळे आहे. त्या प्रत्येकाचे भाकित वेगळे आहे. या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक प्रामुख्याने चौरंगी होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पाचवा कोनही या निवडणुकीला आहे. पण या पक्षाची अवस्था मोठीच केविलवाणी झाली आहे. या पक्षाला फार उल्लेखनीय यश मिळेल किंवा निवडणुकीनंतरच्या अंकगणितात त्याला काही स्थान प्राप्त होईल असे काही दिसत नाही. चौरंगी निवडणुकीतील भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांची पूर्वी युती होती. पंचवीस वर्षांची ही युती आता मोडली आहे. विधानसभेच्या पाच निवडणुका आणि लोकसभेच्या सात निवडणुका या युतीने एकत्रित लढविल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षात आलेला अंतराय मोठा हृदयद्रावक आहे, युती मोडल्यामुळे काय होईल याचा दोन्ही पक्ष अंदाज घेत आहेत. परंतु युती मोडल्याचा मोठा परिणाम शिवसेनेला भोगावा लागेल असे तूर्तास तरी दिसत आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी तुटेपर्यंत ताणले. ताणताना त्यांना गंभीर परिणामांची जाणीव झाली नाही. पण आता ते विचार करायला लागतील आणि निरनिराळ्या मतदारसंघातील परिस्थितीचे अहवाल त्यांच्यापर्यंत पोचतील तेव्हा त्यांना आपण नेमके काय गमावले आहे याचा बोध होईल आणि आपण हे सारे नुकसान फार छोट्या स्वार्थापोटी करून घेतले आहे हेही त्यांच्या लक्षात येईल.

राजकीय वाटाघाटी करताना मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा घातक ठरत असतो हे ज्ञान आता उद्धव ठाकरे यांना व्हायला काही हरकत नाही. या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यातील आघाडीची स्थिती आहे. पंधरा वर्षानंतर ही आघाडी मोडली आहे. पण ती तशी भाजपा-शिवसेना युतीसारखी नव्हती. मुळात यातला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष कॉंग्रेस पक्षातूनच फुटून निर्माण झालेला होता. परंतु नंतर या दोन पक्षांनी आघाडी स्थापन केली. त्यांनी लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन निवडणुका एकत्र लढवल्या. त्यांच्यातील आघाडी मोडणे हे त्यापैकी कोणावरही फारसा गंभीर परिणाम करणारे नाही. परंतु युती आणि आघाडी मोडल्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक चौरंगी होण्यास मदत झाली आहे. आता या चारही पक्षांचे नेते परस्परांवर टीका करत आहेत. युती किंवा आघाडी मोडण्यास आपण कारणीभूत नसून आपला मित्र पक्ष कारणीभूत आहे असा दोषारोप चारही पक्ष एकमेकांवर करत आहेत.

शिवसेना हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि युतीमध्ये शिवसेनेचे महत्व राखले गेले पाहिजे असा शिवसेनेचा अट्टाहास होता. तो अट्टाहास शिवसेनेला भोवला. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची अवस्था शोचनीय झाली होती. पण लोकसभेच्या निवडणुकीत तिला १८ जागा मिळाल्या, त्यामुळे पक्षाचे मनोधैर्य टिकले. असे असले तरी ही परिस्थिती आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याने मिळालेली आहे याचे भान शिवसेनेला राहिले नाही. उलट आपल्याच करिश्म्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला संधी मिळाली आहे असे शिवसेनेचे नेते भासवत राहिले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींची निर्भत्सना केली जायला लागली. पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव होताच शिवसेना अधिक आक्रमक झाली आणि तिने भाजपाला राजकारण कसे करावे हे शिकवायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या जागा वाटपात जागा देणारी शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी जागा घेणारी आहे असेही उद्धव ठाकरे म्हणायला लागले. भारतीय जनता पार्टीने निरीक्षक म्हणून पाठविलेल्या केंद्रीय नेत्यांना शिवसेनेने काही किंमत द्यायची गरज नाही अशी समजूत करून घेऊन उद्धव ठाकरे यांनी या केंद्रीय नेत्यांच्या भेटीला आपल्या मुलाला पाठवले. या सगळ्या गोष्टींमधून भारतीय जनता पार्टीने काय घ्यायचा तो बोध घेतला. शिवसेनेची एवढी चाकरी करून आणि कमीपणा घेऊन निवडणुका लढविण्याची आणि तिच्यासाठी युती टिकविण्याची भाजपाला खरे तर गरज नव्हती. त्यामुळे शिवसेना जस जसा वरचढपणा करायला लागली तस तसे भाजपाच्या नेत्यांचे अहंकार सुद्धा वाढायला लागले आणि त्यातून युती तुटली. आता राजकीय परिस्थितीचा विचार केला असता युती तुटणे शिवसेनेसाठीच हानीकारक आहे आणि ही गोष्ट आता त्यांच्या ध्यानात यायला लागेल.

Leave a Comment