परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसविरोधी वातावरण

parbhani
१९९५ सालपासून परभणी हा कॉंग्रेसविरोधी जिल्हा म्हणून ओळखला गेला आहे. तिथून सातत्याने शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. आता जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला असून विधानसभा मतदारसंघांचेही विभाजन झाले आहे. आता परभणी जिल्ह्यात चार मतदारसंघ राहिले आहेत. जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत जिंतूरमधून कॉंग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर हे निवडून आले तर परभणीमधून आणि पाथरीमधून शिवसेनेचे आमदार निवडले गेले. परभणीतून निवडून आलेले आमदार शिवसेनेचे संजय जाधव हे आता खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परभणी शहरात मुस्लीम मतदारांची संख्या चांगलीच आहे. या संख्येचा विचार केल्याविना मतदारसंघाचा अंदाज येत नाही. यावेळी डॉ. राहुल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांनी त्यांचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे.

परभणी शहरात विजय मिळविण्यासाठी कॉंग्रेसमधून मुस्लीम उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने इरफानूर रहेमान खान आणि विकार अहमद खान या दोघांपैकी एकाच्या नावाची चाचपणी सुरू आहे. मुस्लीम मतांचा फायदा घेऊन निवडणूक लढविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असला तरी तो कधीच यशस्वी होत नाही. विशेषत: आता मोदी लाट अजून कायम असल्यामुळे शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील विजयी होण्याची खात्री सेनेच्या नेत्यांना वाटत आहे. जिंतूर मतदारसंघात कॉंग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षांची युती झाली असली तरी भांबळे पक्षाबाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. ते नुकतेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि रामप्रसाद बोर्डीकर यांचा सलग पाचव्यांदा विजय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात रामप्रसाद बोर्डीकर यांनी शिवसेनेची दाळ कधीच शिजू दिली नाही. त्यामुळे जिल्हा सेनामय झाला तरी जिंतूर मतदारसंघात मात्र कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. पाथरी मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे वर्चस्व आहे. सध्या तिथून मिरा रेंगे या निवडून आलेल्या आहेत. परंतु यावेळी कॉंग्रेसचे नेते बाबाजानी दुर्रानी हे सर्वशक्तीनिशी मैदानात उतरून शिवसेनेच्या रेंगे यांचा पराभव करण्यास उत्सुक आहेत.

पाथरीमध्ये परभणी जिल्ह्यातले दुसरे एक प्रभावी नेते सुरेश वरपूडकर हे इच्छुक आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट मिळेलच असे गृहित धरून प्रचार सुद्धा सुरू केला आहे. मात्र शिवसेनेचा हा गड कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भांडणात शिवसेनेच्याच ताब्यात राहणार आहे. गंगाखेड हा जिल्ह्यातला चौथा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपाचे सीताराम घनदाट हे सातत्याने निवडून आलेले आहेत. त्यांची निवडणूक सातत्याने झाली आहे, परंतु ते सतत कधी भाजपात राहिलेले नाहीत. त्यांनी कधी भाजपाच्या तिकिटावर तर कधी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेली आहे. ते पुन्हा एकदा मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. तेव्हा साधारणत: शिवसेना ३ आणि भाजपा १ असे जागांचे वाटप होईल आणि शिवसेना २, भाजपा १ अशा जागा मिळतील. जिंतूरची बोर्डीकर यांची जागा हिसकावून घेणे अद्याप तरी युतीला शक्य झालेले नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे विजय भांबळे यांचा पराभव करून निवडून आले आहेत. त्यांना जिंतूर मतदारसंघात भांबळे यांच्यापेक्षा जादा मते मिळाली पण ती अगदी थोडी आहेत. त्यांची दखलही घेऊ नये एवढी ती तोकडी मते आहेत. विशेष म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत जिंतूरमध्ये कॉंग्रेसच्या बोर्डीकरांची मते काही प्रमाणात सेनेच्या जाधवांना मिळाली होती. तरीही ती भांबळेपेक्षा फार जास्त नव्हती. याचा अर्थ जिंतूर विधानसभा मतदारसंघात मोेदी लाट फार प्रभावी नव्हती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकी मध्ये रामप्रसाद बोर्डीकरच पुन्हा बाजी मारणार अशी चिन्हे आहेत. बोर्डीकरांनी जिंतूर हा आपला मतदारसंघ चांगला जोपासला आहे. एखाद्या मतदारसंघात कायम निवडून येत रहावे यासाठी जे जे करणे गरजेचे असते ते सारे बोर्डीकरांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अवघडच आहे. जिंतूर वगळता तीन मतदारसंघ मात्र महायुतीच्या पारड्यात पडतील.