सिंधुदुर्गकडे राज्याचे लक्ष

election
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दक्षिणेतले दोन जिल्हे प्रत्यक्षात दोन असले तरी १९८२ साली एकच होते. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा एक जिल्हा निर्माण करण्यात आला. प्रशासनाच्या दृष्टीने हे दोन जिल्हे वेगळे असले तरी दोन जिल्ह्यात मिळून आठ विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या सर्वांचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. मात्र २०१४ साली निलेश राणे पराभूत झाले. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानेच त्यांचा पराभव केला आणि या आठही विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवाराला मताधिक्क्य मिळाले. या मताधिक्क्यावरून तरी विधानसभा निवडणुकीत सुद्धा या आठही ठिकाणी भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार विजय होतील अशी खात्री वाटत आहे. या खात्रीला आणखी एक आधार आहे. लोकसभा निवडणुकीत तर या मतदारसंघात बरीच मोठी राजकीय परिवर्तने घडली आहेत.

विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले मतभेद अधिक तीव्र झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील कणकवलीमधून प्रमोेद जठार (भाजपा), कुडाळमधून स्वत: नारायण राणे (कॉंग्रेस) आणि सावंतवाडीमधून दीपक केसरकर (राष्ट्रवादी) हे २००९ साली निवडून आले आहेत. यातल्या दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या दादागिरीला आव्हान दिले आणि निलेश राणे यांचा पराभव घडवून आणला. आता ते राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे सावंतवाडीत शिवसेनेतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे. कणकवली मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार प्रमोद जठाण हे पुन्हा निवडणुकीला उभे राहतील, मात्र त्यांचा सामना नारायण राणे यांचे द्वितीय चिरंजीव नितेश यांच्याविरुद्ध होईल. स्वत: नारायण राणे हे पुन्हा एकदा कुडाळ मतदारसंघातून उभे राहणार आहेत आणि यावेळी शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला १५ ते २० हजार मतांचे अधिक्य मिळाले होते. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत काय फरक पडतो हे बघावे लागणार आहे. नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी कॉंग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकंदरीत ही निवडणूक नारायण राणे यांच्यासाठी मोठी कठीण समजली जाते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जात होते. परंतु सिंधुदुर्गमधील नारायण राणे यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसेनेचे वर्चस्व कमी झाले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील भास्कर जाधव यांनी शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातले वर्चस्व सुद्धा ओहोटीला लागले. असे असूनही रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने आपले स्थान बर्‍यापैकी टिकवले होते. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच मतदारसंघांपैकी दापोली, चिपळूण आणि राजापूर हे तीन मतदारसंघ शिवसेनेचे जिंकले होते तर गुहागर आणि रत्नागिरी हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकले होते. शिवसेनेचे सुर्यकांत दळवी (दापोली), सदानंद चव्हाण (चिपळूण) आणि राजन साळवी (राजापूर) हे तिघे विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव गुहागरमधून तर याच पक्षाचे उदय सामंत हे रत्नागिरीमधून निवडणूक जिंकले होते.

शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आव्हान दिले असले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे हे आव्हान संपुष्टात आणण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे. त्यानुसार दापोली, चिपळूण आणि राजापूर या तिन्ही मतदारसंघात आताच शिवसेनेचे आमदार असल्यामुळे या तिनही जागा शिवसेनेकडे जातील. उमेदवारही तेच असतील. गुहागर आणि रत्नागिरी हे दोन मतदारसंघ भाजपाकडे जातील. खरे म्हणजे गुहागर हा मतदारसंघ परंपरेने भाजपाचा आहे, परंतु भाजपाने तिथे उमेदवार बदलला आणि विजय नातू यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे तिथे पक्षात बंडखोरी झाली आणि त्यामुळे ही जागा हातून गेली होती. यावेळी ती खेचून आणण्याचा युतीचा निर्धार आहे. रत्नागिरी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला उदय सामंत या मंत्र्याशी लढा द्यावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत या पाचही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला ३० हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्य मिळालेले होते. त्याचा फायदा महायुतीला होईल.

Leave a Comment