तेजस्वी पर्व

mars1
भारताचे मंगलयान मंगळाच्या कक्षेत जाऊन स्थापित झाले आहे. भारतात किती अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत याचा हा सज्जड पुरावा आहे. आगामी शतक भारताचे असेल असे काही लोक म्हणतात ते निव्वळ आर्थिक ताकदीवर घडणारे नाही तर ते अशाच प्रकारच्या शास्त्रीय नवलकथांनी घडणार आहे. आगामी शतक भारताचे आहे की चीनचे आहे की आणखी कोणाचे आहे हे तसे देशाचे नाव घेऊन सांगता येणारही पण ते शतक नेमकेपणाने सांगायचे तर बुद्धीमत्तेचे आहे. या शतकात जे जे शास्त्रीय शोध लागतील ते सर्व शोध करोडो आणि अब्जावधी रुपयांच्या उलाढालीस कारणीभूत ठरणार आहेत पण त्यांच्या पायाशी असेल ते संशोधन ज्याला फार पैसा लागणार नाही देवाने दिलेला सर्वात वेगवान मेंदू लागेल. या नंतरच्या काळात व्यापारी वृत्तीचा नव्हे तर बुद्धीमत्तेचा करिष्मा दिसणार आहे. हे युगच ज्ञानाधारित उद्योगाचे असेल. भारतीयांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर मंगळाच्या कक्षेत जाऊन जगाला भारत देश नेमका काय आहे हे दाखवून दिले आहे. या पुढच्या काळात जगाला अंतराळ संशोधनाच्या बाबतीत आपल्या मागे यायला लावणारे हे यश आहे.

भारताची मंगळ मोहीम केवळ पूर्ण झाली आहे एवढेच नाही तर ती मोहीम कल्पनेपेक्षाही यशस्वी झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी ही मोहीम एका टप्प्यापर्यंत यशस्वीरित्या आणून ठेवली आहे. जगात अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स, हेही देशात अंतराळ संशोधनात आघाडीवर आहेत. त्यामुळे भारत हा सुद्धा त्यांच्याच मांदियाळीतला एक देश आहे आणि त्यांच्यासोबत आपणही अंतराळ संशोधन करत असतो असा लोकांचा समज होण्याची शक्यता आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आपण या सर्वांच्या पुढे आहोत. भारताने केलेले संशोधन आगळेवेगळे आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्याने देदीप्यमान कामगिरी केली आहे. आजवर मंगळावर जाण्याचे साहस दोनच देशांनी केले होते. त्यातल्या अमेरिकेचे स्थान तर मोठे आहेच, कारण जगभरातले बुद्धीमान लोक अमेरिकेत एकत्रित आलेले आहेत आणि अमेरिकेकडे साधनांची कसलीही कमतरता नाही. परिणामी अमेरिकेतल्या नासा या संघटनेचे या क्षेत्रातले स्थान निर्विवाद आणि मोठे आहे. परंतु भारताचे स्थान अनेक कारणांनी वेगळे आहे. भारताने मंगळावर आपले पहिलेच यान पाठविले आणि भारताचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. अशा प्रकारचे प्रयोग मोठे गुंतागुंतीचे आणि अतीशय उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाची गरज असणारे असतात. त्यामुळे पहिला प्रयोग यशस्वी होणे अशक्य असते. भारतीय शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवले आहे.

मंगळ ग्रह पृथ्वीपासून करोडो किलोमीटर लांब आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर साधारणपणे मोजले गेलेले आहे. परंतु ते सतत बदलत असते. मात्र हे अंतर कमीत कमी ११ अब्ज किलोमीटर लांब असावे असे अनुमान आहे. एवढे अंतर दहा महिन्यात कापून भारताचे मंगळ यान मंगळाच्या कक्षेत जाऊन पोचले आहे. त्याला पुरेल इतके इंधन पृथ्वीवरून पुरवलेले आहे. भारताचे हे यान मंगळावर जाणार नाही तर मंगळाच्या भोवती फिरणार आहे आणि फिरता फिरता ते मंगळाचे निरीक्षण करणार आहे. त्यालाही इंधन पुरवले जाणार आहे. या मंगळयानाचा प्रवास तीन टप्प्यातून झाला आहे. ते पहिल्यांदा पृथ्वीवरून उडाले आणि पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले. तिथून त्याची वाटचाल मंगळाच्या कक्षेकडे सुरू झाली. मंगळाच्या कक्षेत आल्यानंतर त्याचा वेग वाढविण्याची गरज होती. त्याच्या वेगातले हे बदल पृथ्वीवरून घडवले जात होते आणि तसे आपल्या शास्त्रज्ञांनी घडवले आहे. मंगळाच्या आसपास गेल्याबरोबर त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात आले आणि हळू हळू करीत हे मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले. पहिल्याच प्रयोगात हे उज्ज्वल यश आपल्या शास्त्रज्ञांनी प्राप्त केले आहे. असेच यश अणु चाचण्यांच्या बाबतीत सुद्धा मिळवले होते.

पहिल्याच चाचणीमध्ये भारताने पाच स्फोट घडवले. त्यातला एक स्फोट हायड्रोजन बॉम्बचा होता. हायड्रोजन बॉम्बचा पहिला स्फोट यशस्वी करण्यासाठी एक हजार प्रयोग करावे लागतात. मात्र भारताच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात हायड्रोजन बॉम्ब यशस्वी करून दाखविला. मंगळाच्या बाबतीत असेच झालेले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची मोहीम यशस्वी करण्यासाठी अमेरिकेला अब्जावधी रुपये लागतात. भारताने मात्र केवळ ४५० कोटी डॉलर्समध्ये हे यान बनवून दाखवले आणि उडवून सुद्धा दाखवले. भारताला या गोष्टी स्वस्तात शक्य होत असल्यामुळे भारताला या पुढच्या काळात दुसर्‍या देशांची उड्डाणे करवून देण्याचा उद्योग सुरू करता येणार आहे. भारतीय मंगळयानाला मंगळाच्या कक्षेत मिथेन वायू आहे का? याचा शोध घ्यायचा आहे. कारण मिथेन गॅस असेल तर तिथे सजीव सृष्टी असण्याची शक्यता असते. या संशोधनाच्या बाबतीत भारतीय शास्त्रज्ञ जे काही करतील ती माहिती अमेरिका आपल्याकडून घेणार आहे आणि त्या माहितीचा उपयोग अमेरिकेला होणार आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील एखादी माहिती अमेरिका भारताकडून घेते यामध्ये भारताचे मोठेपण सामावलेले आहे आणि हा पराक्रम अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

Leave a Comment